Why Dr Babasaheb Ambedkar create Navayana Buddhism? १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तो केवळ धर्मबदलाचा प्रसंग नव्हता; ते एक प्रखर सामाजिक आणि राजकीय भाष्य होतं. पण धर्मबदल करताना त्यांनी धम्माची पुनर्मांडणी ‘नवयान’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नव्या रूपात केली. त्यांनी हे का केलं, का त्याची गरज त्यांना भासली, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

विसाव्या शतकापर्यंतचा विचार करता, तब्बल अडीच हजार वर्षांहून अधिक काळापासून बौद्ध धम्म हा विविध रूपांमध्ये अस्तित्वात होता. प्रत्येक परंपरेनं बुद्धांच्या शिकवणुकीचा आपापल्या परीने अन्वयार्थ लावला होता; तरीही कर्म,पुनर्जन्म, निर्वाण आणि आत्मिक मुक्तीचं महत्त्व यांसारखी काही मूलभूत तत्त्वं त्या सर्व परंपरांमध्ये एकसामायिक होती. हा प्रदीर्घ प्रवास आजच्या चर्चांमधून अनेकदा दुर्लक्षित राहतो.अनेक लोक बौद्ध धम्माबद्दल असं बोलतात, जणू तो बुद्धांच्या काळापासून आजतागायत पूर्णपणे अपरिवर्तित राहिलेला धर्म आहे. वस्तुतः बौद्ध धम्माने नेहमीच विविध समाजांशी आणि ऐतिहासिक परिस्थितींशी जुळवून घेतलं आहे. काळाच्या ओघात बौद्ध धम्मात बदल होत गेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘नवयान’ हा या बदलांच्या प्रदीर्घ प्रवासातला आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

बौद्ध धम्मच का स्वीकारला?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकानुशतकं जातिव्यवस्थेचे चटके सहन करणाऱ्या शोषित घटकांचं प्रतिनिधित्व करत होते. तत्कालीन समाजात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या दलितांना तीव्र भेदभावाला सामोरं जावं लागत होतं. मंदिरं, शाळा, पाणवठे आणि अनेक सार्वजनिक जागांमध्ये प्रवेश नाकारला जात होता. कितीही अपार कष्ट केले किंवा उच्च शिक्षण घेतलं, तरी जात त्यांना समानतेची वागणूक मिळण्याच्या आड येत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असा ठाम विश्वास होता, की केवळ कायद्यातील सुधारणांमुळे हा खोलवर रुजलेला सामाजिक पूर्वग्रह नष्ट होणार नाही. जोपर्यंत दलित हिंदू सामाजिक चौकटीत राहतील, तोपर्यंत जातच त्यांचे आयुष्य ठरवत राहील.

इतर धर्म का नाही?

सर्वच व्यवहारांच्या केंद्रस्थानी जात हा महत्त्वाचा घटक असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असा निष्कर्ष काढला की, मुक्तीसाठी हिंदू धर्माचा पूर्णपणे त्याग करणं अपरिहार्य आहे. त्याला अनुसरून १९३५ मध्ये त्यांनी प्रसिद्ध घोषणा केली, “मी हिंदू म्हणून जन्मलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही!” मग प्रश्न असा उपस्थित झाला, हिंदू धर्माची जागा कोणता धर्म घेणार? हा निर्णय घेण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांचा सखोल अभ्यास केला. ख्रिस्ती, इस्लाम, शीख आणि बौद्ध अशा विविध धर्मांची चिकित्सा केली. चिकित्सेअंती बौद्ध धम्माकडे ते विशेष आकृष्ट झाले; याचं एक कारण या धम्माचा उगम भारतातच झाला होता, त्यानं वेद प्रामाण्य नाकारलं होतं आणि जातिव्यवस्थेला थेट आव्हानही दिलं होतं. खुद्द बुद्धांनी विविध सामाजिक स्तरातून आलेल्या लोकांना संघात सामावून घेतलं होतं आणि जन्मापेक्षा सदाचाराला सर्वोच्च स्थान दिलं होतं.

पारपंरिक बौद्ध धर्माशी फारकत का?

सखोल विचारांती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला खरा, पण पारंपरिक बौद्ध धम्मात अशाही काही संकल्पना होत्या, ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्दिष्टांशी सुसंगत नव्हत्या. बहुतेक बौद्ध तत्त्वज्ञान हे कर्म, पुनर्जन्म आणि निर्वाणाचा शोध याभोवती फिरणारं होतं. ऐहिक बंधनं तोडून जन्म-मरणाच्या फेऱ्यांतून मुक्त होणं हाच बहुतांश ठिकाणी सर्वोच्च आदर्श मानला गेला होता. बौद्ध परंपरेत भिक्खूंच्या संन्यस्त जीवनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं. तसंच काही ग्रंथांमध्ये तत्कालीन सामाजिक दृष्टिकोनाचं, विशेषतः स्त्रियांवर लादलेल्या मर्यादांचं प्रतिबिंबही उमटलं होतं.

आशेवर थांबण्यास का नकार दिला?

धर्माला चिकटून असलेल्या कालबद्ध मर्यादांमुळे आधुनिकतेकडे झेपावू पाहणाऱ्या भारतातल्या दलितांसमोरच्या समस्या सोडवण्यासाठी हे विचार पुरेसे नाहीत,अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खात्री पटली होती. त्यांच्या अनुयायांना याच जन्मात शिक्षण, रोजगार, राजकीय हक्क आणि सामाजिक समतेची नितांत गरज होती.पुढच्या जन्मात चांगलं फळ मिळेल या आशेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वा त्यांचे अनुयायी थांबून राहू शकत नव्हते. धर्मानं माणसाला समाजापासून विरक्त न करता समाजात परिवर्तन घडवून आणण्यास प्रवृत्त केलं पाहिजे,असं त्यांचं ठाम म्हणणं होतं.

नवयान बौद्ध धर्माची तत्त्वं काय?

याच भूमिकेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘नवयान’ बौद्ध धम्माची निर्मिती केली. नवयानाने स्वतः बुद्धांना कधीही नाकारलं नाही; उलट आधुनिक लोकशाही समाजासाठी बुद्धांच्या शिकवणुकीचा नवा अन्वयार्थ मांडला. कर्म, पुनर्जन्म, चमत्कार आणि निर्वाण या संकल्पनांना दुय्यम स्थान दिलं. त्याऐवजी प्रज्ञा (विवेक), समता, करुणा, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायावर भर दिला. व्यक्तिगत मुक्ती मिळवण्यापेक्षा न्याय्य समाजाची उभारणी करण्यासाठीचं एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून त्यांनी बौद्ध धम्माकडे पाहिलं.

नवयानाच्या माध्यमातून कोणता आग्रह धरला?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवयान बौद्ध धम्माची स्थापना करताना जातिभेद अधिक बळकट करणाऱ्या चाली रीतींना ठामपणे नकार दिला. शाकाहार हेच शुद्धतेचं परिमाण आहे ही संकल्पना साफ फेटाळून लावली, कारण अशा निकषांचा वापर मानवी समूहांना वेगळं पाडण्यासाठी केला जात असे. यापेक्षा त्यांनी स्त्री-पुरुष समानतेला पाठिंबा दिला. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क मिळालेच पाहिजेत, असा आग्रह धरला. त्यांच्या मांडणीमुळे बौद्ध धम्म एकांतप्रिय भिक्खूंचा धर्म न राहता सजग आणि कृतिशील नागरिकांचा धम्म ठरला.

सर्व अन्वयार्थ का नाकारले?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा निर्णय अशा काळात आला, जेव्हा विविध प्रवाह बुद्धांना आपापल्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करत होते. महात्मा गांधी बुद्धांच्या अहिंसा आणि करुणेच्या शिकवणुकीचे प्रशंसक होते. जवाहरलाल नेहरु यांनी कलिंगच्या युद्धानंतर बौद्ध धम्माचा प्रसार करणाऱ्या सम्राट अशोकाचा शांतताप्रिय नेतृत्वाचं प्रतीक म्हणून गौरव केला होता. काही हिंदू विचारवंतांचा असा युक्तिवाद होता, की बुद्ध हे हिंदू परंपरेतले आणखी एक थोर तत्त्वज्ञ आहेत; तर काहींनी प्राचीन भारतात बौद्ध धम्मामुळे देशाचं लष्करी सामर्थ्य कमकुवत झालं अशी टीका केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्व अन्वयार्थ नाकारले. नागपुरातल्या ऐतिहासिक महाधम्म दीक्षेचं नेतृत्व करून त्यांनी बौद्ध धम्माचं रूपांतर सामाजिक समतेच्या एका विराट चळवळीत केलं.

नवयान कशाचं प्रतीक ठरला?

प्राचीन बौद्ध परंपरांपेक्षा नवयान बौद्ध धम्म आजही वेगळा ठरतो. अर्थात, काही बौद्ध अभ्यासक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या मांडणीशी असहमत आहेत. मात्र, यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण प्राचीन काळापासून थेरवाद, महायान आणि वज्रयान अशा रुपांतून जात असताना बौद्ध धम्मात अनेकदा परिवर्तन झालं आहे. परिवर्तनाच्या या प्रदीर्घ प्रवासातला डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित‘नवयान’ हा पुढचा टप्पा होता. प्राचीन ग्रंथांमधल्या प्रत्येक विचाराची अंधपणे पुनरावृत्ती करण्याऐवजी, विसाव्या शतकातील भारताच्या ज्वलंत वास्तवाला दिलेला तो एक वैचारिक प्रतिसाद होता.

धम्माच्या पुनर्मांडणीने काय साधलं?

कायदे जितका प्रभाव पाडतात, तितकाच धर्मही समाजावर खोलवर प्रभाव टाकू शकतो, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अचूक ओळखलं होतं. राज्यघटनेनं दलितांना कायदेशीर समता दिली होती; परंतु आत्मसन्मान जपणारी एक नैतिक आणि आध्यात्मिक ओळखही दलितांना हवी होती, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्या प्रसंगी बौद्ध धम्माची पुनर्मांडणी करून त्यांनी कोट्यवधी लोकांना नवी आशा, स्वाभिमान आणि एकात्मतेची भावना दिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या नवयान बौद्ध धर्मातच्या प्रत्येक मुद्द्याशी कुणी सहमत असो वा नसो, एक गोष्ट मात्र निश्चित की, आधुनिक लोकशाही समाजासमोरच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एका प्राचीन धर्माची कशाप्रकारानं सर्जनशील पुनर्रचना केली जाऊ शकते, याचं एक अत्यंत महत्त्वाचं आणि जागतिक उदाहरण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म परिवर्तनाच्या कृतीतून घालून दिलं होतं.