यंदा १० ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. म्हणजेच या दिवशी या वर्षीच्या पितृपक्षाची सांगता होत आहे. यानंतर हिंदू धर्मातील शरद ऋतूतील सणांची सुरुवात होते. त्याच पार्श्वभूमीवर पितृपक्ष म्हणजे नक्की काय आणि तो याच काळात का पाळला जातो? हे पाळण्यामागील श्रद्धा कोणत्या आहेत? हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

पितृपक्ष म्हणजे काय?

‘पक्ष’ या शब्दाचा शब्दशः अर्थ पंधरवडा असा होतो, तर ‘पितृ’ म्हणजे आपले पूर्वज. पितृपक्ष अश्विन कृष्ण प्रतिपदेला (हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाचा पहिला दिवस) सुरू होतो आणि अश्विन कृष्ण अमावस्येला संपतो. या काळात लोक आपल्या पूर्वजांसाठी श्राद्धविधी करतात. मात्र, यात आणखी एक अतिरिक्त दिवसही असतो. पूर्वजांपैकी कोणाचे निधन कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेला झाले असेल तर त्यांचे श्राद्ध भाद्रपद शुक्ल पौर्णिमेला (अश्विन कृष्ण प्रतिपदेच्या आदल्या दिवशी) केले जाते. त्यामुळे श्राद्ध पक्ष किंवा पितृपक्ष हा एकूण १६ दिवसांचा असतो.

जमशेदपूर येथील भारतीय ज्योतिष अध्यात्म परिषदेचे अध्यक्ष डॉ. रमेश कुमार उपाध्याय यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, “पितृपक्षात भगवान इंद्र स्वर्गात राहणाऱ्या पूर्वजांना आणि यमराज (धर्मराज) नरकात राहणाऱ्या पूर्वजांना मुक्त करतात, जेणेकरून ते पृथ्वीवर येऊन त्यांच्या वंशजांनी दिलेले अन्न-पाणी ग्रहण करू शकतील. या काळात आपल्या पूर्वजांना अन्न आणि पाणी अर्पण केल्याने त्यांना, तसेच श्राद्ध करणाऱ्याला आध्यात्मिक लाभ मिळतो.” मृत्यूनंतर पूर्वजांच्या आधीच्या तीन पिढ्या पितृलोकात राहतात, असे काही धर्म अभ्यासक मानतात. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात लिहिलेल्या माहितीनुसार, “पृथ्वी आणि स्वर्गाच्या मध्ये पितृलोक आहे, जिथे मृत्यूनंतर आत्म्यांना स्थान मिळते, अशी श्रद्धा आहे. स्वर्गात पोहोचण्यासाठी आत्म्याला पितृलोक पार करणे आवश्यक असते. योग्य श्राद्धविधी केल्याने आत्मे पितृलोक सोडून स्वर्गात शांती मिळवू शकतात.”

हा काळ दिवंगत आत्म्यांना समर्पित असल्याने विवाह किंवा गृहप्रवेशासारखी कोणतीही नवीन शुभकामे या काळात केली जात नाहीत. अनेक हिंदू या काळात मांसाहार करत नाहीत. श्राद्धविधी करणारी व्यक्ती कांदा-लसूण, तसेच उडीद आणि मसूर यांसारख्या डाळी खाणे टाळते, असे उपाध्याय यांनी स्पष्ट केले.

पितृपक्षात काय होते?

श्राद्धविधीमध्ये प्रामुख्याने ‘पिंडदान’ आणि ‘तर्पण’ यांचा समावेश असतो. पिंडदान म्हणजे शिजवलेला भात आणि इतर धान्य पूर्वजांना अर्पण करणे, तर तर्पण म्हणजे पाणी अर्पण करणे होय. लोक या काळात अन्नदानही करतात. हे विधी सहसा पुरुषांद्वारे केले जातात आणि पारंपरिक हिंदू कुटुंबांमध्ये मुलाची (पुत्राची) इच्छा असण्यामागील हे एक प्रमुख कारण आहे. पंधरवड्यातील वेगवेगळे दिवस वेगवेगळ्या दिवंगत आत्म्यांसाठी समर्पित असतात. अविधवा नवमी ही पतीच्या आधी मृत पावलेल्या स्त्रियांसाठी असते, मुलांसाठी एक दिवस, शस्त्राने मृत्यू पावलेल्यांसाठी एक दिवस इत्यादी दिवस असतात.

पितृपक्षामागील कर्णाची आख्यायिका

पितृपक्षाच्या उगमाविषयी आणखी एक लोकप्रिय कथा महाभारतातील कर्णाशी संबंधित आहे. या कथेचा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये सहसा आढळत नाही.

कर्ण हा पांडवांची माता कुंती आणि सूर्यदेव यांचा पुत्र होता. कुंतीला दुर्वास ऋषींनी एक मंत्र दिला होता. या मंत्राच्या प्रभावाने ती कोणत्याही देवाला बोलावून त्याच्याकडून दिव्य गुण असलेला पुत्र प्राप्त करू शकत होती. तरुण कुंतीने मंत्राचा प्रभाव तपासण्याचे ठरवले आणि कर्णाचा जन्म झाला. मात्र, त्यावेळी कुंती अविवाहित असल्याने तिने त्या बाळाला नदीत सोडून दिले. नंतर हे बाळ धृतराष्ट्राचा सारथी अधिरथ आणि त्याची पत्नी राधा यांना सापडले आणि त्यांनी त्याचा सांभाळ केला. तेजस्वी कर्ण मोठा होऊन एक शूर योद्धा झाला. तो दुर्योधनाचा मित्र झाला. कुरुक्षेत्राचे युद्ध सुरू होण्यापूर्वी कुंतीने कर्णाला भेटून त्याची ओळख सांगितली आणि त्याला पांडवांच्या बाजूने लढण्याची विनंती केली. मात्र, कर्णाने आपल्या मित्राची साथ सोडण्यास नकार दिला.

कर्ण त्याच्या दानशूरपणासाठीही ओळखला जात असे. तो नेहमी सोने आणि रत्ने दान करत असे. युद्धात अर्जुनाकडून मारला गेल्यानंतर कर्ण स्वर्गात गेला. तिथे त्याला खाण्यासाठी सोने आणि रत्ने देण्यात आली. भुकेल्या कर्णाने जेव्हा अन्न मागितले, तेव्हा त्याला सांगण्यात आले की त्याने पृथ्वीवर फक्त मौल्यवान वस्तूंचे दान केले, पण आपल्या पूर्वजांसाठी कधीही अन्नदान केले नाही. त्यावर कर्णाने उत्तर दिले की आपण एक अनाथ होतो आणि मृत्यूपूर्वी काही दिवस आधीच आपल्याला आपल्या पूर्वजांबद्दल समजले होते. त्यामुळे त्याला त्याच्या पूर्वजांचे आवश्यक विधी पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांसाठी पुन्हा पृथ्वीवर पाठवण्यात आले. हाच तो काळ आहे जो आता आपण पितृपक्ष म्हणून पाळतो.

‘पितृऋण’ फेडण्याची संकल्पना

हिंदू तत्त्वज्ञानानुसार मानव योनीत जन्म मिळाल्यानंतर प्रत्येकावर देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृ ऋण अशी तीन ऋण असतात. आपले आई-वडील, आजी-आजोबा आणि त्यामागील अनेक पिढ्यांनी आपल्या जडणघडणीत, संस्कृतीच्या हस्तांतरणात जे योगदान दिले आहे, त्याची उतराई होणे म्हणजेच ‘पितृ ऋण’ फेडणे. सुप्रसिद्ध प्राच्यविद्या पंडित आणि भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांनी त्यांच्या ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ (History of Dharmasastra) या ग्रंथात श्राद्धाच्या संकल्पनेचे अत्यंत मार्मिक विश्लेषण केले आहे. ते लिहितात, “श्राद्ध ही केवळ मृतांसाठी केली जाणारी अंधश्रद्धा नाही. ती जिवंत पिढीची आपल्या पूर्वजांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारी एक उदात्त कृती आहे. ज्यांनी आपल्याला जीवन दिले, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे आणि त्यांच्याप्रती अन्नाच्या रूपाने आदर व्यक्त करणे, हे मानवी संस्कृतीचे लक्षण आहे.”

ब्रह्मपुराणात श्राद्धाची व्याख्या करताना म्हटले आहे की, “श्रद्धया दीयते यस्मात् तच्छ्राद्धम्।” (जे अत्यंत श्रद्धेने दिले जाते, ते श्राद्ध) याचाच अर्थ, यामध्ये केवळ भौतिक वस्तूंच्या दानाला महत्त्व नसून त्यामागील भावनेला, श्रद्धेला आणि कृतज्ञतेला महत्त्व दिले गेले आहे.

गरुड पुराण आणि मृत्यू पश्चात जीवनाची संकल्पना

भारतीय परंपरेत मृत्यू हा शेवट मानला जात नाही, तर तो एका नव्या प्रवासाची सुरुवात मानली जाते. गरुड पुराणात पितरांच्या समाधानाबद्दल अत्यंत सुंदर श्लोक आढळतो, “आयुः प्रजां धनं विद्यां स्वर्गं मोक्षं सुखानि च। प्रयच्छन्ति तथा राज्यं पितरः श्राद्धतर्पिताः॥” (अर्थ: श्राद्धामुळे तृप्त झालेले पितर आपल्या वंशजांना दीर्घायुष्य, चांगली प्रजा, धन, विद्या, सुख आणि अगदी मोक्षही प्रदान करतात.)

निसर्ग आणि पर्यावरणाशी जोडलेली नाळ

पितृपक्षातील विधींकडे बारकाईने पाहिल्यास त्यात मानवाचा निसर्गाशी असलेला सखोल संबंध दिसून येतो. श्राद्धविधीच्या वेळी पानावर वाढलेला नैवेद्य केवळ मानवांसाठी नसतो. त्यात ‘काकबली’ (कावळ्यांसाठी अन्न), ‘श्वानबली’ (कुत्र्यांसाठी अन्न), ‘गौबली’ (गाईसाठी अन्न) आणि ‘पिपीलिकाबली’ (मुंग्यांसाठी अन्न) असे भाग काढले जातात. हा केवळ कर्मकांडाचा भाग नाही, तर विश्वातील प्रत्येक सजीव घटकामध्ये ईश्वराचा आणि आपल्या पूर्वजांचा अंश पाहण्याची ती एक प्रगल्भ दृष्टी आहे. मानवी जीवन हे केवळ माणसांवर अवलंबून नाही, तर पशू, पक्षी आणि कीटक यांच्यासह संपूर्ण परिसंस्थेवर (Ecosystem) अवलंबून आहे, हा व्यापक संदेश या विधींमधून दिला जातो. कावळा हा यमाचा दूत मानला जातो, परंतु पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने तो एक महत्त्वाचा ‘सफाई कामगार’ (Scavenger) आहे. त्याला अन्नाचा वाटा देणे, हे पर्यावरणाप्रती असलेली आपली जबाबदारी दर्शवते.