23 January 2018

News Flash

Movie Review : विचारपूर्वक मांडलेली आणीबाणी ‘इंदू सरकार’

७० च्या दशकातील काही लहानसहान घडामोडींवर विशेष लक्ष दिलं गेलं.

Updated: July 28, 2017 12:14 PM

इंदू सरकार

‘पेज ३’, ‘चांदनी बार’, ‘फॅशन’ आणि ‘ट्रॅफिक सिग्नल’ यांसारख्या चित्रपटानंतर आता ‘इंदू सरकार’मधून दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी पुन्हा एकदा एका वेगळ्या मुद्द्यावर भाष्य केलंय. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीवर हा चित्रपट आधारित आहे. १९७५ ते १९७७ दरम्यान आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरील घटनांवर चित्रपटातून भाष्य केलंय. मात्र त्यातील अनेक घटना काल्पनिक आहेत.

चित्रपटाची कथा २७ जून १९७५ पासून सुरू होते जेव्हा देशात आणीबाणी लागू केली गेली. यामध्ये नवीन सरकार (तोता रॉय चौधरी) चीफ (नील नितीन मुकेश) अंतर्गत येणाऱ्या मंत्र्यांचा सल्लागार असतो. नवीन इंदूसोबत (किर्ती कुल्हारी) लग्न करतो आणि त्यानंतर आणीबाणी लागू होते. यादरम्यानच घडलेल्या काही घटनांमुळे इंदू आपल्या पतीला सोडून देशहितासाठी काम करू लागते. अनेक चढउतारांनंतर चित्रपटाअखेर आणीबाणी संपते आणि त्यासोबतच चित्रपट अनेक प्रश्न मनात निर्माण करून जातो.

प्रदर्शनापूर्वी ‘इंदू सरकार’ चित्रपटाला बराच विरोध केला गेला. चित्रपटातून काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून होत होता. प्रदर्शनापूर्वी जरी चित्रपट वादग्रस्त ठरला तरी चित्रपटात अनेक वाद टाळण्यात आलेत असं म्हणावं लागेल. महत्त्वाच्या मुद्द्यांना भांडारकर यांनी चतुराईने हात लावला. आणीबाणीदरम्यान नसबंदी आणि मीडियाबंदीसोबतच इतर काही मुद्द्यांवर प्रकाश पाडण्यात आलाय.

चित्रपटाची कथा, स्क्रीनप्ले, संवाद, सिनेमॅटोग्राफीसोबतच बॅकड्रॉपसुद्धा कमालीचा दाखवण्यात आलाय. उत्तम कॅमेरा वर्क पाहून राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या दांडग्या अनुभवाची प्रचिती येते. शोले चित्रपटाचे प्रदर्शन, अभिनेत्री साधना किंवा हेलनचा हेअरकट यांसारख्या ७० च्या दशकातील काही लहानसहान घडामोडींवर विशेष लक्ष दिलं गेलंय. ‘पिंक’ चित्रपटानंतर अभिनेत्री किर्ती कुल्हारीचा पुन्हा एकदा दमदार अभिनय ‘इंदू सरकार’मध्ये पाहायला मिळतो. याशिवाय तोता रॉय चौधरी आणि नील नितीन मुकेश यांनीही प्रशंसनीय भूमिका साकारली.

चित्रपटाचे संगीतसुद्धा छान आहे. एकीकडे ‘चढता सूरज’ ही कव्वाली आणि दुसरीकडे मोनाली ठाकूरच्या आवाजातील ‘ये आवाज है’ गाणं मनं जिंकून घेतात. मात्र चित्रपटाचा कमकुवत भाग हा एडिटिंग ठरतो. त्याचबरोबर चित्रपटात आणीबाणीच्या आणखी काही घटनांना जोडता आले असते मात्र हा प्रयत्न जाणूनबुजून टाळण्यात आलाय. चित्रपटाचे बजेट साधारण १५ कोटी असल्याचं सांगितलं जातंय. इतर चित्रपटांचेसुद्धा प्रदर्शन असल्याने ‘इंदू सरकार’ला कमी स्क्रीन्स मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र वादाची पार्श्वभूमी चित्रपटाला बऱ्याच अंशी यश मिळवून देईल असं म्हणता येईल.

First Published on July 28, 2017 12:12 pm

Web Title: indu sarkar movie review kirti kulhari neil nitin mukesh anupam kher madhur bhandarkar
  1. S
    shankar
    Jul 28, 2017 at 6:12 pm
    एकदम रटाळ आणि फालतू सिनेमा आहे. काँग्रेस सी तर कोणताही संबंध नाही.
    Reply