25 September 2018

News Flash

जगण्याची ‘नाटय़’मय कथा

चित्रपटात चार भिंतीत घडणारी पितापुत्रांमधली ही लुटुपुटुची लढाई दोन सक्षम कलाकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.

नाटकावर आधारित चित्रपट ही दिग्दर्शक उमेश शुक्लाची ओळखच झाली आहे. ‘ओह माय गॉड’नंतर पुन्हा ‘१०२ नॉट आऊट’ याच नावाच्या गुजराती नाटकावर आधारित हा चित्रपट बेतला आहे. नाटकाची संकल्पना नेहमीपेक्षा वेगळी आहे आणि ज्या नात्यांबद्दल हे नाटक भाष्य करते त्याबद्दल बोलताना सर्वसाधारणपणे भावनांचा पूर वाहील इतका मेलोड्रामा, नाटय़ त्यात ओतून भरलेले असते. सौम्या जोशी लिखित या नाटकाची खासियत हीच आहे की नाळेने जोडले गेलेले पोटच्या पोराचे नाते असले तरी ते कुचकामी आहे हे लक्षात आल्यानंतर ते वास्तव स्वीकारून माणूस म्हणून जगायला शिकले पाहिजे, हे अतिशय सरळ, स्पष्टपणे लेखिकेने मांडले आहे. त्यामुळे चित्रपटात चार भिंतीत घडणारी पितापुत्रांमधली ही लुटुपुटुची लढाई दोन सक्षम कलाकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.

एकाच चित्रपटात बापलेकाच्या दोन समांतर नात्यांची कथा आहे. १०२ वर्षांचे जिंदादिल प्रवृत्तीचे दत्तात्रेय वाखारिया (अमिताभ बच्चन) आणि त्यांचा पंच्याहत्तरी गाठलेला मुलगा बाबुलाल (ऋषी कपूर) या दोघांची ही कथा आहे. आपला मुलगा त्याच्या मुलाला मोठे करण्याच्या नादात स्वत:चे जगणे हरवून बसला आहे, याची जाणीव झाल्यानंतर त्याची गाडी रुळावर आणण्यासाठी या १०२ वर्षांच्या ज्येष्ठाचे प्रयत्न सुरू होतात. एकीकडे बाबुलालचे वडील म्हणून त्यांच्या मुलाशी अमोलशी असलेले आणि फसलेले नाते, तर दुसरीकडे आपली सतत काळजी घेणाऱ्या, पिच्छा पुरवणाऱ्या वडिलांशी असलेले त्यांचे नाते.. या दोन नात्यांमधील वास्तव समजून घेऊन सकारात्मकतेने, आयुष्याचा प्रत्येक क्षण जगण्याचा निर्धार करण्यापर्यंतचा बाबुलालचा प्रवास हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध काही मिनिटांमध्ये संपतो मात्र त्यात नीरसता जास्त आहे. दत्तात्रेयची व्यक्तिरेखा गमतीशीर असल्याने कथानक हसते-खेळते राहते. खरी उलाढाल उत्तरार्धात घडते आणि तिथे कथेत नात्यांमधला जो संघर्ष आहे तो या दोन कलाकारांमुळे खूप प्रभावीपणे आणि तरीही सहज रंगतो.

वृद्धांच्या आजच्या समस्या खूप उघड आहेत. अनेकदा आपली मुले आर्थिक फायद्यासाठी आपला वापर करतायेत हे लक्षात येऊनही केवळ त्यांच्यावरच्या प्रेमापोटी सर्वस्व देऊन टाकण्याची घाई आईवडील करतात. आणि मग मुलांनी फसवले याच दु:खात, वेदनेत पुढचे आयुष्य येईल तसे जगत राहतात. इथे त्यांनी स्वत:साठी जगायला हवे हा विचार खूप ठळकपणे लेखिकेने आणि दिग्दर्शकानेही मांडला आहे. नाटकाचीच कथा असल्याने ती सेल्युलॉईडवर उमटली असली तरी नाटकासारखीच घडते. ‘हॅप्पी स्ट्रीट’ नावाचा एसटीडी, बुके विकणारी बाई अशी रंगीबेरंगी मोजकी दुकाने असणाऱ्या रस्त्याचा सेट किंवा या दोघांचा बंगला, त्यांच्या खोल्या या सगळ्या गोष्टी नाटकातील सेट्सप्रमाणेच दिसतात. वास्तवाचा अंश काही ठिकाणी नक्की जाणवतो विशेषत: बाबुलालसाठी दत्तात्रेयने आखून दिलेला प्रवास आणि त्या प्रवासादरम्यान बदलत गेलेली त्यांची भावावस्था हा प्रवास चित्रपटात खूप उत्तम जमून आला आहे.

हा चित्रपट प्रामुख्याने बंगल्यातच घडत असल्याने अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर या दोघांचा अभिनय हीच या चित्रपटाची जमेची बाजू होती. या दोघांनीही ती त्यांच्या सहजतेने उचलून धरली आहे मात्र तरीही त्यांचे विग, त्यांचा वावर हा काहीसा नाटकाच्याच पद्धतीने जाणारा आहे. त्यामुळे सेटवर घडणारा दीर्घाक कॅमेऱ्यात चित्रित झालेला पाहताना जो अनुभव येतो तो हा चित्रपट पाहताना जाणवत राहतो. अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर या दोघांच्याही तोंडी मधूनच गुजराती संवाद बाहेर पडतात. हा सगळा अट्टहास नाटकाच्या पद्धतीनेच जाणारा असल्याने चित्रपटाचा प्रभाव कमी होतो. अमिताभ बच्चन यांना आता या भूमिकांमध्ये पाहण्याचीही प्रेक्षकांना सवय झाली आहे. त्यामुळे कथेची आजच्या वास्तवाला धरून केलेली मांडणी आणि या दोन दिग्गज अभिनेत्यांची अदाकारी या दोन बाजूंमुळे चित्रपट ‘नॉट आऊट’ ठरला आहे.

१०२ नॉट आऊट

  • दिग्दर्शक – उमेश शुक्ला
  • कलाकार – अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, जिमित त्रिवेदी.

First Published on May 5, 2018 4:54 am

Web Title: 102 not out