25 April 2019

News Flash

अय्यारी.. : नेम नेमका हुकला!

‘अय्यारी’ बघून त्याच्या आधीच्या चित्रपटांची हटकून आठवण येते

चित्रपटातून राजकीय-सामाजिक घटनांवर अचूक भाष्य करत जनसामान्यांपर्यंत गोष्टीरुपात वास्तव पोहोचवण्याचा हातखंडा असलेला दिग्दर्शक म्हणून नीरज पांडेची ओळख आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटातली मांडणी ही रहस्यमय आणि धक्कातंत्राने पुरेपूर भरलेली असते. तीच मांडणी याही चित्रपटात आहे त्यामुळेच की काय.. एरव्ही विषयानुरूप प्रभावी मांडणी ‘अय्यारी’ पाहताना मात्र तोचतोचपणाचा अनुभव देऊन जाते. मात्र ज्या धाडसाने दिग्दर्शकाने संरक्षण मंत्रालय, नेते, शस्त्रास्त्रे विकणाऱ्या कंपन्यांचे संबंध या सगळ्या गोष्टींचे जाळे विणत देशभर चर्चिल्या गेलेल्या घोटाळ्यावर बोट ठेवले आहे त्याला तोड नाही. पण हे करताना कथेचा फाफटपसाराच इतका वाढला की त्यात दिग्दर्शकाचा नेम नेमका हुकला आहे. त्यामुळे ‘अय्यारी’ बघून त्याच्या आधीच्या चित्रपटांची हटकून आठवण येते आणि मग पदरी पडलेली निराशा किती मोठी आहे ही जाणीव अधिक त्रास देते.

‘अय्यारी’मध्ये ठळकपणे जाणवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन पिढय़ांमधील वैचारिक अंतर. इथे ते कर्नल अभयसिंह (मनोज बाजपेयी) आणि मेजर जय बक्षी (सिद्धार्थ मल्होत्रा) या दोघांच्या रुपाने दिसते. सैन्यदलप्रमुखांनी एका ‘स्पेशल इंटिलिजन्स स्क्वॉड’ची निर्मिती केली आहे. फारशी कोणाला माहिती नसलेले हे स्क्वॉड अडचणीत आले तर इतर ‘अंडरकव्हर एजंट’च्या बाबतीत जे होते तेच त्यांच्याही वाटय़ाला येणार आहे. या स्क्वॉडसाठी सेनाप्रमुखांनी जो २० कोटी रुपयांचा निधी घेतला आहे तोही अधिकृत नसल्याने सरकारी असूनही कोणीच वाली नसल्यासारखे हे युनिट अभयसिंगच्या प्रभावी नेतृत्वाखाली कार्यरत आहे. देशाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या या युनिटला भगदाड पडते जेव्हा आपण देशासाठी जे काम करतो आहोत त्याची किंमत कोणालाही नाही. इथे फक्त भ्रष्टाचार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपलाच बळी दिला जाणार हे जयला कळते. देशासाठी काम करेन, पण व्यवस्थेचा बळी ठरणार नाही, असा निर्धार केलेला जय स्वत:चा मार्ग बदलतो. आणि आजवर एकमेकांच्या साथीने काम केलेले गुरू-शिष्य एकमेकांसमोर उभे ठाकतात. या दोघांमध्ये कोणीच भ्रष्टाचारी नाही किंवा चुकीचा नाही. संघर्ष सुरू झालाच असेल तर तो या दोघांच्या भिन्न वैचारिक दृष्टिकोनामुळेच. अशावेळी या दोघांमध्ये पाठशिवणीचा खेळ दिग्दर्शकाने रंगवला आहे. या खेळाला संरक्षण मंत्रालयातील आजी-माजी अधिकारी, राजकीय नेते आणि शस्त्रास्त्र विक्री करणाऱ्या विदेशी कंपन्यांची साखळी, त्यांची कार्यपद्धती या सगळ्या पाश् र्वभूमीचची जोड दिग्दर्शकाने दिली आहे. मात्र ज्या नेमक्या विषयासाठी हा पाठशिवणीचा खेळ रंगवला तो अगदी शेवटाकडे चित्रपटात येतो. तोवर आपण जे पाहतो ते नीरज पांडे दिग्दर्शित किंवा निर्मित चित्रपटांमधून अनेकदा पाहिलेले असल्याने त्यात नवे काही नाही आणि म्हणूनच चित्रपट जास्त निराशा करतो.

एकाचवेळी अनेक गोष्टींवर भाष्य करण्याचा दिग्दर्शकाच्या अट्टहासापायी मूळ विषय बाजूला पडला आहे. माजी संरक्षण अधिकाऱ्यांनी अव्वाच्या सव्वा मोजून देशासाठी शस्त्रे विकत घेण्याचा घातलेला घाट आणि चित्रपटाच्या शेवटी उघड होणारा घोटाळा या दोन घटना जोडल्या जात नाहीत. तर त्या दोन स्वतंत्र घटना म्हणून समोर येतात आणि त्यामुळे कथेतच हा दुवा कच्चा असल्याने पडद्यावरही त्याचा एकसंध प्रभाव उमटत नाही. अर्थात, हा कच्चा दुवाही सांधता आला असता जर या चित्रपटातील दोन प्रमुख व्यक्तिरेखांचा संघर्ष केंद्रस्थानी राहिला असता मात्र तेही होत नाही. मनोज बाजपेयीने आपल्या जोरावर कर्नल अभयसिंगची भूमिका तारून नेली आहे. त्याच्या नेहमीच्या कधी खेळकर, कधी कठोर अशा पद्धतीने ही भूमिका त्याने जिवंत केली आहे. मात्र त्याच्या विरोधात जय बक्षीची व्यक्तिरेखा उभी रहायला हवी होती, प्रत्यक्षात जयच्या मनात त्यांच्याबद्दल आदरच आहे त्यामुळे त्याच्याकडून संघर्ष तितक्या जोरकसपणे उभा राहत नाही. सिद्धार्थने अगदी दोन वेगळी भन्नाट रुपेही यात घेतली आहेत पण तरीही त्याची व्यक्तिरेखा गोंधळातच अडकलेली असल्याने ना या बाजूचा ना त्या बाजूचा हा गोंधळ त्याच्या अभिनयातही उमटतो. त्याच्या प्रेमकथेलाही फारसा वाव देण्यात आलेला नाही. चित्रपटात ठराविक साच्यात वापरण्यात आलेले पाश्र्वसंगीतही आता ओळखीचे वाटू लागले आहे. कारण नसताना केवळ पाठलागांची दृष्ये प्रभावी व्हावीत म्हणून येणारे पाश्र्वसंगीत, त्याला मध्येच तोडत येणारे रोमँटिंग गाणे ही खिचडी चित्रपटाचा परिणाम कमी करणारी ठरली आहे. माजी भ्रष्टाचारी अधिकारी गुरिंदरची भूमिका करणारे कुमुद मिश्रा, बाबुराव शास्त्री ही व्यक्तिरेखा फक्त शेवटासाठी वापरली आहे त्यात नसिरुद्दीन शहा, शस्त्रास्त्र विक्रेता मुकेश कपूर या खलनायकी भूमिकेत आदिल हुसैन, अगदी छोटय़ाशा भूमिकेत अनुपम खेर अशी तगडी कलाकार मंडळी असूनही चित्रपट फिका पडला आहे. खरे म्हणजे ज्या घोटाळ्यावर हा चित्रपट बोट ठेवतो त्यावर चित्रपटातून आजवर कोणी भाष्य केलेले नाही. पण केवळ त्यामागचा भ्रष्टाचार त्याच त्याच पद्धतीने दाखवण्यापलीकडे चित्रपट नवीन काहीच देत नाही आणि हेच या चित्रपटाचे अपयश आहे!

  • दिग्दर्शक – नीरज पांडे
  • कलाकार – मनोज बाजपेयी, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत सिंग, पूजा चोप्रा, विक्रम गोखले, अनुपम खेर, आदिल हुसैन, नसीरुद्दीन शहा, कुमुद मिश्रा.

First Published on February 17, 2018 2:41 am

Web Title: %e0%a4%85%e0%a4%af%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%ae %e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%be %e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be