20 April 2019

News Flash

कालातीत आशय

१९८१ साली घडलेल्या सत्यघटनेवर आधारित ‘रेड’ हा चित्रपट आहे.

१९८१ साली घडलेल्या सत्यघटनेवर आधारित ‘रेड’ हा चित्रपट आहे. सत्यघटनेवर आधारित चित्रपट करत असताना कित्येकदा त्या घटनेच्या नायकाला जाणूनबुजून हिरो म्हणून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचे असामान्यत्व हे त्याने त्या परिस्थितीत दाखवलेल्या कर्तृत्वामुळे अधोरेखित झालेले असते याचे भानच कित्येकदा विसरले जाते. दिग्दर्शक म्हणून राजकुमार गुप्ता यांनी हा मोह टाळून त्या घटनेशी प्रामाणिक राहत त्यातून अनेक विषयांवर बोट ठेवले आहे. प्रशासकीय-शासकीय अधिकारी, त्यांचे काम, या अधिकाऱ्यांना आपल्या दावणीला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करणारे राजकीय नेते, भ्रष्ट्राचार हे विषय वर्षांनुवर्ष त्याच पद्धतीने पुढे जात राहिले आहेत. ‘रेड’ मध्ये एका सामान्य प्राप्तिकर अधिकाऱ्याने दाखवलेल्या धाडसाची कथा सांगण्याच्या निमित्ताने दिग्दर्शकाने पुन्हा सर्वानाच या विषयांवर नव्याने विचार करायला भाग पाडले आहे.  प्राप्तिकर अधिकाऱ्यांचे छापे आणि त्या जाळ्यात अडकणारी बडी बडी धेंडे, या छाप्यांच्या बाबतीत पाळावी लागणारी गुप्तता याचा पुरेपूर वापर बॉलीवुडने आपल्या तद्दन व्यावसायिक चित्रपटांसाठी करून घेतला आहे.

‘रेड’मध्ये मात्र आपल्या देशात सर्वाधिक काळ चाललेली प्राप्तिकर अधिकाऱ्यांची कारवाई म्हणून ओळखली जाणारी घटना दिग्दर्शकाने चित्रपटातून पडद्यावर जिवंत केली आहे. १९८१ मध्ये कानपूर शहरात काँग्रेसच्या आमदाराच्या घरावर प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. या छाप्यात त्यांना प्रचंड मोठी रोकड, दागिने हाती लागले होते. या घटनेवर चित्रपटाची कथा बेतली आहे. लखनऊ शहरात ३९ व्या बदलीवर आलेल्या प्राप्तिकर अधिकाऱ्याची अमय पटनाईकची (अजय देवगण) कथा चित्रपटात पहायला मिळते. लखनऊमध्ये येऊन कामाची सूत्रे हातात घेतल्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच त्याला ‘खबर’ मिळते. मिळालेली खबर आणि संबंधित व्यक्तीची करविवरणपत्रे याचा अभ्यास केल्यानंतर संबंधित माहिती बरोबर आहे याची खातरजमा केल्यानंतर अमय पटनाईक विभागाकडून रितसर परवानगी घेऊन आमदार रामेश्वर सिंग (सौरभ शुक्ला) यांच्या घरावर छापा मारतो. पैशाच्या, सत्तेच्या जोरावर आपण काहीही करू शकतो याचा माज असलेला आमदार या अधिकाऱ्याला आल्या पावली परत जाण्याची धमकी देतो. त्यानंतरचा चित्रपट हा रामेश्वर सिंग यांच्या घरातील अधिकाऱ्यांची कारवाई, दडवलेल्या बेहिशेबी मालमत्तेचा शोध, त्यादरम्यान त्यांची होणारी अडवणूक या सगळ्या गोष्टी चित्रपटात पहायला मिळतात.

१९८१ साली घडलेल्या या घटनेचे चित्रण पाहताना परिस्थिती आजही बदललेली नाही हे दिग्दर्शकाने अधोरेखित केले आहे.   ऐंशीच्या दशकात जेव्हा मोबाईल सोडाच अन्य सुविधाही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या होत्या. एखाद्या अधिकाऱ्याला मारून टाकणे आणि त्याची कानोकान माहिती न मिळणे ही सोपी अस्त्रे होती. त्याकाळात केवळ आपला प्रामाणिकपणा आणि कर्तव्य चोख बजावण्याच्या भावनेतून वावरणाऱ्या अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही इतकी मोठी कारवाई प्रत्यक्षात आणली. उत्तरप्रदेश आणि परिसरात त्यावेळी प्राप्तिकर अधिकाऱ्यांवरचे हल्ले, त्यांना मारहाण हे प्रकार राजरोसपणे होत होते आणि त्याचे चित्रण दिग्दर्शकाने तितक्याच सरळ पध्दतीने केले आहे. अर्थातच इथे नायक अजय देवगण असल्याने त्याच्य तोंडी हमखास टाळ्या मिळतील, असे संवाद दिग्दर्शकाने पेरले असले तरी कुठल्याही क्षणी हा हिरो बंदूक घेऊन समोरच्या नेत्याचे काम तमाम करेल किमानपक्षी ‘सिंघम’ स्टाईल धोबीपछाड करेल, असे आपल्याला वाटत राहते. प्रत्यक्षात तसे होत नाही. कुठल्याही परिस्थितीत दबावाला बळी न पडता आपल्या चोख कामातून गुन्हेगाराला अडकवण्याची त्याची जिद्द हीच इथे हिरो ठरते. सरकारी व्यवस्थेतील कच्चे दुवे माहित असतानाही त्याच व्यवस्थेत राहून, इतर सहकाऱ्यांमध्येही कर्तव्याची भावना जागवत आपले कर्तव्य बजावण्याची प्रेरणा जागवणाऱ्या अशा अनेक सामान्य अधिकाऱ्यांच्या असामान्य कथा या आजच्या काळात लोकांसमोर येणे गरजेचे आहे. जे काम दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी केले आहे. अजय देवगण आणि सौरभ शुक्ला यांच्या अभिनयाची जुगलबंदी हे चित्रपटाचे वैशिष्ठय़ ठरले आहे, मात्र या दोघांशिवाय कोही व्यक्तिरेखा अधिक ठळकपणे यायला हव्या होत्या. त्यांची ओळख दिग्दर्शक मुद्दामहून करून देतो मात्र आता त्यांचे काम दिसेल, नंतर दिसेल अशी वाट पाहणाऱ्यांच्या हाती मात्र निराशाच येते. तीच गोष्ट अवेळी वाजणाऱ्या गाण्यांची. अजय देवगण आणि इलियाना यांच्यातील प्रेमभरे प्रसंग रंगवण्यासाठी वाजणारी ही गाणी कथेच्या दृष्टीने गरजेची नव्हती. त्यामुळे त्यांचा खोळंबाच जास्त वाटतो. मात्र या एखाददोन गोष्टी सोडल्या तर दिग्दर्शकाने त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये एक सुंदर वास्तवाच्या जवळ नेणारा, कालातीत आशय असणारा चित्रपट दिला आहे.

रेड

  • दिग्दर्शक – राजकुमार गुप्ता
  • कलाकार – अजय देवगण, इलियाना डिक्रुझ, सौरभ शुक्ला, गायत्री अय्यर, सानंद वर्मा, अमित सियाल, अमित बिमरोत.

First Published on March 17, 2018 5:27 am

Web Title: %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a4 %e0%a4%86%e0%a4%b6%e0%a4%af