18 February 2019

News Flash

दोन जीवांची गोष्ट

प्रेमात पडल्यावर किंवा जोडीदार पाहून, निवडून लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर एकमेकांचे करिअर, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, एक मेकांचे स्वातंत्र्य जपणे, आपले स्वभाव-आवडीनिवडी यांची जुळवाजुळव करत प्रेमाचा

प्रेमात पडल्यावर किंवा जोडीदार पाहून, निवडून लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर एकमेकांचे करिअर, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, एक मेकांचे स्वातंत्र्य जपणे, आपले स्वभाव-आवडीनिवडी यांची जुळवाजुळव करत प्रेमाचा संसार करण्याची कसरत हे हरएक जोडपे करत असते. विशेषत: सगळ्यांना सगळे काही माहिती असण्याच्या आजच्या काळात करिअरप्रमाणेच संसारातील संभाव्य अडचणी काय असू शकतील, त्यावर उपाय काय करायचे आणि तेही आपल्या आवडीला, तत्त्वांना मुरड न घालता.. एवढे सगळे असूनही हमखास लग्नानंतर ती समीकरणे गडबडतात. एकत्र येण्याच्या उद्देशाने आलेले दोन जीव एकमेकांपासून दूर जात राहतात. ही प्रक्रिया विश्वास जोशी दिग्दर्शित ‘व्हॉट्सअप लग्न’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा अनुभवायला मिळाली आहे.

एरव्ही जबाबदारीने वागणारी मुलगी आणि कर्तव्यदक्ष, हुशार असला तरी आपल्याला हवे तसे वागणारा मुलगा अशी व्यक्तिरेखांची सर्वसाधारण मांडणी दिसते. ‘व्हॉट्सअप लग्न’ या चित्रपटात ती बरोबर उलटी आणि त्याअर्थाने आजच्या पद्धतीची मांडणी करण्यात आली आहे. आकाश प्रधान (वैभव तत्त्ववादी) हा आयटी कंपनीत अतिशय मेहनतीने उच्चपदावर पोहोचलेला तरुण आहे. एकटे राहण्याची सवय असलेल्या आकाशला घरच काय आपली प्रत्येक गोष्ट नीटनेटकेपणाने ठेवण्याची, वेळेवर सगळ्या गोष्टी करण्याची सवय आहे. तर त्याउलट अवस्था अनन्याची (प्रार्थना बेहरे) आहे. अनन्या एक होतकरू अभिनेत्री आहे. केवळ नाटकांमधून काम करण्याला प्राधान्य देणारी अनन्याची कुठलीच गोष्ट नीटनेटकी नाही आणि वेळेवरही नाही. अनन्या खूप लाडात आणि स्वातंत्र्यात वाढली आहे. तिला तिच्या मनाप्रमाणे कुठलीही गोष्ट करण्याची मुभा आहे. या दोन टोकाच्या व्यक्तिरेखा योगायोगाने एकत्र येतात. आपण दोघेही वेगवेगळे आहोत याचीही त्यांना पूर्ण कल्पना आहे. आणि तरीही ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि रीतसर लग्नही करतात. अर्थात, इथे दोघांच्याही घरच्या मंडळींचे स्वभावही वेगवेगळे आहेत, मात्र त्यांनाही आपल्या पद्धतीने एकत्र आणण्यात आकाश-अनन्या यशस्वी ठरतात. लग्न झाल्यावर मधुचंद्र सरत नाही तोवर दोघेही आपापल्या करिअरच्या मागे धावायला सुरुवात करतात आणि आपण चुकतो आहोत हे लक्षात येऊनही एकमेकांमधला संवाद हरवून बसतात.

‘व्हॉट्सअप लग्न’ची गोष्ट ही पूर्ण वेगळी आहे असे काही म्हणता येणार नाही. किंबहुना, सध्या प्रेमाची, नात्याची हीच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जाते. तोच प्रकार याही चित्रपटाच्या बाबतीत म्हणता येईल. यातली मांडणी एकतर खूप प्रामाणिक आणि अगदी आजच्या काळातील वातावरण, व्यक्ती-प्रवृत्ती यांचे वास्तव चित्रण करणारी आहे. त्यामुळे ही कथा आपली वाटते, यातल्या व्यक्तिरेखा या जवळपास प्रत्येक घरात पाहायला मिळतील. मस्त चुरचुरीत संवाद, मनमोकळेपणाने त्यांचे व्यक्त होणे यामुळे हा चित्रपट मांडणीच्या बाबतीत खूप ताजा वाटतो. आकाश आणि अनन्याचे वेगळेपण दिग्दर्शकाने अगदी बारीक तपशिलासह रंगवले आहे. अनेकदा करिअर-घर दोन्हीचा समतोल साधताना आपल्या जोडीदाराबद्दलचे निकष, त्याच्या स्वभावानुसार आपणच पुढे काय घडणार याचे ठोकताळे बांधत राहतो. समोरच्याची बाजू समजून घेण्यापेक्षा तो असाच वागणार या गृहीतकाप्रमाणे आपण वागत राहतो. ही बाजू इथे अनन्याच्या बाबतीत घडते मात्र आकाशही तसेच वागताना दिसत नाही. कामामुळे एकमेकांबरोबर हरवत चाललेला संवाद हे त्यामागचे कारण आहे असे आकाशला वाटत राहते आणि तो त्यादृष्टीने प्रयत्न करतो.

या दोघांचेही स्वभाव आणि त्यानुसार त्यांची व्यक्त होण्याची पद्धती दिग्दर्शकाने खूप सहज पद्धतीने रंगवली आहे. त्यामुळे आकाश आणि अनन्याचा उडालेला गोंधळ अवास्तव वाटत नाही. मात्र याची वास्तवाच्या जवळ जाणारी मांडणी करण्याच्या नादात चित्रपट खूपच लांबला आहे.  शिवाय, प्रेमकथांना श्रवणीय गाण्यांची जोड असेल तर तो सिनेमा जास्त प्रभावी वाटतो. इथे गाणी त्याबाबतीत कमी पडली आहेत. दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्याच प्रयत्नात विश्वास जोशी यांनी आजच्या काळातील लग्नाची ही कथा रंगवताना बदलत चाललेल्या नातेसंबंधांचे पदरही स्पष्टपणे उलगडून दाखवले आहेत. मग तो अनन्या आणि तिचे वडील यांच्यातील संवाद असेल किंवा जोडप्याच्या मानसिक गरजा असतात, तशाच लैंगिकही असतात याचा स्पष्ट उल्लेख असेल विश्वास जोशी यांनी अतिशय

संयतपणे हे बारकावे टिपले आहेत. त्यांना कलाकारांची उत्तम साथ मिळाली आहे. वैभव आणि प्रार्थना खूप दिवसांनी चांगल्या भूमिकेत पाहायला मिळाले. या दोघांनाही इला भाटे, विद्याधर जोशी, वंदना गुप्ते, विक्रम गोखले अशा नावाजलेल्या कलाकारांची साथ मिळाली असल्याने एक उत्तम कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या वाटय़ाला आला आहे.

व्हॉट्सअप लग्न

  • दिग्दर्शक – विश्वास जोशी
  • कलाकार – वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहरे, विद्याधर जोशी, इला भाटे, विनी जगताप, वंदना गुप्ते, स्नेहा रायकर, विक्रम गोखले, सुनील बर्वे, सविता मालपेकर.

First Published on March 17, 2018 5:23 am

Web Title: %e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8 %e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f