17 February 2019

News Flash

प्रवृत्तींचा खेळ

आपल्याच काळ्या वृत्तींवरही भाष्य करणारा असा हा चित्रपट आहे.

एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेतील व्यक्ती ज्या प्रवृत्तीची आहे तिच्या वर्तनानुसार पुढे घडणाऱ्या घटना या एकतर चांगल्या किंवा वाईट ठरतात. मात्र खल प्रवृत्तीच्या हातून चांगले वर्तन घडणारच नाही असे नाही आणि चांगल्या व्यक्तीकडून वाईट वर्तन होतच नाही, हेही म्हणणे धाडसाचे ठरते. किंबहुना, आजच्या काळात धुतल्या तांदळासारखा कोणी भेटणे कठीणच. प्रत्येकाच्या मनात चोर आहे हेच समजून अनेकदा कृती होत असते. ‘ब्लॅकमेल’ चित्रपटात दिग्दर्शक अभिनय देवने असाच वृत्ती-प्रवृत्तींचा खेळ रंगवला आहे. उंदीर-मांजराच्या या अजब खेळात सत्याचा असत्यावर विजय असा कुठलाच सरधोपट निष्कर्ष काढून उपयोग नाही. ब्लॅक कॉमेडीच्या अंगाने जाणारा हा चित्रपट आपल्याच रोजच्या जगण्यातील विरोधाभास सहजतेने दाखवून देतो.

रोज कार्यालयात उशिरापर्यंत थांबणारा देव कौशल (इरफान खान). त्याच्या कार्यालयात उशिरा थांबण्याचे कारण हे खूप काम असणे नाही, हे दिग्दर्शक पहिल्याच प्रसंगात स्पष्ट करतो. पत्नीप्रेमासाठी आसुसलेला देव कार्यालयात उशिरा थांबून आपल्या सहकाऱ्यांच्या बायकांची छायाचित्रे समोर ठेवत हस्तमैथुनावर आपली तहान भागवतो. त्याच्या वैवाहिक नात्यातील तणाव लक्षात येतो, मात्र त्यामागचे कारण देवला माहिती नाही. मित्राच्या सांगण्यावरून देव आपल्या पत्नीला खूश करण्यासाठी तिला न सांगता लवकर घरी पोहोचतो. आणि त्याला या तणावामागचे कारण समोर दिसते. देवची पत्नी रीनाचे (कीर्ती कुलहारी) तिचा पूर्वीचा प्रियकर रणजितबरोबर (अरुणोदय सिंग) विवाहबाह्य़ संबंध आहेत. अचानक समोर आलेले हे सत्य पचवणे देवला अवघड जाते. त्या प्रसंगात आपण रागाने पत्नीची हत्या करतो आहोत. नाहीतर तिच्या प्रियकराची हत्या करतो आहोत, या दोन्ही घटना देवसमोर तरळून जातात. मात्र या दोन्हीपैकी काहीही न करता तो बदला घेण्यासाठी पत्नीच्या प्रियकराला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो. इथून पुढे ब्लॅकमेलिंगचा एक वेगळाच खेळ सुरू होतो, जो एके क अनपेक्षित घटनांना आमंत्रण देत जातो. त्या घटनांमध्ये दिग्दर्शकाने रंगवलेली पात्रे आपल्या मूळ प्रवृत्तींनुसार वागत जातात आणि या खेळाचा गुंता वाढत राहतो.

‘ब्लॅकमेल’ची कथा बांधताना दिग्दर्शक त्यातले रहस्य म्हणण्यापेक्षा पुढे काय होणार आहे? यामागची उत्सुकता कायम ठेवण्यात किंवा वाढवण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत प्रेक्षक चित्रपट बघत राहतो. मात्र एका मर्यादेनंतर चित्रपटाची कथाकल्पना जी सुरुवातीला रंजक वळणाने सुरू झाली होती ती एखाद्या भरधाव गाडीप्रमाणे रस्त्यात येणारी प्रत्येक गोष्ट उडवत जावी तसा चित्रपट पुढे जातो. देवचा ब्लॅक मेलिंगचा कट कळल्यानंतर पैसा उकळण्याच्या उद्देशाने त्यालाच ब्लॅकमेल करणारी त्याची सहकारी प्रभा (अनुजा साठे) ही व्यक्तिरेखा कथेला रंजक वळणावर आणून ठेवते. त्यानंतर अशा अवघड परिस्थितीत सापडलेल्यांचा उंदीर मांजराचा खेळ सुरू होतो तेव्हा काहीएक हुशारी अपेक्षित असते. दुर्दैवाने, या चित्रपटातील कथा त्यामानाने सरधोपट मार्ग निवडते. त्यामुळे मग देव, रणजित, रणजितची श्रीमंत बायको अदिती (दिव्या दत्ता) आणि रीना यांच्यातला ब्लॅकमेलिंगचा पाठशिवणीचा खेळ आपल्याला पाहावा लागतो. यात देवच्या बॉसची आणखी एक व्यक्तिरेखा आहे. ओमी वैद्य याने साकारलेला हा बॉस फक्त विनोद निर्मितीसाठी वापरला आहे. तो आणि त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठीच्या त्याच्या क्लृप्त्या त्याच्यावरच उलटतात. याचा तसा कथेशी थेट संबंध नाही, मात्र बॉसच्या व्यक्तिरेखेसह अनेक गोष्टी ‘दिल्ली बेली’ या चित्रपटाप्रमाणेच दिग्दर्शक  अभिनय देव यांनी थेट, काहीही न लपवता बिनधास्त बोलणाऱ्या दाखवल्या आहेत. पण या व्यक्तिरेखांच्या घोळात चित्रपट उगाच ताणला गेला आहे. पूर्वार्धानंतर चित्रपट खऱ्या अर्थाने वेग घेतो. ‘ब्लॅकमेल’ हा त्या अर्थाने निखळ मनोरंजन करणारा चित्रपट नाही. तो उपहासातून अनेक गोष्टींवर बोट ठेवत जातो. इरफान खान हा या चित्रपटाचा जीव आहे. पूर्ण चित्रपट त्याने आपल्या खांद्यावर तोलून धरला आहे. बाकीचे सगळेच कलाकार आपापल्या पद्धतीने फिट बसले असले. तरी इरफान खान आणि अगदी छोटय़ा भूमिकेतही दिव्या दत्ता यांनी अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. चित्रपटाचे संगीत हे कथानक पुढे नेण्याचे काम करते. वृत्ती-प्रवृत्तींचा या चित्रपटात रंगवलेला खेळ बॉलीवूडच्या नेहमीच्या मसालापटांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. मात्र हा खेळ मध्येच थक वतो, त्रासदायकही वाटतो पण तो नुसताच ‘ब्लॅकमेलिंग’वरचा चित्रपट नाही. त्यातून आपल्याच काळ्या वृत्तींवरही भाष्य करणारा असा हा चित्रपट आहे.आपल्याच काळ्या वृत्तींवरही भाष्य करणारा असा हा चित्रपट आहे.

ब्लॅकमेल

  • दिग्दर्शक – अभिनय देव
  • कलाकार – इरफान खान, कीर्ती कुलहारी, अरुणोदय सिंग, दिव्या दत्ता, ओमी वैद्य, अनुजा साठय़े, प्रद्युम्न सिंग, गजराज राव.

First Published on April 7, 2018 5:13 am

Web Title: %e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3