23 February 2019

News Flash

प्रेम.. जे दिसत नाही!

शूजित सिरकार दिग्दर्शित ‘ऑक्टोबर’ हा असाच एका वेडय़ाच्या आयुष्यातील तरल भावनेचा बंध आहे.

आयुष्य धावपळीचे झाले आहे, एका शर्यतीत धावतो आहोत वगैरे भावना आपल्याही गळी इतक्या सहज उतरल्या आहेत की दिवसभराच्या घटनांमध्येही सतत नाटय़ दिसतं. सकाळी उठलयापासून रात्री झोपेपर्यंतच्या गोष्टी यांत्रिकपणे करत राहतो आणि मग कधी तरी, जगायचे राहूनच गेले, असा उसासाही टाकतो. जे करायचे आहे ते व्यवहार म्हणून नव्हे, मनापासून करावेसे वाटते म्हणून त्या गोष्टी करण्याचा अट्टहास स्वत:कडेच धरत नाही, तर दुसऱ्याला कुठून सांगणार? जगाच्या तथाकथित व्यवहारांना धाब्यावर बसवत मनाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणारी माणसे आपल्या दृष्टीने वेडी ठरतात. शूजित सिरकार दिग्दर्शित ‘ऑक्टोबर’ हा असाच एका वेडय़ाच्या आयुष्यातील तरल भावनेचा बंध आहे.

चित्रपटाच्या नावात प्राजक्ताचे फूल दडलेले दिसते. त्या फुलाचा आणि ऑक्टोबरचा संबंधही या कथेत एका क्षणात आपण तोवर सवयीने दूरच ठेवलेल्या कोमात असलेल्या नायिकेशी शिवुलीशी (बनिता संधू) जोडून घेतो. या चित्रपटाच्या कथेचा विचार करताना चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळीची आठवण होते. झाडावरून प्राजक्त ओघळतो, त्याचा आवाज होत नाही.. झाडावरून सहज ओघळणाऱ्या, कुठेही पडला तरी सुगंध पसरवत राहणाऱ्या त्या प्राजक्तासारखीच ही प्रेमकथा आहे. प्रेम जे दिसत नाही ते फक्त जाणिवेच्या पातळीवर आहे. तेही वरवर विक्षिप्त वाटणाऱ्या डॅनच्या (वरुण धवन) मनात रुजलं आहे. दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हॉटेल व्यवस्थापनाचे धडे घेणारा डॅन आणि त्याची मित्रमंडळी. शिवुली ज्युनिअर म्हणून रुजू झाली आहे. सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा डॅन म्हटले तर सगळ्यांचा आहे, पण समाजाच्या नियमांना फटकारत जगण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे तो तसा कोणाचाही नाही. डॅन खूप चांगला आहे, मात्र त्याच्या सडेतोड वागण्याने तो कुठल्याच विभागात टिकत नाही. त्याच्या चांगुलपणामुळे, त्याच्या या वेगळेपणामुळे त्याला कोणी सहजी दूरही करत नाहीत. डॅन आणि शिवुलीमध्ये घट्ट मैत्रीही झालेली नाही. डॅनचा वेगळेपणा शिवुलीला जाणवला आहे पण स्वत:चे काम प्रामाणिकणे करण्यात गुंतलेली शिवुली आणि डॅन हे दोघेही आपापल्या विश्वात मग्न आहेत. एका अनाहूत क्षणी शिवुलीच्या जिवावर बेतणारी घटना घडते आणि डॅनचे जग बदलून जाते.

एखाद्या ललित कथेप्रमाणे सिरकारने ‘ऑक्टोबर’ ही क था पडद्यावर उतरवली आहे. आजवरचे त्यांचे चित्रपट पाहता मांडणी आणि क था सगळ्याच बाबतीत ‘ऑक्टोबर’ हा शुजितचा वेगळा प्रयोग ठरला आहे. अतिशय सरळ-साधेपणाने ही कथा उलगडत जाते. हा चित्रपट जितका दिग्दर्शकाचा आहे तितकाच तो वरुण धवनचा आहे. संपूर्ण चित्रपट त्याने पेलून धरला आहे. अभिनयाच्या बाबतीत तो आणखी एक पायरी वर चढला आहे. वरुणचा एक ओळखीचा चेहरा सोडला तर शिवुलीच्या भूमिकेतील बनिता संधूसह सगळेच कलाकार पूर्णपणे नवे आहेत. बनिता संधूने पहिलीच भूमिका सशक्तपणे साकारली असली तरी हा चित्रपट वरुणचाच आहे.

आणखी एक चेहरा या चित्रपटात महत्त्वाचा ठरला आहे तो शिवुलीच्या आईची भूमिका करणाऱ्या गीतांजली रावचा. स्वत: चित्रपटकर्मी, अ‍ॅनिमेटर असलेल्या या अभिनेत्रीने भूमिकेची दखल घ्यायला लावली आहे. रूढार्थाने ही प्रेमकथा नाही. कारण इथे कुठेच नायक-नायिका गाणी गात नाहीत किंवा प्रेमाची कबुली देत नाहीत. एकाने दुसऱ्याचा विचार करावा आणि दुसऱ्याने त्याच्या आपल्याप्रति असलेल्या या भावनेचा स्वीकार करत तो बंध घट्ट धरून मनं जोडावीत असा हा प्रकार. तुम्ही प्रेमसुद्धा काही मिळाल्याशिवाय करत नाही का, असा प्रश्न डॅन आपल्या मैत्रिणीला विचारतो. निरपेक्ष प्रेम ही भावना माणसांना एकमेकांशी जोडणारी आहे पण जगाच्या व्यवहारांचे नाव देत ही भावनाच मान्य करत नाही, प्रसंगी तिला मारून टाकतो. ‘ऑक्टोबर’च्या साध्या-सरळ कथेतून दिग्दर्शकाने त्याच भावनेपाशी प्रेक्षकांना आणून सोडले आहे. केवळ संवेदनांमधून व्यक्त होणाऱ्या शिवुलीच्या मनाचा वेध घेणारा डॅन आणि शारीर पातळीवर निश्चेष्ट असलेल्या शिवुलीच्या मनाला डॅनच्या भावनांचा अर्थ याला प्रेम म्हणा मैत्री म्हणा वा माणुसकी! दिग्दर्शकाने ते प्रेक्षकांवर सोडले आहे. पण या दोन व्यक्तिरेखांमधले अफलातून रंगवेले नि:शब्द प्रसंग ही दिग्दर्शनाची ताकद दाखवून देतात.

ऑक्टोबर

  • दिग्दर्शक – शूजित सिरकार
  • कलाकार – वरुण धवन, बनिता संधू, गीतांजली राव, प्रशांत सिंग.

First Published on April 14, 2018 3:00 am

Web Title: %e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%ae %e0%a4%9c%e0%a5%87 %e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%a4 %e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80