17 February 2019

News Flash

भावनेत हरवलेली गोष्ट

मानवी भावभावना ही प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक माजिद मजिदी यांच्या चित्रपटांची खासियत आहे.

मानवी भावभावना ही प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक माजिद मजिदी यांच्या चित्रपटांची खासियत आहे. साधीच गोष्ट त्याच सहजतेने, सुंदरतेने मांडणारी त्यांची नजर मुंबईच्या गल्ल्यांमधून फिरतानाही त्याच प्रेमाने फिरली आहे. त्यामुळे ‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटाचे प्रोमोज पाहिल्यानंतर तो डॅनी बोएल यांच्या ‘स्लमडॉग मिलेनिअर’सारखाच असेल अशी जी शक्यता मनाला ग्रासून टाकत होती, त्याच्या जवळपासही हा चित्रपट नाही. साम्यच नाही म्हणायचे कारण नाही, शेवटी दोन्ही चित्रपटांचे सळसळत्या उत्साहाने भरलेले, सतत मोठे होण्याचा ध्यास घेतलेले कथानायक आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे स्वप्न-वास्तवात हिंदकळणारे त्यांचे आयुष्य सारखेच आहे. फरक आहे तो म्हणजे या भवतालातही माजिदींच्या संवेदनशील नजरेने केवळ मानवी नातेसंबंध टिपले आहेत आणि त्याचीच कथा गुंफली आहे.

माजिद मजिदींच्या नजरेने नेमके काय टिपले असेल? याची उत्सुकता त्यांचे चित्रपट पाहून प्रभावित झालेल्यांना असणे साहजिक आहे. त्यामुळे ‘बियाँड द क्लाऊड्स’ हा चित्रपट पाहताना त्याची हाताळणी आपल्याला ओळखीची वाटते. मात्र त्यांच्या नजरेतून त्यांनी दाखवलेले जग आपण बॉलीवूडपटांमधून अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवले असल्याने कथेपेक्षाही नजरेतून बोलणारी त्यांची पात्रे या चित्रपटात जास्त प्रभावी ठरतात. चित्रपटाच्या सुरुवातीलाच फ्रेम आहे ती दोन पाइपलाइनच्यामधून गेलेल्या मोकळ्या रस्त्याची.. त्याच वाटेने चित्रपटाचा कथानायक आमिर (इशान खत्तार) त्याच्या मित्राबरोबर बाइकवरून भर्रकन पुढे जातो आणि पडद्यावर ‘बियाँड द क्लाऊड्स’ ही अक्षरे उमटतात. आपल्याकडे रस्त्याखाली, पुलांखाली वसलेले विश्व इतक्या प्रेमाने बघण्याची आपल्या नजरांना सवय नाही. ते भीषण वास्तव आहे आणि ते त्याच पद्धतीने अंगावर येईल असेच दाखवायला हवे. इथे मात्र तसे होत नाही. म्हणजे त्यांची परिस्थिती बदलली आहे असे नाही पण त्या वास्तवावर बोट ठेवण्यापेक्षा त्यांच्या मनातली वादळे, इच्छा-आकांक्षा आणि त्याच्या पूर्तीसाठी सुरू असलेली त्यांची धडपड प्रामुख्याने दिसते, जाणवते. अमली पदार्थाची पाकिटं सराईतपणे ठरलेल्या ठिकाणी पोहोचवत कमाई करणारा आमिर स्वच्छंदी आहे. त्याला आयुष्यात मोठं व्हायचं आहे, आहे तो क्षण आनंदात जगायचा आहे. जगा आणि जगू द्या.. तत्त्वाने वागणाऱ्या आमिरची स्वप्नं एका क्षणात उधळली जातात ती दोन व्यक्तींच्या हव्यासातून.. या दोन्ही व्यक्ती आणि घडणाऱ्या घटना स्वतंत्र आहेत. मात्र दोन्हीक डे आमिर बांधला गेला आहे. एक घटना त्याच्यावरच्या रागातून घडली आहे तर दुसरी त्याची बहीण ताराशी (मालविका मोहनन) जोडलेली आहे. त्या घटनेनंतर तारा तुरुंगात पोहोचते आणि तिला सोडवण्यासाठी आमिरचा संघर्ष सुरू होतो. दोन समांतर पातळ्यांवर घडणारी ही कथा शेवटपर्यंत त्याच पद्धतीने पुढे जाते.

मजिदींच्या या गोष्टीतली प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळी आहे. तारा आणि आमिर दोघेही अनाथ आहेत आणि तरीही एकमेकांना भाऊ-बहीण मानतायेत. दोघेही त्या मायेने घट्ट बांधले गेलेले आहेत. दोघांच्याही एकमेकांविषयीच्या परिस्थितीवश असलेल्या अबोल तक्रारी आहेत. एका क्षणाला ते मोकळे होतातही मात्र तेव्हाच त्यांची ताटातूट होते. ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला राग आहे, त्याच व्यक्तीची मनोभावे सेवा करायला लागल्यावर उफाळून येणारा आमिरचा राग, त्या व्यक्तीचे कुटुंब आपल्या विश्वात दाखल होते आहे म्हटल्यावर वाढत गेलेले त्याचे अवघडलेपण आणि एका क्षणी माणुसकीच्या निर्मळ भावनेतून हात पुढे करणारा, त्यांनाच कुटुंब मानून पुढे जाणारा आमिर हा भावनांचा बंध तुम्हालाही नकळत त्यात सामील करून घेतो. दुसरीकडे तुरुंगात मरायचे नाही म्हणून आटापिटा करणारी ताराही छोटूला आईच्या मायेने कुशीत घेते आणि आला क्षण जगायला सुरुवात करते. मजिदींनी दाखवलेली मुंबई खरोखर त्यांच्या दृष्टिकोनातून वेगळी भासते. डॉकयार्डचा भाग असेल किंवा यारी रोड असेल, शिवडीची फ्लेमिंगोंची जागा.. सगळ्याचा पुरेपूर वापर त्यांनी केला आहे. मात्र आमिर आणि ताराची मूळ गोष्ट आपण याआधी अनेकदा पाहिलेली आहे, ते दु:ख पडद्यावर अनुभवलेले असल्याने त्यांच्या संवेदनांमधून उतरलेला भावपट आपल्याला क्षणाक्षणाला आकर्षित करतो पण वेगळे काही पाहिल्याचा आनंद देत नाही. कथा-मांडणीतील वेगळेपण हे मजिदींच्या प्रत्येक चित्रपटाचं वैशिष्टय़ आहे ते इथे दिसून येत नाही. त्यांनाही डॅनी बोएलला जी दिसली तीच मुंबई कथेत आणावीशी वाटली?, याबद्दल आश्चर्यही वाटतं आणि त्यातही वास्तवापेक्षा त्यातल्या भावनेतच चित्रपट रेंगाळत राहतो.

इशान खत्तारचा हा पहिलाच चित्रपट आहे. मात्र त्याची बोलकी नजर, सहज  अभिनय यामुळे तो लक्ष वेधून घेतो. मालविका मोहनन हिनेही ताराची भूमिका पेलून धरली आहे मात्र मुळात चित्रपटात तिच्या कथेला फार कमी वाव असल्याने तिला मर्यादा आल्या आहेत. आमिरच्या आयुष्यात शिरलेल्या तीन व्यक्तिरेखा हा या चित्रपटाचा जीव आहेत. बडी पातीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री जी. व्ही. शारदा छोटय़ाशा भूमिकेतही भाव खाऊन गेल्या आहेत. गौतम घोष, शशांक शेंडे असे अनेक कलाकार छोटय़ा-छोटय़ा भूमिकेतून दिसतात. अनिल मेहता यांच्या कॅमेऱ्याने मजिदींच्या मागणीनुसार मुंबईचे तरल चित्रण कॅमेऱ्यात उतरवले आहे. त्यामुळे एरवी अंगावर काटा आणणारे परिसराचे चित्र इथे देखणे दिसते आणि भासतेही.माजिद मजिदींचा हा पहिलाच हिंदी चित्रपट त्यांच्या इराणी चित्रपटांइतका प्रभावी वाटत नाही, पण मुंबईत येऊन इथली गोष्ट सांगण्याचा त्यांचा हा प्रयत्न पाहायला हवा.

बियाँड द क्लाऊड्स

  • दिग्दर्शक – माजिद मजिदी
  • कलाकार – इशान खत्तार, मालविका मोहनन, गौतम घोष, जी. व्ही. शारदा, तनिष्ठा चॅटर्जी, शशांक शेंडे

First Published on April 21, 2018 3:00 am

Web Title: %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4 %e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80 %e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f