16 February 2019

News Flash

सकारात्मक उजळणी

ही उचकी चेहऱ्यावर आनंद आणणारी आहे, सतावणारी नाही हेही तितकेच खरे!

 

चार भिंतीत कोंडून शिक्षण मिळत नाही, पुस्तकी अभ्यास म्हणजे शिक्षण नव्हे इथपासून ते हुशार आणि टवाळकी करणारी मुले यांच्यातला भेदाभेद, त्यांना कायम मिळणारी सापत्न वागणूक या सगळ्या कोंडीतून त्यांना बाहेर काढणारा चांगला शिक्षक नावाचा दुर्मीळ घटक, हे वास्तव आजही बदललेले नाही. त्यामुळे समाजाच्या दृष्टीने वाया गेलेल्या मुलांना परीसस्पर्श करून त्यांचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या शिक्षकाची किंवा शिक्षिकेची कथा सांगणारे चित्रपट जवळपास सगळ्याच भाषेत पाहायला मिळाले आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा दिग्दर्शित ‘हिचकी’ या चित्रपटात पुन्हा या गोष्टींची उजळणी झाली आहे, मात्र अभिनय आणि किंचित वेगळेपणाने येणारे मुद्दे शिवाय अशा कथांमधून मिळणारी सकारात्मक ऊर्जा यामुळे ही उजळणी टुकार चित्रपटांच्या गर्दीत महत्त्वाची ठरते.

‘हिचकी’ पाहताना २००२ साली प्रदर्शित झालेल्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘१०वी फ’ या चित्रपटाची हटकून आठवण येते. अभ्यासात कमी गती असलेल्या मुलांना एका वर्गात एकत्र करून त्यांना ‘ड’, ‘ई’, ‘फ’ अशा तुकडय़ा चिकटवल्या जातात. आणि त्या तुक डय़ांची चिकटपट्टी एकदा लागली की त्या मुलांनी कितीही अभ्यास केला, कितीही चांगले वागण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्याकडे बघण्याचा शाळेचा दृष्टिकोनच बदललेला असतो. या मुलांकडे पाहताना लावलेला नकारी भिंगांचा चष्मा इतका घट्ट असतो की काही केल्या त्यांच्यातील चांगुलपणा कणानेसुद्धा नजरेला पडू नये. शाळा आणि तथाकथित हुशार मुलांकडून मिळणारा दुजाभाव हा या मुलांच्या प्रगतीतला मोठा अडसर ठरतो. ‘हिचकी’ किंवा उचकी ही चित्रपटात या अर्थाने येते. नैना माथुरला (राणी मुखर्जी) टुरेट सिन्ड्रम हा आजार आहे. या आजारामुळे तिच्या तोंडून सतत निघणाऱ्या आवाजांवर तिचे नियंत्रण नाही. आपल्या आजारामुळे खचून न जाता उलट त्यालाच शस्त्र करत नैना आपले शिक्षण पूर्ण करते. तिला शिक्षक म्हणून काम करायचं आहे आणि तिच्या आजारामुळे तिला सतत काम नाकारले जाते. अखेर नैनाला ती ज्या शाळेत शिकली होती त्याच शाळेत नोकरीची संधी मिळते. मात्र तिच्या हातात जो वर्ग येतो तो ‘नववी फ’ नावाच्या तुकडीखाली असलेल्या १४ टवाळ मुलांचा.. शिक्षण हक्क कायद्यामुळे महापालिका शाळेत शिकणारी ही १४ मुले या प्रतिष्ठित इंग्रजी शाळेत दाखल झाली आहेत. मात्र ना शाळेने त्यांना आपलेसे केले आहे ना मुलांनी. त्यामुळे बंड करून उठलेली ही मुले अभ्यास सोडून इतर गोष्टीत रमली आहेत. एकीकडे नैनाचा स्वत:ला सिद्ध करण्याचा लढा आणि त्यासाठी मुळात या मुलांना योग्य दिशा दाखवण्यासाठीचा संघर्ष अशा दोन स्तरांवर ही क था पुढे जाते.

‘हिचकी’ची कथा सर्वसाधारणपणे परिचयाची असली तरी इथे फक्त आर्थिकदृष्टय़ा खालचे आणि वरचे असा काळा-पांढरा संघर्ष लेखक-दिग्दर्शकाने यात मांडलेला नाही यासाठी त्यांचे कौतुक करायला हवे. इथे या मुलांप्रति उमटणारी नकारात्मकता ही ठोकळेबाज शिक्षणपद्धती मानणाऱ्यांकडून आलेली आहे. शिक्षण म्हणजे खेळ नव्हे असे सांगत केवळ गुणांच्या आकडय़ांमागे धावताना त्याच त्याच साचेबद्ध पद्धतीने दिले जाणारे पुस्तकी ज्ञान हा आजच्या शिक्षणव्यवस्थेतला धोका आहे. नैना या चौदा मुलांमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण करण्यासाठी त्यांच्यात असलेल्या क्षमता दाखवून देत त्यांच्या व्यावहारिक जगातील कल्पनांना धरून विज्ञान, गणित अशा त्यांना अवघड वाटणाऱ्या विषयांबद्दल गोडी निर्माण करते. नैनाची शिकवण्याची पद्धत त्याच शाळेत विद्यार्थ्यांच्या समितीचे काम पाहणारे वाडियांसारख्या (नीरज काबी) शिक्षकांना रुचत नाही. अर्थात, नैनासाठीही मुलांमध्ये गोडी निर्माण करण्याची प्रक्रिया सोपी नसते. स्वत:च्या आजाराची मुलांना ओळख करून देत नैना मुळापासून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करते. नैना आणि विद्यार्थ्यांची ही एकत्र येण्याची प्रक्रिया त्यातल्या सहजसोप्या मांडणीमुळे रंगतदार झाली आहे. मात्र या मांडणीला राणी मुखर्जीपासून ते या चौदा मुलांपर्यंत प्रत्येक कलाकाराच्या उत्तम अभिनयाची साथ मिळाली असल्याने अभिनयाच्या बाबतीत या चित्रपटाची टक्केवारी जास्त मोठी आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळातील ‘ब्लॅक’ असो किंवा आताचा ‘मर्दानी’, राणी मुखर्जीने आपली अभिनय क्षमता वेळोवेळी सिद्ध केली आहे. ‘हिचकी’तही त्याच सहजतेने तिने नैना ही व्यक्तिरेखा तिच्या टुरेट सिंड्रोमच्या आजारासह प्रभावीपणे रंगवली आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध तुलनेने लवकर संपतो, उत्तरार्धात कथा थोडी ताणल्यासारखी वाटते. मात्र चांगली-वाईट अशा दोनच बाजू न रंगवता शिक्षक या भूमिकेतून आपण मुलांना काय देतो याचे भान माणसाला असावे लागते. जे वाडिया यांच्या व्यक्तिरेखेतून दिग्दर्शकाने चांगल्या पद्धतीने रंगवले आहे. अखेर ज्याचा शेवट गोड ते सगळे गोड हा न्याय ‘हिचकी’लाही लागू पडला आहे. मात्र ही उचकी चेहऱ्यावर आनंद आणणारी आहे, सतावणारी नाही हेही तितकेच खरे!

हिचकी

  • दिग्दर्शक – सिद्धार्थ मल्होत्रा
  • कलाकार – राणी मुखर्जी, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, नीरज काबी, हुसैन दलाल, हर्ष मयार, जन्नत रेहमानी.

First Published on March 24, 2018 6:13 am

Web Title: %e0%a4%b8%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%95 %e0%a4%89%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%a3%e0%a5%80