19 February 2019

News Flash

सरधोपट ‘भय’

भयपट म्हटले की ठरावीक पद्धतीची कथा, मांडणी या गोष्टी डोळ्यासमोर येतात.

भयपट म्हटले की ठरावीक पद्धतीची कथा, मांडणी या गोष्टी डोळ्यासमोर येतात. राहुल भातणकर दिग्दर्शित ‘भय’ चित्रपटात नावातच विषयाचा उलगडा होत असला तरी यातली भीतीची संकल्पना वेगळी आहे. आजचे वेगवान जीवन आणि त्यात सातत्याने घडणाऱ्या अनाकलनीय घटना पाहता आपल्याबरोबर काहीतरी वाईट, अघटित घडेल ही भीती मनात घर करायला लागते. आणि या भीतीवर मात करता आली नाही तर खरोखरच प्रत्यक्षात अशा चुकीच्या घटना घडत जातात, जेणे करून एका चांगल्या आयुष्याची वाताहत होते, या कथाकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून केलेला हा चित्रपट त्याच्या सरधोपट मांडणीमुळे फसला आहे.

गोकुळ जोशी (अभिजीत खांडकेकर) आणि त्याची पत्नी मीरा (स्मिता गोंदकर) हे दोघे सर्वसामान्यपणे जगणारे बऱ्यापैकी उच्च मध्यमवर्गीय जोडपे. मीरा दोन महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे एकीकडे मीराची अतिकाळजी गोकुळ करतो आहे. पण गोकुळच्या विचित्र वागण्यामुळे मीरा चिंतेत आहे. गोकुळला सतत कसली तरी भीती वाटते आहे. एखादी गाडी आपल्या अंगावर येईल, इमारत आपल्यावर कोसळेल, अशा सतत नकारी कल्पना त्याच्या मनात थैमान घालत आहेत. त्यामुळे गोकुळ सतत तणावाखाली आहे. त्याला लिफ्टमधून जायची भीती वाटते, गीझरचे बटन सुरू करण्यासाठीही तो मीराची मदत घेतो. गोकुळच्या या वागण्यामागे स्किझोफ्रेनियाचा आजार असल्याचे डॉक्टर मीराला सांगतात. या दोघांच्या कथेबरोबर आणखी एक समांतर गोष्ट चित्रपटात दाखवली आहे ती कुप्रसिद्ध गुंड भरत टांगे (विनीत शर्मा) याची.. एकीकडे गोकुळची अनाठायी भीती आणि दुसरीकडे गुंडगिरीच्या दलदलीत फसलेल्या आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या भरतची टिपिकल गोष्ट. दिग्दर्शकाने एका क्षणापुरती का होईना या दोघांचे धागे एका कथेसाठी जोडले आहेत, मात्र तो क्षण वगळता या दोन्ही गोष्टी चित्रपटात आपापल्या पद्धतीने पुढे जात राहतात.

सतत दहशतवादी हल्ले, चोऱ्या-दरोडे, बलात्कार, अपघात यासारख्या घटनांमुळे मानवी मनामध्ये असुरक्षिततेची भावना वाढीला लागणे आणि त्या भीतीच्या छायेखाली वावरणाऱ्या मनाला आजारांनी विळखा घालणे ही संकल्पना या चित्रपटाची सुरुवात चांगली करून देते. मात्र इतक्या चांगल्या संकल्पनेला त्याच संवेदनशीलतेने हाताळणे गरजेचे होते. त्याऐवजी कुठल्याही तद्दन दाक्षिणात्य चित्रपटात शोभावी अशी बटबटीत मांडणी करत दिग्दर्शकाने स्वत:च या चांगल्या कथाकल्पनेला भरकटत नेले आहे. चित्रपटाची निर्मिती दुबईस्थित उद्योजक सचिन कटारनवरे यांनी केली आहे. त्यामुळे चित्रपटात नको त्या ठिकाणी आणि नको असलेल्या व्यक्तिरेखाही आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी दुबईत जाऊन गाणी गात नाचताना दिसतात.  गोकुळच्या भूमिकेत अभिजीतने जीव ओतला आहे. मात्र मुळात कथा आणि मांडणी दोन्हीत चित्रपटाने मार खाल्लेला असल्याने त्याचा अभिनय चित्रपट तोलू शकेल, अशी अवास्तव कल्पना करण्यात काहीच अर्थ नाही.  भरत आणि इन्स्पेक्टरची कथा एक वेगळ्याच चित्रपटात घडतेय असे वाटते. या दोन्ही कथांमध्ये फक्त घडणारी एकच घटना केंद्रस्थानी आहे, या दोन्हींचा आशय मात्र पूर्णपणे वेगळी असल्याने एकाच चित्रपटात दोन चित्रपट पाहतो आहोत, असे वाटते.

भय

  • दिग्दर्शक : राहुल भातणकर
  • कलाकार : अभिजीत खांडकेकर, स्मिता गोंदकर, विनीत शर्मा, संस्कृती बालगुडे. सिद्धार्थ बोडके, सतीश राजवाडे, नूपुर दुधवाडकर, धनंजय मांद्रेकर.

First Published on March 3, 2018 5:59 am

Web Title: %e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%9f %e0%a4%ad%e0%a4%af