21 February 2019

News Flash

हरवलेल्या साधेपणाचा शोध

प्रकाश कुंटे दिग्दर्शित आणि आदिती मोघे लिखित ‘सायकल’ ही कथाच खूप साधीसुंदर आहे आणि पडद्यावरही ती तशीच रंगली आहे.

कधीकाळी आजीच्या पोतडीतून साध्या-सुंदर गोष्टी निघायच्या. त्यात परीराणी नसायची किंवा दुष्ट जादूगारही नसायचा. तिच्या अनुभवातून रंगलेल्या चार शहाणपणाच्या साध्या गोष्टी बरेच काही शिक वून जायच्या. कधीतरी रुपेरी पडद्यावरच्या रिळांमधूनही अशी सुंदर गोष्ट उलगडते ज्यात नायक नसतो, नायिका नसते. एक वेगळेच जग असते.. माणसांचे. खऱ्या आयुष्यात भेटणाऱ्या माणसांचे. त्या खऱ्या माणसांच्या गोष्टी हल्ली पडद्यावर कमी अनुभवायला मिळतात, या गोष्टींना काळाचे बंधन नसते, ते कुठल्याही काळात-परिस्थितीत समोर आल्या तरी त्यांच्या मूळ तत्त्वात फरक पडत नाही. ‘सायकल’ ही त्या खऱ्या माणसांची गोष्ट आहे. प्रकाश कुंटे दिग्दर्शित आणि आदिती मोघे लिखित ‘सायकल’ ही कथाच खूप साधीसुंदर आहे आणि पडद्यावरही ती तशीच रंगली आहे.

१९५८च्या काळातील एखादी गोष्ट सांगण्याचा मोह प्रकाश कुंटे यांच्यासारख्या आजच्या पिढीचे चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शकाला का व्हावा, असा प्रश्न पडतो. मात्र त्याचे उत्तर खरे म्हणजे या चित्रपटाच्या कथेतच आहे. कोकणातील एका छोटय़ाशा गावचा ज्योतिषी केशव (हृषिकेश जोशी) आणि त्याला त्याच्या आजोबांक डून मिळालेली सायकल हे साऱ्या गावाचे आकर्षण आहे. केशवच्या आजोबांना ब्रिटिश अधिकाऱ्याने दिलेली ही सायकल इतर कोणाकडे नाही. केशवही त्या सायकलला मनापासून जपतो. दुसऱ्या कोणालाही तो त्या सायकलला हात लावू देत नाही. त्याच्या सायकलची गोष्ट त्याच्या मुलीला तोंडपाठ आहे आणि तरीही ती तिला पुन:पुन्हा ऐकावीशी वाटते. त्याच्याकडे पत्रिका दाखवून भविष्य घ्यायला येणाऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनाच नकळत मदत करणारा केशव आणि त्याचे जग खूप साधे आहे. या जगात एकच गोंधळ उडतो जेव्हा केशवची सायकल चोरीला जाते. सायकल गेल्याने अस्वस्थ झालेला केशव आणि त्याचा शोध कथेत आहे. त्याच वेळी ही सायकल ज्यांनी नेली त्या दोन चोरांचा सायकलबरोबर होत गेलेला भावनिक प्रवास हे दोन धागे तत्त्वत: चित्रपटात एकत्र येत नाहीत आणि तरीही ते एकत्रितच घडत असतात हे या कथेचे वैशिष्टय़ आहे.

सायकल चोरल्यानंतर खऱ्या अर्थाने त्या दोन चोरांना केशवची ओळख होते. चांगुलपणा माणसाला बदलतो, इथे या सायकलच्या आधारे या दोन चोरांच्याच मनात बदल घडतो असे नाही. तर माणसांना जपणाऱ्या केशवलाही एका वस्तूत अडकून पडण्यातला निर्थकपणा जाणवतो. या साऱ्या गोष्टी दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी त्या काळासह प्रभावीपणे मांडल्या आहेत. कथेसाठी कोकणातील गावांचा घेतलेला संदर्भ आणि कोकणातील निसर्गसौंदर्याचा कॅमेरामन अमलेंदू चौधरी यांनी केलेला सुंदर वापर यामुळे तिथल्या तिथे घडणारी ही कथाही मनाचा ठाव घेते. अर्थात, ही छोटेखानी कथा मुळातच अत्यंत संयतपणे, चांगुलपणाकडे नेणारी आहे, साधेपणाचे महत्त्व पटवून देणारी आहे. त्याला कलाकारांचीही उत्तम साथ मिळाली आहे. हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव-भाऊ कदम ही चोरांच्या भूमिकेतील जोडगोळी या चित्रपटाची ताकद आहेत यात शंकाच नाही. मात्र दीप्ती लेले, मनोज कोल्हटक र असोत किंवा छोटी मैथिली सगळ्यांनी आपापल्या भूमिका चोख केल्या आहेत. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे तत्त्व काय जादू करू शकते हे दाखवणारी ‘सायकल’ दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, पाश्र्वसंगीत सगळ्याच आघाडीवर सरस ठरली आहे.

सायकल

  • दिग्दर्शक – प्रकाश कुंटे
  • कलाकार – हृषिकेश जोशी, भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव, दीप्ती लेले, मैथिली पटवर्धन, मनोज कोल्हटकर.

First Published on May 5, 2018 4:50 am

Web Title: %e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%87%e0%a4%aa%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7