25 April 2019

News Flash

भावनिक बंध अनोख्या पद्धतीने गुंफणाऱ्या ‘आम्ही दोघी’

नातेसंबंधांवर भाष्य करणारी प्रत्येकाच्या जगण्याची गोष्ट..

आम्ही दोघी

नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या बऱ्याच चित्रपटांची आजवर निर्मिती झाली. पण मग आम्ही दोघीच्या निमित्ताने पुन्हा हाच विषय का हाताळला गेला, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण प्रतिमा जोशी दिग्दर्शित हा चित्रपट जसजसा उलगडत जातो, तसतसं या प्रश्नाचं उत्तर सापडत जातं. सावी (प्रिया बापट) आणि अम्मी (मुक्ता बर्वे) या दोघींची ही कथा. दोघीही परस्परविरोधी स्वभावाच्या, मात्र केवळ दैवाने या दोघींची गाठ पडलेली असते. पण मग फक्त या दोघींच्याच नाही तर बापलेकी, पती-पत्नी, आई- मुलगी आणि प्रेयसी-प्रियकर अशा बऱ्याच नातेसंबंधांवर हा चित्रपट भाष्य करतो.

चित्रपटाची कथा अमला आणि सावित्री सरदेसाई या दोन प्रमुख पात्रांभोवती बेतलेली आहे. या दोन्ही व्यक्तिरेखा अनुक्रमे मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांनी साकारल्या आहेत. विचारसरणी वेगळ्या असल्या तरी महिला इतर बाबतीत एकसारख्या असतात. त्यांचे अंतिम ध्येय एकच असले तरी त्या मार्ग वेगवेगळे चोखाळतात. ‘जे मनात येईल ते पटकन करून मोकळे व्हा, नाहीतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल,’ हे आहे सावित्रीच्या जीवनातील तत्वज्ञान. ‘सावित्री’ ही फटकळ, परखड मत व्यक्त करणारी आणि व्यावहारिक विचार करणारी आहे. भावनेत न गुंतणारी तरीही कमालीची खरी असणारी आहे. तर दुसरीकडे शांत, संयमी स्वभावाची अमला. मुक्ता साकारत असलेली व्यक्तिरेखा ही ग्रामीण पार्श्वभूमीची असल्याने तिला शहरी भागाच्या जीवनशैलीचा तसा गंध नाही. पण इतरांच्या व्यक्तिगत जीवनाचं स्वातंत्र्य राखून त्यांच्या मनापर्यंत कसं पोहोचायचं हे तिला ठाऊक असतं. भावनांच्या फार अधीन न होता प्रॅक्टीकल कसं जगायचं हे सावित्रीच्या मनावर लहानपणापासूनच बिंबवलं जातं. म्हणूनच कदाचित वडिलांसोबतही तिची फारशी जवळीक होत नाही. पण अचानक एके दिवशी तिच्या घरात येते, अमला, तिची सावत्र आई. वडिलांनी आपल्याला न सांगता लग्न का केलं हा राग तिच्या मनात खदखदत असतोच. पण हळूहळू ती अमलाशी जवळीक साधू लागते. सावित्री आणि अमलामध्ये जवळपास सात-आठ वर्षांचंच अंतर दाखवण्यात आलं आहे. तर चित्रपटात सावित्रीच्या जीवनाचे तीन टप्पे अधोरेखित केले आहेत. कधी कधी हेच तीन टप्पे गोंधळात टाकणारे ठरतात. ती शाळेतून कॉलेजमध्ये कधी गेली की अजूनही शाळेतच आहे, हे सहज स्पष्ट होत नाही.

प्रिया आणि मुक्ता या दोघींनीही वैविध्यपूर्ण भूमिका करत स्वतःला या चित्रपटात पुन्हा एकदा सिद्ध केलं. पण मध्यांतरानंतर काही वेळासाठी आम्ही दोघीऐवजी या चित्रपटात फक्त मी (प्रिया बापट) राहिली की काय असं वाटू लागतं. शेवटपर्यंत प्रियाची भूमिका ठळकपणे अधोरेखित होत असते, तर मुक्ताच्या भूमिकेची गती संथ होत असलेली आणि त्याच वेळी कथा काहीशी ताणलेली जाणवते. तर सावित्रीच्या वडिलांची (किरण करमरकर) आणि तिच्या मैत्रिणीची (आरती वडगबाळकर) भूमिका लक्षवेधी ठरते.

या चित्रपटाची सकारात्मक बाजू अशी की तो शेवटपर्यंत कथेशी जोडून राहतो. मध्यांतरानंतर काही काळासाठी अमला जरी दिसेनाशी झाली तरी त्यावेळेत सावित्रीच्या प्रेमकथेचे विविध पैलू पाहायला मिळतात आणि इथेसुद्धा पुन्हा एकदा स्वतंत्र विचारांची, प्रेमसंबंधात असूनही स्वत:चं वेगळेपण जपणारी सावी अधोरेखित होते. आजच्या तरुणींना त्यांच्या नात्यांमध्ये जे संबंध अपेक्षित असतात त्यांच्या जवळ जाणारी ही कथा आहे. त्यामुळे संवेदनशीलरित्या कथेशी जोडून ठेवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरतो. ‘आम्ही दोघी’मधील भावनांचे नाट्य म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या जगण्याची गोष्ट आहे. त्यामुळे यातील भूमिकांमध्ये, प्रसंगांमध्ये प्रत्येकाला स्वत:ला पाहायला नक्कीच आवडेल.

शब्दांकन- स्वाती वेमूल

swati.vemul@indianexpress.com

First Published on February 23, 2018 1:37 am

Web Title: aamhi doghi movie review mukta barve priya bapat