14 October 2019

News Flash

AndhaDhun Movie Review : उत्कंठावर्धक ‘अंधाधून’

थरार आणि गूढ कथांसाठी दिग्दर्शक श्रीराम राघवन ओळखले जातात.

अंधाधून

कथा- पुण्यात राहणारा आकाश (आयुषमान) हा पियानो वाजवून घरगाडा चालवणारा असतो. पियानोची प्रचंड आवड असलेल्या आकाशचं लंडनला जाऊन पियानो शिकण्याचं स्वप्न असतं. पण अचानक एके दिवशी तो गुन्ह्याच्या जाळात अडकला जातो. हत्येप्रकरणी तो घटनास्थळी असल्याने पोलिसांना जबाब देण्यासाठी त्याला भाग पडतं. हा गुंता सोडवण्याच्या प्रयत्नात त्याला पुढे बऱ्याच अडचणी येतात. यातूनच साकार होतो उत्कंठावर्धक, शेवटपर्यंत कथेशी जोडून ठेवणारा ‘अंधाधून’.

रिव्ह्यू- थरार आणि गूढ कथांसाठी दिग्दर्शक श्रीराम राघवन ओळखले जातात आणि आपल्या याच प्रतिभेचा उत्तम उपयोग त्यांनी ‘अंधाधून’साठी केला आहे. फार कमी दिग्दर्शक या प्रकारातील चित्रपट उत्तमरित्या साकारू शकतात. त्यापैकी एक श्रीराम राघवन आहेत. जे डोळ्यांना दिसतं तेच खरं असतं असं नाही. नजरेपलिकडेही काही गोष्टी असतात हे या चित्रपटातून रेखाटण्यात आलं आहे.

चित्रपटांतील प्रसंगांमधून थरारासोबतच एक शिकवण मिळते. माणसाचा बदलता स्वभाव, या बदलासोबतच नष्ट होणारी त्याची नितीमूल्ये यातून पाहायला मिळतात. चित्रपटाला हास्य आणि उपहासाची फोडणीसुद्धा दिग्दर्शकांनी दिली आहे. त्यामुळे शेवटपर्यंत प्रेक्षक कथेशी जोडून राहतो. आयुषमान खुराना, राधिका आपटे, तब्ब, छाया कदम यांचं अभिनय दमदार आहे. आयुषमानने त्याच्या करिअरमध्ये साकारलेली ही सर्वोत्तम भूमिका म्हणता येईल. थिएटरमधून बाहेर पडल्यावरही चित्रपटाचं संगीत सतत डोक्यात राहतं. एकंदरीत कथा, दिग्दर्शन, संकलन, अभिनय, संगीत आणि छायांकन या सर्वच बाबतीत हा चित्रपट उत्तम ठरतो.

First Published on October 5, 2018 12:12 pm

Web Title: andhadhun movie review ayushmann khurrana tabu and radhika apte film is an unmissable suspense drama