20 November 2017

News Flash

Baadshaho movie review : वाळवंटातील नीरस कथा

चित्रपटात संजय गांधी यांच्याशी साधर्म्य सांगणारी संजीव नामक एक व्यक्तिरेखा आहे.

Updated: September 2, 2017 8:15 AM

बादशाहो

मीलन ल्युथारिया दिग्दर्शित ‘बादशाहो’ हा चित्रपट आणीबाणीच्या काळातील आहे. मात्र आणीबाणीचा काळ इथे फक्त नावापुरताच येतो. केवळ त्या काळाची कथा म्हणून त्या वेळचा सेट राजस्थानमध्ये उभा राहतो. आणीबाणी होती म्हणून कुठल्याशा एका क्षणभरासाठी चमकून जाणाऱ्या प्रसंगात गावकरी फळ्यावर कर्फ्यूची वेळ लिहिताना दिसतो. चित्रपटात संजय गांधी यांच्याशी साधर्म्य सांगणारी संजीव नामक एक व्यक्तिरेखा आहे. हे एवढेच संदर्भ या चित्रपटाच्या कथेतील आणीबाणीशी जोडलेले आहेत. बाकी सगळा आहे तो चोर-पोलीस पाठलागाचा जुनाच खेळ, नव्वदच्या दशकातला एखादा चित्रपट असावा अशी या चित्रपटाची केलेली मांडणीही तशी फसवीच आहे.

वाचा : मृत्यूनंतरही सुरू राहील इंदर कुमारवरील बलात्काराचा खटला

राजस्थानमधली गीतांजली नामक राणी (इलियाना डिक्रूझ). तिच्या कुटुंबाने संकटकाळात वापरता यावे म्हणून ठेवलेले सोनेनाणे सरकारने जप्त केले आहे. गीतांजलीलाही अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तिची संपत्ती सरकारने जप्त केली असली तरी ती सरकारच्या तिजोरीत जमा न होता आपला शत्रू संजीवच्या तिजोरीत जाणार, याची पक्की खबर असलेल्या गीतांजलीने आपले सोने सरकारच्या ताब्यातून सोडवत भारतातूनच पलायन करण्याचा एक जबरदस्त प्लॅन आखला आहे. या प्लॅनसाठी तिचे मोहरेही तिने व्यवस्थित हेरले आहेत. भवानी (अजय देवगण) हा तिचा पहिला मोहरा. राजघराण्याचा पारंपरिक सुरक्षारक्षक असलेल्या भवानीला विश्वासात घेऊन जयपूर ते दिल्ली मार्गाने जाणारे सोने लुटण्याची जबाबदारी ती त्याच्यावर टाकते. भवानी या लुटालुटीच्या योजनेसाठी दलिया (इम्रान हाश्मी) आणि गुरुजी (संजय मिश्रा) यांना सहभागी करून घेतो. तर गीतांजलीचे काम पाहणारी संजनाही (इशा गुप्ता) या टोळीशी जोडली जाते. या चोरांच्या मागे पोलीस म्हणून मेजर शेहर सिंगची (विद्युत जामवाल) नियुक्ती केली जाते. पाठशिवणीच्या या खेळात जेवढी म्हणून वळणे देता येतील तेवढी वळणे चित्रपटात येतात. पण असे खंडीभर मसालापट पाहिलेल्या प्रेक्षकांना वळणावळणाने जाणाऱ्या या चित्रपटांची इतकी सवय झाली आहे की त्यात नवे काही जाणवतच नाही. किंबहुना, पुढे चित्रपट कसा पूर्ण होणार याची प्रचीती आलेला प्रेक्षक विनाकारण अडीच तासांचा हा प्रवास पडद्यासमोर बसून पूर्ण करतो.

वाचा : सुनील ग्रोवरला डेंग्यूची लागण, रुग्णालयात केले दाखल

मीलन लुथारियाने दिग्दर्शक म्हणून ‘टॅक्सी नंबर ९२११’, ‘डर्टी पिक्चर’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’सारखे सरस चित्रपट दिलेत. त्यामुळे ‘बादशाहो’तली त्याची कलाकारांची नेहमीची टीम आणि आणीबाणीची पाश्र्वभूमी या गोष्टी चित्रपटाच्या अपेक्षा उंचावणाऱ्या आहेत. मात्र मोठय़ा अपेक्षेने आलेल्या प्रेक्षकाला तद्दन सोनेचोरीची कथा पाहायला मिळते. राजस्थानच्या वाळवंटात घडणारी ही कथा त्या वातावरणाप्रमाणेच नीरस आहे. कथेत रंगत आणण्यासाठी अजय देवगण आणि इम्रान हाश्मी या दोघांनाही चटकदार संवाद, खास राजस्थानी हेल आणि काही वेगळा बाज देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण त्याचा काडीभरही परिणाम मुळातच नीरस असलेल्या चित्रपटावर होत नाही. विद्युत जामवाल आहे म्हणून हाणामारी आणि पाठलागाची काही चांगली दृश्ये आहेत, इम्रान हाश्मी आहे म्हणून सनी लिओनीचे आयटम साँग आहे. अशी ठिगळं जोडत जोडत चित्रपट मनोरंजक करण्याच्या नादात फापटपसारा वाढवण्यात आला आहे. शरद केळकर किंवा अन्य काही कलाकार चित्रपटात का आहेत, याचेही उत्तर मिळत नाही. अजय देवगण आणि इम्रान हाश्मी दोन्ही कलाकार चित्रपटात फिके पडले आहेत. त्यातल्या त्यात काही भाग जो उचलून धरलाय तो संजय मिश्रा यांच्या व्यक्तिरेखेने.. राणी गीतांजली ही चित्रपटातली मुख्य व्यक्तिरेखा आहे. इलियानाला ‘रुस्तुम’नंतर पुन्हा एकदा त्याच धाटणीची भूमिका मिळाली आहे. पण तिच्या जागी अन्य कोणत्या अभिनेत्रीचा विचार झाला असता तर बरे असे वाटून जाते. तीच गोष्ट ईशा गुप्ताची. या दोघीही केवळ बाहुल्या म्हणून चित्रपटात दिसतात. अभिनय, गाणी, दिग्दर्शन सगळ्याच बाबतीत सुमार असा हा तद्दन मसाला चित्रपट आहे.

समीक्षक – रेश्मा राईकवार

First Published on September 2, 2017 8:06 am

Web Title: baadshaho movie review ajay devgn esha gupta emraan hashmi ileana dcruz