19 February 2019

News Flash

Karwaan Movie Review : आयुष्याचं गमक शोधायला निघालेला ‘कारवां’

Karwaan Movie Review : 'कारवां' हा सबकुछ इरफान खान असं म्हटलं तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही.

Karwaan Movie Review

Karwaan Movie Review : कधी कधी अशा प्रवासाला निघणं खूप सुंदर असतं जिथे तुम्हाला कुठे पोहोचायचं हेच माहिती नसतं. इच्छित स्थळ माहिती नसलं की माणूस हरवत जातो, पण हरवण्यातही एक वेगळी गंमत असते जी तुम्हाला स्वत:ची नव्यानं ओळख करून देते. असाच काहीसा आहे ‘कारवां’ चित्रपट. सुख दु:ख, प्रेम द्वेष, हासू अन् आसू अशा असंख्य चांगल्या वाईट गोष्टींनी ‘कारवां’ पुरेपुर भरलेला आहे.

हा कारवां आहे अविनाश, शौकत आणि तान्याचा. अविनाशच्या वडिलांचं प्रवासात अकस्मिक निधन होतं. ट्रॅव्हल कंपनीचा घोळ होतो अन् अविनाश अर्थात दुलकर सलमानच्या वडिलांचा मृतदेह दुसऱ्याच ठिकाणी पाठवला जातो. फोटोग्राफर होण्याचं स्वप्न बाळगणारा अविनाश वडिलांच्या हट्टापायी आपल्या स्वप्नांना तिलांजली देतो आणि वडिलांशी असलेलं त्याचं नात कायमचं तुटतं. आपल्या स्वप्नांचे पंख वडिलांनी छाटले हा राग कायम अविनाशच्या मनात असतो. वडिलांचं निधन आणि त्याचवेळी त्यांचा मृतदेह मुर्खपणामुळे घरी न पोहोचता भलतीकडेच पोहोचला आहे ही बातमी अविनाशच्या कानवर येऊन धडकते. हा मृतदेह कोच्चीहून बंगळूरुला आणण्यासाठी अविनाश शौकतची मदत घेतो.

हा शौकत म्हणजेच इमरान खान. आयुष्य मनमुराद जगणारा इसम आणि अविनाशचा जिवलग मित्र. आयुष्य म्हणजे स्वच्छंदी जगणं, पोट दुखेपर्यंत हसणं प्रत्येक गोष्टीकडे प्रँक्टीकली पाहणं पण त्याचवेळी त्यातल्या भावनिक गुंताही तितक्याच सहजतेनं समजून घेणं असं शौकतचं व्यक्तिमत्त्व. बंगळुरुमध्ये गॅरेज असणारा शौकत अविनाशच्या वडिलांचा मृतदेह आणण्यासाठी गाडी घेऊन निघतो.

या दोघांच्या ‘कारवां’त नंतर येऊन मिळते ती मिथिला पालकर अर्थात तान्या. स्वत:च्या विश्वात रमलेली फोन पलिकडे दुसरं जग अस्तित्त्वात असतं या वास्तवापासून पूर्णपणे अनभिज्ञ असलेली. या तीन भिन्न स्वभावाच्या माणासांना नशीब एकत्र घेऊन येतं, प्रवासात संकटं येतात तसेच सुखाचे क्षणही येतात. प्रवासाच्या प्रत्येक वळणार आयुष्य त्यांना नवनवीन अनुभव शहाणपण शिकवून जातं असतं आणि याच प्रवासात या तिघांनाही आतापर्यंत न कळलेलं आयुष्य नावाचं कठीण कोडंही उलगडत जातं.

मल्याळम चित्रपटातला सुपरहिट हिरो दुलकर सलमान ‘कारवां’च्या निमित्तानं बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. खरं तर मल्याळम सिनेमात काम करत मोठा झालेल्या दुलकर त्याच्या पहिल्याच चित्रपटातून हिंदी प्रेक्षकांना खूप भावला. तर वेब सिरिजची क्वीन असलेली मिथिलाही आपल्या अल्लड भूमिकेमुळे लक्षात राहते. मात्र सर्वात जास्त लक्षात राहतो तो इरफान खान, आजारपणामुळे सध्या परदेशात उपचार घेत असलेल्या इरफानचा हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. खरं तर ‘कारवां’ हा सबकुछ इरफान खान असं म्हटलं तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. विनोदाचं अचुक टायमिंग साधत प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यास इरफान यशस्वी झाला आहे.

‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाचं संवाद लेखन करणारे आकर्ष खुरानानं ‘कारवां’चं दिग्दर्शन केलं आहे. आयुष्य म्हणजे नेमकं काय आणि त्याच्या प्रत्येक टप्प्यावर कसं वागत जायचं असे उपदेशाचे डोस चित्रपटात आहेत पण ते इतके सहज सोपे आहेत की प्रेक्षकालाही या तिघांच्या ‘कारवां’त सहभागी व्हावसं वाटतं. आयुष्य नामक प्रवास जगताना त्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट टप्प्याचं तितक्याच सहज, सुंदर, सोप्या आणि विनोदी शैलीत केलेलं वर्णन म्हणजे ‘कारवां’ होय. म्हणूनच इरफान काय पण इतरही कलाकारांच्या ‘कारवां’त किमान एकदा तरी प्रेक्षकांनी सहभागी होण्यात नक्कीच काही अडचण नाही.

First Published on August 3, 2018 9:39 am

Web Title: bollywood karwaan movie review irrfan khan dulquer salmaan mithila palkar in marathi