24 November 2020

News Flash

Padman Movie Review : सुरुवातीला भरकटणारा, पण क्षणार्धात सूर पकडणारा ‘पॅडमॅन’

दिग्दर्शन आणि संवाद चित्रपटातील जमेची बाजू

पॅडमॅन

जवळपास १६ वर्षांपूर्वी ज्यावेळी भारतात मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकीन या गोष्टींविषयी बऱ्याच गैरसमजूती होत्या, ज्यावेळी टेलिव्हिजनवर मासिक पाळीविषयीची जाहिरात आली तरीही ती वाहिनी बदलण्याला किंवा मग ती जाहिरात एखाद्या साबणाची किंवा दुसऱ्याच कोणत्या वस्तूची असल्याचे सांगण्याकडे अनेकांचा कल होता. अशा वातावरणात एक अवलिया पुढे येतो काय आणि एक नवी क्रांती घडवतो काय, तो अवलिया म्हणजे अरुणाचलम मुरुगानंदम. त्यांच्याच आयुष्यातील या महत्त्वाच्या प्रवासापासून प्रेरणा घेत ट्विंकल खन्ना, दिग्दर्शक आर बाल्की आणि अभिनेता अक्षय कुमार ‘पॅडमॅन’ हा चित्रपट साकारला.

मासिक पाळीविषयी समाजात असणारा न्यूनगंड आणि खऱ्या आयुष्यातील काही उदाहरणांची मिळालेली जोड यामुळे बाल्कींनी हे दमदार कथानक रुपेरी पडद्यावर आणण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात ‘लक्ष्मीकांत चौहान’ (अक्षय कुमार) आणि गायत्री (राधिका आपटे) यांच्या नात्याची सुरेख बाजूही पाहायला मिळते. लग्नानंतर लक्ष्मीकांतला महिला मासिक पाळीच्या वेळी नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करतात हे लक्षात येतं. खरी परिस्थिती काय आहे आणि लक्ष दिलं नाही तर ही परिस्थिती आणखी किती गंभीर होऊ शकते याचा अंदाज आल्यावर खुद्द लक्ष्मीकांतच एक महत्त्वाचं पाऊल उचलतो आणि ‘पॅडमॅन’चा प्रवास सुरु होतो. या प्रवासात त्याचा पत्नी, बहिण, आई आणि समाजाचा विरोध होतो. किंबहुना गावकरीसुद्धा त्याला बहिष्कृत करतात. पण, वाटेत येणारा प्रत्येक अडथळा त्याला आणखीनच धीर देऊन जातो. कुटुंब आणि समाजाने वाळीत टाकलेल्या या अवलियाला पुढे साथ मिळते ती परी (सोनम कपूर) नावाच्या व्यवस्थापकिय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीची.

‘चिनी कम’, ‘पा’, ‘शमिताभ’ असे दर्जेदार चित्रपट साकारणाऱ्या आर बाल्की यांनी अतिशय संवेदनशील मुद्दा मोठ्या कलात्मकतेने आणि तितक्याच प्रत्ययकारीपणे मांडण्याचा सुरेख प्रयत्न केला आहे. पण, सुरुवातीला काही क्षणांसाठी हा महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित पॅडमॅन भरकटताना दिसतो. मुळात तो भरकटत असल्याचं लक्षात येण्यापूर्वीच पुन्हा एकदा त्याची गाडी रुळावर येते ही बाब अतिशय महत्त्वाची. बऱ्याच दृश्यांमध्ये भावनेच्या भरात वाहणाऱ्या या चित्रपटातून मिळणाऱ्या उपदेशांचा अतिरेक वाटतो.

सॅनिटरी नॅपकीनविषयीचे काही मुद्दे पटवून देताना चित्रपट उगाचच लांबतोय असं वाटू लागतं. पण, चित्रपटातील खुमासदार संवाद, खिलाडी कुमारचा उत्तम अभिनय आणि एकंदरच सहकलकारांची बसलेली घडी या सर्व गोष्टींमुळे लांबणारा चित्रपट कंटाळवाणा वाटत नाही. दक्षिण भारताऐवजी मध्यप्रदेशात खुलणारं चित्रपटाचं कथानक आणखीनच उठावदार झालं असून संगीत, प्रकाशयोजना आणि छायांकनाची जोड त्याला चार चाँद लावून जातेय. शिवाय चित्रपटात आणखी एक अशा अभिनेत्याला पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावत आहेत. तेव्हा आहा हा अनपेक्षित चेहरा नेमका कोणता आणि ‘पॅडमॅन’मधून आर बाल्कींनी नेमका कसा आणि कोणता संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे, हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट एकदा पाहावा असाच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2018 11:57 am

Web Title: bollywood movie akshay kumar padman movie review in marathi
Just Now!
X