23 January 2018

News Flash

उत्तरार्धात लांबलेली ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’

पूर्वार्धात हा चित्रपट प्रेक्षकांना एकाच ठिकाणी खिळवून ठेवतो, पण...

Updated: August 11, 2017 10:27 AM

टॉयलेट : एक प्रेम कथा

गेल्या बऱ्याच दिवसांपासून सिनेरसिकांना कोणत्या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली असेल तर तो म्हणजे ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’. श्री नारायण सिंग दिग्दर्शित या चित्रपटामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन होतं ते म्हणजे खुसखुशीत संवादांनी, ‘बाऊजी मेरा ब्याह करादो…’ अशी विनवणी करणारा खिलाडी कुमार देसी युवकाच्या भूमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचं संवादकौशल्य आणि अभिनय पाहता या अभिनेत्याला तोड नाही याचाच प्रत्यय येतो. त्यातही त्याची आणि भूमीची केमिस्ट्री म्हणजे ‘क्या बात…’ प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट सुरु असतानाच सिनेमॅटोग्राफीसुद्धा अनेकांचं लक्ष वेधते. त्यातच चित्रपटाचं पार्श्वसंगीतही लक्षवेधी आहे.

भारतातील ग्रामीण भागात शौचालयांचा अभाव आणि त्यामुळे स्थानिकांना विशेषत: महिलांना होणारा त्रास या गोष्टी चित्रपटातून अधोरेखित करण्यात आल्या आहेत. या चित्रपटातून अतिशय संवेदनशील विषय हाताळण्यात आला आहे. भारतात अद्यापही बऱ्याच ठिकाणी शौचालयाचा अभाव आहे. ही बाब कितीही महत्त्वाची असली तरीही आतापर्यंत कोणत्याही चित्रपट दिग्दर्शकाने यावर भाष्य करण्याचं धाडस केलं नव्हतं, जे या चित्रपटातून करण्यात आलं आहे. पूर्वार्धात हा चित्रपट प्रेक्षकांना एकाच ठिकाणी खिळवून ठेवतो, हसवतो, परिस्थितीची जाणिवही करुन देतो. पण, उत्तरार्धात जेव्हा चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते तेव्हाच काहीतरी बिनसतं आणि चित्रपटाचं कथानक कुठेतरी भरकटताना दिसतं.

वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…

शौचालय आणि त्याच्याशी निगडीत संवाद, तेचतेच विनोद आणि कलाकरांच्या अभिनयातही एकसारखेपणा वाटू लागतो. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याच्या नादात या चित्रपटाचा मूळ उद्देश कुठेतरी हरवताना दिसतो. पण हरवत चाललेल्या या कथानकाला सावरण्यासाठी हातभार लावत आहे तो म्हणजे चित्रपटातील सर्व कलाकारांचा अभिनय. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरच्या अभिनयासोबतच चित्रपटातील इतर सहलाकारांच्याही भूमिका प्रशंसनीय आहेत. एकंदर गेल्या काही काळापासून, बॉलिवूडमध्ये चांगल्या कथानकाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला नव्हता. पण, आता मात्र ही परिस्थिती बदलण्याची चिन्ह आहेत. कारण, खिलाडी कुमारचा हा चित्रपट एकदातरी पाहावा असाच आहे.

First Published on August 11, 2017 10:26 am

Web Title: bollywood movie toilet ek prem katha review akshay kumar
  1. No Comments.