20 September 2018

News Flash

Gulabjaam movie Review : पद्धतशीर मुरवलेला ‘गुलाबजाम’

चित्रपट प्रत्येक दृश्यातून अगदी सहजपणे उलगडत जातो

गुलाबजाम

पदार्थाची चव, लज्जत असे शब्द आपण सर्रास वापरतो. त्यातल्या त्यात मराठमोळ्या पदार्थांसाठी खमंग हा शब्द तर अगदी ठरलेलाच. घरात आईने, पत्नीने खमंग पदार्थ तयार केला तर त्याच्या खमंग वासाने पोटात भुकेचं तांडव उभं राहतं. नेमका हाच धागा पकडत दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी ‘गुलाबजाम’ हा चित्रपट साकारला आहे. लंडनमधून आलेला तरुण ‘आदित्य’ आणि पुण्यात राहणारी (काही बाबतीत आयुष्य रेटणारी) ‘राधा’ यांच्या नात्याच्या रेसिपीला अधिक चवदार करण्यासाठी कुंडलकरांनी जो काही मसाला म्हणजेच इतर पात्रं एकत्र आणली आहेत, ते प्रमाण त्यांनी अगदी परफेक्ट जमलं आहे. त्यामुळे त्यांची या चित्रपटाची रेसिपी प्रेक्षकांची मनोरंजनाची भूक भागवण्यात यशस्वी ठरली असं म्हणायला हरकत नाही.

HOT DEALS
  • Lenovo K8 Plus 32GB Fine Gold
    ₹ 8184 MRP ₹ 10999 -26%
    ₹410 Cashback
  • Moto C Plus 16 GB 2 GB Starry Black
    ₹ 6916 MRP ₹ 7999 -14%

कळत्या वयात खूप पैसे कमवण्यासाठी म्हणून लंडनला गेलेला आदित्य भारतात येतो आणि घरची मंडळी त्याचा साखरपुडा करून देतात. पण साखरपुडा उरकल्यानंतर लंडनला परत जाण्याऐवजी हा पठ्ठ्या थेट पुणं गाठतो. काय तर म्हणे अस्सल मराठी पद्धतीचं जेवण शिकायचंय… नसती बाईलवेडी कामं… असं आम्ही नाही बरं चित्रपटातील आजीचंच सांगणं आहे. अस्सल मराठमोळ्या पदार्थांच्या चवीच्या शोधात आलेल्या आदित्यचा हाती लागतो तो मित्रांसाठी आलेला जेवणाचा डब्बा. आता घरात तव्यावर सुरमई असताना समोर पोळीभाजी आणून ठेवली तर खरंतर हे बऱ्याचजणांसाठी दुर्दैव वगैरेच आहे. सुरुवातीला आदित्यच्या चेहऱ्यावरही असेच भाव असतात. पण, नाईलाजास्तव आदित्यला डबा उघडून त्यातलं खावं लागतं आणि पहिल्याच घासात त्याला त्या डब्यात सापडतं एक वेगळं जग. चवीचं, आपुलकीचं, प्रेमाचं, अनुभवाचं आणि मायेचं जग. त्या जगाचा मागोवा घेण्यासाठी म्हणून तो निघतो आणि खऱ्या अर्थाने पुण्यात आल्याची अनुभूती आदित्यला आणि प्रेक्षकांनाही होते.

पुढे आदित्यची गाठ पडते अस्सल पुणेरी राधा आगरकर नावाच्या एका मध्यम वयीन तरूणीशी. खरंतर तरुणी ही मध्यमवयीन नसते पण राधावर झालेला आघात आणि त्यानंतर तिला मिळालेलं हे आयुष्य आदित्यच्या येण्याने काहीसं प्रफुल्लित होत आणि तिला चक्क एक विद्यार्थी मिळतो. स्वयंपाक शिकण्यासाठी आलेला विद्यार्थी. मराठी पद्धतीचं जेवण बनवण्यासाठी राधाचा शिष्य होऊ इच्छिणाऱ्या आदित्यचा आटापिटा पाहता आजच्या दिवसांमध्ये जिथे चांगल्या पगाराची नोकरी आणि आयुष्यात स्थैर्य असण्याला प्राध्यान्य दिलं जात तिथे चक्क नोकरी सोडून असं कोणी येईल का, असाच प्रश्न पडतो. पण ‘असतील यालाही काही अपवाद’ असं म्हणून मन पुन्हा या पंगतीत येऊन बसतं. खूप वर्षे परदेशात राहिलेल्या एका तरुणाची भूमिका सिद्धार्थ चांदेकरने सुरेख साकारली आहे. पण काही ठिकाणी ‘उगाच….’ असं म्हणायला भाग पडणारी दृश्यं येतात आणि पंगतीतल्या जेवणात काहीतरी उणीवा काढल्या जातात तसं वाटू लागतं. सोनाली कुलकर्णीने राधा आगरकरचं पात्र साकारत चांगली कामगिरी बजावली आहे. तिच्या चाहत्यांसाठी ही भूमिका काही अंशी नवी आहे. दिग्दर्शकाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत राधा, आदित्य आणि एकंदर चित्रपटात जो साधेपणा जपला आहे तो मन जिंकून जातो.

चित्रपटातील वेशभूषा, पार्शवसंगीत, संवाद यांच्यात दिग्दर्शकाने भूतकाळ आणि वर्तमानाची सुरेख सांगड घातली आहे. त्यामुळे तो पाहताना आपलासा वाटतो. मुळात खाद्य संस्कृती त्यातही मराठी खाद्यसंस्कृती हा चित्रपटाचा गाभा असल्यामुळे पुरणाची पोळी, उकडीचे मोदक, साजूक तूप घातलेला वरण भात आणि त्याभोवती चित्रपटरुपी रांगोळी असं साग्रसंगीत भरलेलं पान कुंडलकर आणि त्यांच्या या ‘गुलाबजाम’चा टीमने प्रेक्षकांसमोर ठेवलंय. त्यामुळे एक एक पदार्थ ज्याप्रमाणे पानातून आपल्या जिभेवाटे पोटात जातो तसतसा हा चित्रपटही प्रत्येक दृश्यातून अगदी सहजपणे उलगडत जातो आणि अखेर प्रेक्षकरुपी खवय्यांच्या जीभेवर रेंगाळते ती म्हणजे या ‘गुलाबजाम’ची चव.

-सायली पाटील 

sayali.patil@loksatta.com

 

First Published on February 16, 2018 9:59 am

Web Title: gulabjaam movie review in marathi