20 March 2018

News Flash

कासवाच्या पोटातून सुटणारे कोडे

एखाद्या चित्रपटाची हीच कथा आहे, हाच विषय आहे असे म्हणता येत नाही.

Updated: October 7, 2017 9:48 AM

कित्येकदा अवघडल्या मनाचा गुंता सोडवणे फारच कठीण अशी आपली मानसिकता असते. मनाचा आजार ही संकल्पना तशी रूढार्थाने मान्य होणारी नाही आपल्याकडे.. एक वेळ सर्दी-पडशापासून मोठमोठय़ा आजारापर्यंत लढण्यासाठी तयार असणारी आपण माणसे मनाने खचलेल्याचा हात धरायलाही कचरतो. अनेकदा त्याचा हात धरून फक्त त्याच्याबरोबर चालण्याची, त्याच्याबरोबर असण्याची गरज असते. बाहेरच्या गोष्टींना घाबरून कासवासारखे अंग आक्रसून आत दडलेल्या मनाला मायेने, विश्वासाने पुन्हा लुकलुकत का होईना बाहेर पडण्यासाठी वाट करून द्यावी लागते. गुंता सुटणारच असतो पण भीतीने आपण तो अधिक गुंतवून ठेवतो. मनाचे हे कोडे कासवाच्या गोष्टीतून सहज उलगडून दाखवण्यात दिग्दर्शक सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर द्वयी यशस्वी ठरली आहे.

एखाद्या चित्रपटाची हीच कथा आहे, हाच विषय आहे असे म्हणता येत नाही. तो एका गोष्टीतून दुसरीत शिरत आजूबाजूचे जग नव्याने उलगडून दाखवतो. ‘कासव’ हा तो अनुभव आहे. नाही म्हणायला चित्रपटाच्या पहिल्या काही फ्रेममध्ये नैराश्याने ग्रासलेला एक तरुण (आलोक राजवाडे) दिसतो. इथे तिथे भटकणाऱ्या या तरुणाला नाव-गाव नाही. नैराश्याच्या भरात तो स्वत:चा जीव द्यायचा प्रयत्न करतो. पण मरणही येत नाही अशा अवस्थेत तो जानकीच्या (इरावती हर्षे) नजरेस पडतो. जानकीचा स्वत:चा असा इतिहास आहे. पण तो चित्रपटातही निदान ती सांगेपर्यंत तरी आपल्याला विचारावासा वाटत नाही. जानकी कोकणात एका प्रकल्पाच्या निमित्ताने आली आहे. इथे दत्ताभाऊंबरोबर (मोहन आगाशे) ती कासव संवर्धनासाठी काम करणार आहे. तिच्याबरोबर तिच्या मदतीला असणारा यदु (किशोर कदम) आहे. बाबल्या (संतोष रेडकर) आहे. त्यात भर पडते ती या तरुणाची.. जानकीसाठी कासवाची गोष्ट दत्ताभाऊं च्या तोंडून सुरू होते. आणि आपणही त्या गोष्टीत रमतो. एकीकडे कासवाचे जगणे समजून घेताना, घरी आलेल्या या आगंतुक पाहुण्याच्या मनाचा गुंता जानकीच्या लक्षात येतो. एकीकडे जानकीचा स्वत:च्या आयुष्यातील गुंता सोडवते आहे. हा गुंता सोडवण्यासाठीच कासव संवर्धनाच्या प्रकल्पाचा आधार घेणारी जानकी आणि तिच्या प्रयत्नांतून या तरुणाचा सुटत चाललेला गुंता अशा समांतर प्रवासात आपल्याच मनाच्या अनेक गोष्टी या दिग्दर्शकद्वयीने उलगडून दाखवल्या आहेत.

एकमेकांना समजून घेत पुढे गेलो तर अनेक अवघड गोष्टी सहजसाध्य होतात. एकटेपणाचे प्रत्येकाचे दु:ख, प्रत्येकाची सुखाची व्याख्या आणि मग त्या व्याख्येप्रमाणे थोडय़ाफार प्रमाणात बदलत जाणारी त्यांची सुखदु:खाची जाणीव हा सगळाच गुंता अगदी सोप्या पद्धतीने चित्रपट पाहताना लक्षात येईल इतकी सुंदर, सरळ मांडणी दिग्दर्शकांनी केली आहे. इथे पुन्हा एकदा नैराश्य आणि आजच्या काळातील एकूणच ताणतणाव पाहता पूर्वीच्या लोकांना हा त्रास नव्हता का? या सहज प्रश्नाचे उत्तरही दत्ताभाऊं च्या अनुभवातून समोर येते. परशूसारख्या लहानग्याला जे रोजच्या जगण्यातून शहाणपण येते ते आपल्यालाही का लक्षात येत नाही, हा विचार सतावतोच. बदलत्या काळातली जीवनशैली, ताणतणाव लक्षात घेता नात्यांचं स्वरूपही बदलायला हवे आहे, त्याची वीण घट्ट व्हायची तर तिथे फक्त रक्ताच्या नात्याचा विचार करून उपयोगी नाही. तिथे मनाने जोडणाऱ्या नात्याचा विचार महत्त्वाचा आहे आणि हे बदल लेखक-दिग्दर्शकाने जाणीवपूर्वक, अगदी ठळकपणे सहज मांडले आहेत.

आलोक राजवाडे, इरावती हर्षे, मोहन आगाशे, किशोर कदम या ताकदीच्या कलाकारांनी आपल्या अभिनयातून दिग्दर्शकाने मांडलेला हा आलेख अधिक धारदार केला आहे. चित्रपटातील ‘लेहेर समंदर रे’ या गाण्याची सुरावट असेल, निशाच्या तोंडून निघणारी सुरावट असेल किंवा कोकणातील निसर्ग, अथांग समुद्राची गाज आणि कासवाच्या साथीने रंगणारा हा अनुभव जाणीवनेणिवेतून समृद्ध करणारा आहे.

 • चित्रपट : कासव
 • दिग्दर्शक – सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर
 • कलाकार – इरावती हर्षे, आलोक राजवाडे, किशोर कदम, मोहन आगाशे, ओंकार घाडी, संतोष रेडकर, देविका दप्तरदार

First Published on October 7, 2017 5:55 am

Web Title: kaasav marathi movie review sumitra bhave sunil sukthankar
 1. S
  Shridhar Polke
  Oct 7, 2017 at 4:49 pm
  मराठी चित्रपट उत्तम दर्जाचे विषय हाताळतात. त्याबद्दल आभार. दुर्दैवाने मराठी लोकंच मराठी चित्रपटांना महत्व देत नाहीत पण फालतू हिंदी चित्रपट मात्र कोट्यावधी रुपये कमावतात!
  Reply