23 April 2019

News Flash

Farzand Movie Review: असा ‘फर्जंद’ पुन्हा होणे नाही

महाराजांनी स्वराज्यासाठी एकाहून एक सरस हिरे शोधून काढले होते. त्यातलाच एक अनमोल हिरा म्हणजे कोंडाजी फर्जंद.

'फर्जंद'

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आजही अनेकांच्या छाती इंचभर का होईना फुलतातच. एवढ्या वर्षांनंतरही जर महाराजांबद्दलची आत्मियता कमी झालेली नसली तर विचार करा की, शिवकालात काय वातावरण असेल? महाराजांनी स्वराज्यासाठी एकाहून एक सरस हिरे शोधून काढले होते. त्यातलाच एक अनमोल हिरा म्हणजे कोंडाजी फर्जंद.

आजवर आपण शिवाजी महाराजांच्या गौरव गाथा ऐकल्या, वाचल्या, पाहिल्या. पण त्यांच्या एका शब्दासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या त्यांच्या शिलेदारांचा मात्र इतिहासात फारसा उल्लेख दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सरदार कोंडाजी फर्जंद आणि पन्हाळा किल्ला काबीज करण्यासाठी मूठभर मावळ्यांच्या मदतीने दिलेल्या झुंजीची संघर्षमय गाथा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने ‘फर्जंद’ सिनेमाच्या माध्यमातून लिलया मांडली आहे.

अवघ्या साठ मावळ्यांनी अडीच हजार मुघल सैनिकांचा पराभव केला आणि पन्हाळगडाची मोहीम साडेतीन तासांत फत्ते केली. कमी मनुष्यबळ आणि युद्धसामग्रीच्या बळावर शत्रूवर विजय मिळवून युद्ध जिंकल्याची ही एकमेव ऐतिहासिक घटना मानली जाते. दिग्पालने याच घटनेवर ‘फर्जंद’ हा सिनेमा साकारला आहे.

मराठी सिनेमांमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग होत असतात. दिग्पाल आणि त्याच्या संपूर्ण टीमने मराठी सिनेसृष्टीत ‘फर्जंद’च्या निमित्ताने अजून एक साहसी प्रयोग केला असेच म्हणावे लागेल. ऐतिहासिक युद्धपट अशी या सिनेमाची ओळख म्हणता येईल. सिनेमात ६० ते ७० टक्के साहसी दृश्ये आहेत. शिवाजी महाराज यांची रणनीती, त्यांचा गनिमी कावा त्याचबरोबर मराठ्यांची शस्त्रे, युद्ध करण्याचे प्रकार याचेही दर्शन सिनेमातून उत्कृष्टरित्या दाखवण्यात आले आहे. मराठी सिनेमांना साहसी दृश्ये हाताळता येत नाही हे चित्र या सिनेमामुळे नक्कीच पुसले जाईल यात काही शंका नाही. काही दृश्यांमधील संकलन अजून चांगले होऊ शकले असते असे सिनेमा पाहताना नक्कीच वाटते.

या सिनेमाचा मुळ गाभा आहे तो व्हीएफक्स. एखाद्या सिनेमात ऐतिहासिक कथानक साकारायचे म्हणजे पडद्यावर तो काळ जसाच्या तसा उभारणे गरजेचे असते. त्या काळातील शहरे, वास्तू हुबेहूब साकारणे फार महत्त्वाचे असते. फर्जंदच्या टीमने व्हीएफक्सच्या माध्यमातून शिवकालीन जगच प्रेक्षकांसमोर उभं केलं आहे. रायगड किल्ल्याची बांधणी करतानाची दृश्यं या सिनेमात दाखवण्यात आली आहेत. मोठ्या पडद्यावर ते चित्र पाहताना नकळत आपण त्या काळात जातो, हे व्हीएफक्सच्या टीमचं खरं यश आहे.

अभिनेता चिन्मय मांडलेकरने शिवाजी महाराज यांची भूमिका फार उत्तमरित्या साकारली आहे. पडद्यावर शिवाजी महाराजांचे आगमन होताना अनेकदा आपण ‘बाहुबली- २’ तर पाहत नाही आहोत ना याची आठवण होते. आजच्या तरुण पिढीला शिवाजी महाराज आणि त्यांच्या कार्याबद्दल फारसे माहित नाही. त्यांच्यासाठी ‘फर्जंद’ हा सिनेमा नक्कीच पाहण्यासारखा आहे. नवोदित अभिनेता अंकित मोहन याने कोंडाजी फर्जंदची भूमिका साकारली आहे. अमराठी असूनही सिनेमामध्ये असलेला त्याचा वावर वाखाण्याजोगा आहे.

सिनेमाची लांबी जास्त असली तरी कोणत्याही क्षणी सिनेमा तुम्हाला कंटाळवाणा वाटत नाही. सिनेमाचा पुर्वार्ध जेवढा रंजक आहे तेवढाच उत्तरार्ध तुम्हाला खुर्चीत खिळवून ठेवतो. या सिनेमात उत्कृष्ट कलाकारांची फौजच आहे. गणेश यादवने साकारलेले तानाजी मालुसरे ही भूमिका पाहिली तर फार लहान आहे. पण लहान भूमिकाही लोकांच्या लक्षात कशी रहावी याचं कसब त्याच्याकडे पुरेपुर आहे. त्याचप्रमाणे प्रसाद ओकची ‘बहिर्जी नाईक’ ही भूमिका त्याच्या कारकिर्दितील लक्षात राहतील अशा भूमिकांपैकी एक असेल यात काही वाद नाही. बहिर्जीच्या साथीदाराची भूमिका अभिनेता निखिल राऊत याने साकारली आहे. बहिर्जीप्रमाणेच तोही स्वराज्यासाठी हेरगिरीचे काम करत असतो. प्रसाद आणि निखिलने संपूर्ण सिनेमात पाच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. समीर धर्माधिकारीने साकारलेली बेशक खानची भूमिका लक्षात राहते. या सिनेमामुळे एक वेगळा समीर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

स्लो- मोशन, अॅक्शन सीन, पाश्वसंगीत, भारावून टाकणारं भाषण यामुळे ज्यापद्धतीने शिवरायांचे मावळे स्वराज्यासाठी लढतात ते पाहून अनेकदा आपल्या अंगावरही काटा येतो. पडद्यावरील तसेच पडद्यामागील प्रत्येक कलाकाराने त्याचे सर्वोत्तम दिल्यावर पडद्यावर उत्कृष्ट कलाकृती साकारली जाते हे ‘फर्जंद’च्या टीमने पुन्हा एकदा दाखवून दिले.

सिनेमात अनेक कलाकार असूनही कोणताही कलाकार दुसऱ्यामुळे झाकोळला गेला नाही. सिनेमा संपताना जेवढा फर्जंद लक्षात राहतो तेवढी मृणाल कुलकर्णीने साकारलेली जिजाऊ, मृण्मयी देशपांडेने साकारलेली केसर आणि सिनेमातील प्रत्येक मावळा लक्षात राहतो. अंशुमन विचारेने साकारलेली ‘भिकाजी’ ही भूमिका अवघ्या काही मिनिटांची आहे पण तरीही त्या दोन मिनिटांचं त्यानं सोनं केलं असंच म्हणावं लागेल. दिग्पाल लांजेरकरने उचललेलं हे शिवधनुष्य त्याने लिलया पेललं असंच म्हणावं लागेल. त्यामुळे शिवाजी महाराज्यांच्या या ‘अनसंग हिरों’ची कामगिरी मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखी आहे.

-मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@loksatta.com

First Published on May 31, 2018 12:07 pm

Web Title: marathi movie farzand movie review chinmay mandlekar prasad oak digpal lanjekar mrunmayee deshpande