17 February 2019

News Flash

Raazi movie review: ती ‘राजी’ होती म्हणून…

एक काश्मिरी मुलगी साकारत असलेल्या आलियाच्या चेहऱ्यावरील निरागस भाव आणि त्यामागे दडलेली धाडसी सहमत बऱ्याच दृश्यांमध्ये प्रेक्षकांना अवाक् करुन जाते.

राजी

‘अगर दिल राजी है…’ हे ‘राजी’ या चित्रपटाचं शीर्षगीत ऐकलं त्याचवेळी एक वेगळ्या प्रकारची उत्साहाची लाट प्रेक्षकांमध्ये आली आणि त्याच उत्साहात, कुतूहलपूर्ण प्रश्नांच्या गराड्यात आलिया भट्टची मुख्य भूमिका असणारा ‘राजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चौकटीबाहेरच्या चित्रपटांचं दिग्दर्शन करत एका वेगळ्याच कथानकाला हात घालणाऱ्या मेघना गुलजारने पुन्हा एकदा ‘राजी’च्या निमित्ताने एक थरारक पण, तितकीच प्रेरणादायी कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.

चित्रपटासाठी तिच्या दिग्दर्शनाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण, मुख्य म्हणजे मेघनाला या चित्रपटात साथ मिळालेल्या प्रत्येकाचंच कौतुक झालं पाहिजे. कारण रुपेरी पडद्यावर तितक्याच ताकदीने दोन देशांमध्ये असणाऱ्या संवेदनशील संबंधांना हाताळत एखादी कथा प्रभावीपणे मांडणं हे आव्हानच जणू ‘राजी’च्या टीमने पेललं आहे. एका खऱ्याखुऱ्या अंडरकव्हर एजंट म्हणजे हेराच्या भोवती ‘राजी’चं कथानक फिरतं.

१९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये ज्यावेळी युद्धजन्य परिस्थिती उदभवली होती, त्या काळचा आधार घेत एक अंडरकव्हर एजंट शेजारी राष्ट्रात जाऊन आपल्या देशासाठी नेमकी कशी हेरगिरी करते याचं परिणामकारक आणि थरारक चित्रण म्हणजे राजी. निवृत्त नौदल अधिकारी हरिंदर सिक्का लिखीत ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर ‘राजी’ आधारित आहे. पाकिस्तानचे भारताविषयी असलेले मनसुबे ठीक नाहीत याची जेव्हा हिदायत खान (रजित कपूर) या भारतीय व्यावसायिकाला कुणकूण लागते तेव्हा पाकिस्तानमधील ब्रिगेडियर परवेज सैय्यद (शिशिर शर्मा)सोबत असलेल्या आपल्या मैत्रीपूर्ण संबंधांना नजरेत ठेवत हिदायत एक महत्त्वाचा निर्णय घेतात. आपल्या मुलीला म्हणजेच सहमतला (आलिया भट्ट) ते सैय्यदच्या मुलाच्या म्हणजेच इकबालच्या (विकी कौशल) पत्नीच्या रुपात पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा विचार करतात. देशाप्रती वडिलांच्या मनात असणाऱ्या भावनांना ओळखत सहमतही लग्नासाठी तयार होते आणि मग तिचा हेरगिरीचा प्रवास सुरु होतो. लग्नापूर्वीच सहमतला परिस्थितीची पूर्ण जाणिव करुन दिली जाते. त्यावेळी न डगमगता कोणत्याही परिस्थिती घट्ट पाय रोवून उभी राहणारी सहमत साकारणाऱ्या आलियाचा अभिनय पाहण्याजोगा आहे. शेजारी राष्ट्रातील एका प्रतिष्ठीत कुटुंबाची सून म्हणून जाणं आणि त्यातही सैन्यदलाशी संलग्न कुटुंबातूनच हेरगिरीची कामं करण्याचा संभाव्य धोका पत्करत सहमत तिचं काम सुरु ठेवते. या साऱ्यामध्ये तिला नेमक्या कोणत्या अडचणी येतात आणि त्या अडचणींमध्येही काही धाडसी निर्णय सहमत नेमकी कशी घेते याचं सुरेख चित्रण ‘राजी’मध्ये करण्यात आलं आहे. एका सत्यघटनेला चित्रपटरुपात प्रेक्षकांसमोर मांडताना मेघना गुलजारने यात मनोरंजनाचा भागही तितक्याच अलगदपणे हाताळला आहे. चित्रपटात थरारक कथानकासोबतच एक प्रेमकहाणीही हळुवरा उमलताना दिसते. अर्थात यात कुठेही अतिरंजकता नाही ही बाबही तितकीच खरी.

आलिया आणि विकी कौशलच्या अभिनयाची दाद द्यावी तितकी कमीच आहे. एक काश्मिरी मुलगी साकारत असलेल्या आलियाच्या चेहऱ्यावरील निरागस भाव आणि त्यामागे दडलेली धाडसी सहमत बऱ्याच दृश्यांमध्ये प्रेक्षकांना अवाक् करुन जाते. मुख्य म्हणजे सहमत प्रत्येकामध्येच दडलेली आहे, तिचा कोणता गुण आपल्यात आहे हे प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर येताना नक्कीच शोधतील. ‘राजी’ला चित्रपटरुपात मांडतेवेळी वेळेची मर्यादा असल्यामुळे कथानकाचा वेग कुठेतरी खटकतो. मुळात कथा वेगाने पुढे जाते. त्यामुळे चित्रपटाचा शेवट काय असेल याचा अंदाज मधान्यापासूनच प्रेक्षक लावण्यास सुरुवात करु शकतात. चित्रपटाती प्रत्येक पात्र, मग ती आलियाची खऱ्या आयुष्यातील आणि चित्रपटातील आई असो किंवा जयदीप अहलावत असो. प्रत्येक कलाकाराने साकारलेलं पात्र पाहताना आपणही एका वेगळ्याच काळात जातो हे खरं.

चित्रपटाच्या संगीताविषयी सांगावं, लिहावं आणि बोलावं तितकं कमीच आहे. शंकर-एहसान-लॉय या त्रिकूटाच्या संगीताची जादू प्रेक्षकांच्या मनावर इतक्या वर्षांपासून नेमकी का भुरळ घालतेय, याचंच उदाहरण राजीमधून पाहायला मिळतं. त्यात ज्येष्ठ गीतकार आणि शब्दांवर अधिपत्य असणाऱ्या कवी गुलजार यांनी रचलेली गीतं ‘राजी’ला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवतात. ‘दिलबरो’ असो किंवा मग ‘ए वतन’, प्रत्येक गीतातून सहमतचा प्रवास विविध मार्गांनी पाहण्याची संधी प्रेक्षकांना या चित्रपटाच्या निमित्ताने मिळते. भारताच्या इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या बऱ्याच गोष्टी इतिहासातच कुठेतरी धुसर झाल्या. याच गोष्टी ‘राजी’सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येत असून, चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांनीही त्याला ‘राजी’ म्हणत एकदातरी दाद द्यावी अशाच आहेत.

First Published on May 11, 2018 9:12 am

Web Title: meghna gulzar directed bollywood actress alia bhatt and vicky kaushal starrer raazi movie review in marathi