19 October 2019

News Flash

Mi Shivaji Park Movie Review : न्यायाची अतार्किक गोष्ट

महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाची शैली आक्रमक पद्धतीची आहे.

'मी शिवाजी पार्क'

अन्याय होताना शांतपणे बघणे हाही गुन्हा आहे, हे खरे आहे. अन्यायाला प्रतिकार करण्याचे दोनच मार्ग आपल्याला वर्षांनुवर्षे माहिती आहेत. एक तर कायद्याच्या चौकटीत राहून गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसावादी, असहकाराच्या मार्गाने जाण्याची मवाळ भूमिका, नाही तर दुसरी ‘जशास तसे’ या वृत्तीने आपला न्याय आपणच शोधण्याची भूमिका आहे. जिथे हिंसा आणि कायद्याची मोडतोडच अभिप्रेत आहे. या दोन वाटांच्या मध्ये उभे राहून न्याय मिळवायचा की अन्याय सहन करायचा हे ठरवताना भल्याभल्यांची मती कुंठित होते. तिथे मग पोलीस सेवेत किंवा न्यायाधीश म्हणून अनेक वर्षे काम करूनही अनुभवी म्हणवल्या जाणाऱ्यांनाही जेव्हा याचे उत्तर मिळत नाही तेव्हा पुन्हा एकदा तोच आपापल्या पद्धतीने न्याय मिळवण्याचा पर्याय उरतो, हीच गोष्ट ‘मी शिवाजी पार्क’ या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटातून अधोरेखित झाली आहे.

महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाची शैली आक्रमक पद्धतीची आहे. ‘वास्तव’, ‘कुरुक्षेत्र’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमधून आपण त्यांचा नायक आक्रमक पद्धतीने त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीशी लढताना पाहिला आहे, मात्र तो त्या त्या चित्रपटाच्या वेळी अधिक खराच वाटला. ‘मी शिवाजी पार्क’ चित्रपटात पाच नायक आहेत. निवृत्तीनंतर दररोज शिवाजी पार्कवर भेटून फिरायला जाणारी, आपली सुखदु:खे वाटून घेणारी ही पाच मित्रमंडळी. यात न्यायाधीश विक्रम राजाध्यक्ष (विक्रम गोखले) आहेत. बँकेतून निवृत्त झालेले साधेभोळे सतीश जोशी (सतीश आळेकर) आणि गांधीजींची अहिंसा-सत्याच्या तत्त्वाची कास धरणारे प्राध्यापक दिलीप प्रधान (दिलीप प्रभावळकर) एकीकडे आहेत, तर पोलीस खात्यातून निलंबित झालेले इन्स्पेक्टर दिगंबर सावंत (अशोक सराफ) आणि कायम आनंदी राहणारे डॉ. रुस्तम मेस्त्री (शिवाजी साटम) अशा पाच जणांची ही टोळी एकत्र आली आहे. एरव्हीही चहाच्या एका कपावर वर्तमानपत्रातील बातम्या वाचत सामाजिक परिस्थितीचे आपापल्या बुद्धीने आणि अनुभवाने (कारण यांच्यात एक पोलीस आणि एक न्यायाधीश आहे.) विश्लेषण करत सरतेशेवटी आपल्याला त्याच्याशी काय देणेघेणे आहे, याच सर्वसामान्यांच्या भूमिकेवर पोहोचणारी ही मंडळी आहेत. अशीच एक बातमी त्यांच्या वाचण्यात आणि पाहण्यात येते. एका मॉडेलची हत्या झाली आहे, संशयित बिल्डरचे नाव माहिती आहे, मात्र त्याला अटक होणार नाही हेच आजवरचा अनुभव सांगत असतो. मात्र तसे होत नाही आणि त्याला कारण ही पाच मंडळीच ठरतात. संकट आपल्या दाराशी येऊन उभे राहत नाही तोवर आपण पेटून उठत नाही. इथे हे पाचही जण मैत्रीला जागत आपल्या अनुभवाच्या आधारे न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतात.

अर्थात, वर सांगितली तशी साधेपणाने गोष्ट जात नाही, त्यातही ती खास मांजरेकर शैलीत वळण घेते. ते वळणच मूळ कथेला बाधा आणणारे आहे. पूर्वार्धातली गोष्ट तिथेच संपते. आता त्याचे परिणाम पुढच्या भागात पाहायला मिळतील, या पाच जणांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य ठरणार, त्याचे या पाचही जणांवर काय परिणाम होणार, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. या प्रकरणाचा माग घेणारा इन्स्पेक्टरही (अभिजीत साटम) यात आहे; पण तरी त्या दिशेने गोष्ट सरकत नाही. तिथे दुसरी गोष्ट सुरू होते आणि पुन्हा हे पाच जण अशाच वळणावर येतात. हा भरकटलेपणा कमी झाला असता तर चित्रपटाचा वाढलेला वेळ वाचवता आला असता. पाच मित्रांमधली एकाचीही अहिंसावादी वृत्ती, सत्याचा मार्ग बाकीच्यांना अडचणीत आणतो का, हे पाहणे अधिक रंजक ठरले असते. त्याऐवजी ज्या पद्धतीने हे पाचही जण न्याय मिळवतात आणि पुन्हा आपल्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे हे पाऊल उचलावे लागले हे सांगण्याचा प्रयत्न करतात, तो पटत नाही. मुळात तत्त्वाच्या नाहीच, पण तर्काच्या कसोटीवरही या चित्रपटाची गोष्ट ताडून पाहिली तरी ती कोणालाच पटणार नाही. पाच सक्षम, अनुभवी कलाकार हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे आणि ती ताकदही आहे. या पाचही जणांना त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ानुसार व्यक्तिरेखा दिल्या असल्याने ते चपखल बसले आहेत. त्यांच्यात एकही असा कलाकार नाही जो एकमेकांपेक्षा कुठे उणा पडला आहे. अशोक सराफ, शिवाजी साटम, सतीश आळेकर, दिलीप प्रभावळकर आणि विक्रम गोखले या पाचही जणांनी अगदी सहजपणे त्यांच्याकडे आलेल्या व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारल्या आहेत, मात्र या पाचही जणांना एका वेगळ्या पद्धतीने या मैत्रीच्या नात्यात घट्ट बांधता आले असते; पण तेवढा वेळ चित्रपट देत नाही. तो घटनांमध्ये जास्त अडकतो. शिवाजी पार्कचा नावातला उल्लेख हा जसा जागेशी आहे तसाच तो एका अर्थाने शिवाजी महाराजांच्या न्यायी राजाच्या वर्तनाशीही आहे. मात्र दिग्दर्शक म्हणून मांजरेकर प्रभावी आहेत. त्यामुळे चित्रपट तांत्रिक अर्थाने कुठेही कमी पडत नाही, पण अतार्किक पद्धतीने मांडलेली ही न्यायाची गोष्ट पटणारी नसल्यानेच प्रभावी वाटत नाही; पण मराठीतील पाच दिग्गज कलाकार आणि तितकाच दिग्गज दिग्दर्शक यांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारलेला चित्रपट हे याचे खास वैशिष्टय़ आहे.

First Published on October 20, 2018 1:03 pm

Web Title: mi shivaji park movie review mahesh manjrekar ashok saraf vikram gokhale dilip prabhavalkar