scorecardresearch

MOM movie review – मातृत्वाची नवी मांडणी, प्रभावी कहाणी ‘मॉम’

व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आपल्या मित्रमंडळींसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या आर्याचा बलात्कार होतो

RatingRatingRatingRatingRating
mom, sridevi
7 जुलै रोजी 'मॉम' हा चित्रपट प्रदर्शित झाला.

भारतीय चित्रपटांमध्ये आजवर आईच्या भोवती फिरणारी बरीच कथानकं साकारण्यात आली आहेत. विविध चित्रपटांतून हे ‘आई’ फॅक्टर प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे. त्याच धर्तीवर आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. अभिनेत्री श्रीदेवीची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून या घटकावर पुन्हा नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे तो चित्रपट म्हणजे रवी उदयवार दिग्दर्शित ‘मॉम’.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच शिक्षिकेच्या रुपातील देवकी ( श्रीदेवी ) प्रेक्षकांच्या भेटीला येते. आपल्या मुलीप्रती तिची असलेली ओढ या दृश्यांतून चित्रपटाच्या सुरुवातीलाच सर्वांच्या लक्षात येते. पण, आर्याप्रती ( सजल अली) तिचं प्रेम आणि आपुलकी असूनही, ती आपली सावत्र आई असल्याचं आर्या काही केल्या विसरत नाहीये. त्यामुळे आई- मुलीच्या नात्यात असलेली सहजता या चित्रपटात पाहायला मिळत नाहीये. त्या दोघींचं नातं पाहता चित्रपटात एक वळण येतं आणि कथानकाला चालना मिळते. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आपल्या मित्रमंडळींसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या आर्याचा बलात्कार होतो, तिचा शारीरिक छळ केला जातो. त्यानंतर कोर्टात सुरु असलेले खटले, दोषी असणाऱ्यांचीही निर्दोष मुक्तता होणं आणि एका आईची आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठीची तिची धडपड हे पुन्हा एकदा त्याच वळणावर जाताना दिसतं.

वाचा : भारत हा एक वाईट देश, वीणा मलिक बरळली

या चित्रपटातून ‘मॅथ्यू फ्रान्सिस’ म्हणजेच अभिनेता अक्षय खन्ना आणि डिटेक्टीव्ह ‘दयाशंकर कपूर’ म्हणजेच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. आर्या नेमकी तिच्या आईचा म्हणजेच श्रीदेवीचा राग का करते, त्यांच्या नात्यात सहजता कधी येणार, आर्याला तिची चूक कळणार की नाही, तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांचं काय होणार या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. ‘मॉम’ या चित्रपटाचं कथानक पुन्हा पुन्हा त्याच वाटेवर जाणारं वाटलं तरीही या चित्रपटाचं एकंदर सादरीकरण, पार्श्वसंगीत आणि कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्दर्शकाचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. पण, शेवटी शेवटी ही पकड कुठेतरी ढिली पडताना दिसतेय.

वाचा : वाढदिवसाच्या निमित्ताने दीपिकासोबत रणवीरचा नव्या कारमधून फेरफटका

‘मॉम’चित्रपटातील श्रीदेवीच्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर ‘मॉम’ म्हणजेच श्रीदेवी हे सुरेख समीकरण तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटातील प्रत्येक दृश्यात या अभिनेत्रीने जीव ओतल्याचं पाहायला मिळतं. अर्थात हा तिच्या कारकिर्दीतील ३०० वा चित्रपट असण्याबद्दलही अनेकांकडून सध्या तिचं कौतुक होत आहे. कलाकारांच्या सुरेख अभिनयाने सजलेला हा चित्रपट आणि त्याला मिळालेली रेहमानच्या संगीताची जोड या चित्रपटाच्या जमेच्या बाजू. त्यामुळे समाजातील दाहक वास्तव पुन्हा एकदा प्रभावीपणे प्रेकक्षकांसमोर मांडणारा हा ‘मॉम’ एकदातरी पाहावा असाच आहे.

मराठीतील सर्व चित्रपट समिक्षण ( Movie-review ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-07-2017 at 12:25 IST