21 October 2018

News Flash

Mukkabaaz movie review : जातिभेदाचे सत्य उलगडणारा दणकट ठोसा

परिस्थितीतील भयाण वास्तव रंगवताना ते अंगावर येईल अशा पद्धतीची मांडणी असणारे चित्रपट ही अनुरागची खासियत

विनीत कुमार सिंग, झोया हुसैन

‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गुलाल’ हे अनुराग कश्यपचे चित्रपट ज्यात सामाजिक-राजकीय मुद्दय़ांवर शैलीदार प्रहार करत त्याने नाटय़ रंगवले होते. ‘मुक्काबाज’ हा खूप वर्षांनी त्या पंक्तीतला म्हणता येईल असा चित्रपट आहे. परिस्थितीतील भयाण वास्तव रंगवताना  ते अंगावर येईल, अशा पद्धतीची मांडणी असणारे चित्रपट ही खरे म्हणजे अनुराग यांची खासियत आहे, ‘मुक्काबाज’मधूनही प्रेमापासून खेळापर्यंत प्रत्येक गोष्ट जातिभेदावरच तासून घेणाऱ्या समाजाच्या ढोंगीपणावर हल्ला चढवतानाही तो संयमितपणे हाताळला आहे. त्यामुळे एकाअर्थी सकारात्मकता देणारा असा हा चित्रपट इतर चित्रपटांच्या गर्दीत वेगळा ठरतो.

बरेली (हल्ली हिंदी चित्रपटात बरेलीला पुन्हा महत्त्व आले आहे) सारख्या शहरांत बॉक्सर बनण्याचे स्वप्न पाहणारा श्रवण (विनीत कुमार सिंग) गावात बॉक्सिंगच्या खेळापासून सगळी ताकद हातात एकवटलेल्या भगवानदास मिश्राच्या (जिम्मी शेरगिल) हातातले खेळणे झाला आहे. बॉक्सर बनण्याच्या स्वप्नाला वास्तवात आणण्यासाठी झटणारा श्रवण भगवानदासच्या पुतणीच्या सुनयनाच्या (झोया हुसैन) पाहताक्षणी प्रेमात पडतो. त्याचवेळी भगवानदासची गुलामी नाकारत बॉक्सर होण्यासाठी वेगळी वाट धरणाऱ्या श्रवणचा संघर्ष सुरू होतो. वरवर पाहता ती धाटणीतील उत्तर प्रदेशात घडणारी प्रेमकथा, दोन वर्गाचा जातिसंघर्ष.. मारमारी असेल असे वाटते. मात्र ‘मुक्काबाज’ हा आजच्या काळातील वास्तवाचे बोट धरून पुढे नेणारा, सर्वसामान्यांच्या आयुष्यात जसा संघर्ष घडेल तसा तो दाखवणारा चित्रपट आहे. त्यामुळे भगवानदासचा ब्राह्मण असण्याचा गर्व आणि स्वत:ची जात उच्च असल्यामुळेच गावचे कर्तेधर्ते आहोत, असा दर्प आजच्या काळातही सर्वसामान्यांना हैराण करतो, हे सत्य चित्रपट समोर ठेवतो. श्रवणला फक्त प्रेमातच जात आडवी येते असे नाही, तर ज्या खेळात त्याला प्रावीण्य मिळवायचे आहे तिथेही ती आडवी येते, खेळातली कोटा व्यवस्था आणि त्यातून केवळ खेळामुळे वर येऊनही नोकरी मिळाल्यानंतर सरकारी बाबूंचे खेळाडूंना नोकरासारखे वागवणे अशा अनेक गोष्टींवर दिग्दर्शकाने बोट ठेवले आहे.

जातिपातीचे राजकारण असतानाही खेळगुणांवर विश्वास ठेवून सतत पुढे जात राहणारा जिद्दी नायक जेव्हा एका क्षणाला याच गुंडागर्दी आणि व्यवस्थेपायी हतबल ठरतो. तेव्हा याच व्यवस्थेचा शिकार झालेला आणि त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडल्यावर इतरांना मार्गदर्शन करणारा कोच संजीव कुमार (रवी किशन), श्रवणचा मित्र गोपाल अशी मंडळी त्याला पुन्हा आश्वस्त करतात. परिस्थितीमुळे हारही मानायची नाही आणि त्याचवेळी स्वत:चा तोल जाऊ न देता त्यातून हुशारीने मार्ग काढण्यासाठी श्रवणला प्रवृत्त करणारी मंडळी चित्रपटात महत्त्वाची ठरतात.

प्रेमकथाही या चित्रपटात तथाकथित प्रेमाची गोष्ट रंगवत नाही. चित्रपटाची नायिका मुकी आहे, पण तिची नजर भेदक आहे. तिला पुढे शिकायचे आहे, मुकी आहोत म्हणून गरीब गाईसारखे कोणाच्याही दावणीला बांधून घ्यायचे नाही याबद्दल ती ठाम आहे. अगदी लग्न झाल्यानंतरही नवऱ्याने सांकेतिक भाषा शिकून तिच्याशी संवाद साधावा, असा आग्रह ती धरते. आजच्या काळातील मुलींचे हे प्रभावी रूप सुनयनाच्या निमित्ताने पाहायला मिळते.

चित्रपट एका ‘मुक्काबाज’बद्दल असला तरी त्याची हारजीत हा चित्रपटाचा विषय नाही. एका बॉक्सरला अव्वल होण्यासाठीचा संघर्ष कथेच्या ओघात येतो, मात्र म्हणून नायकाचे जिंकणे एवढाच चित्रपटाचा विषय नाही, याचे भान दिग्दर्शकाने ठेवले आहे. श्रवण आणि त्याच्या वडिलांचे नाते, त्यांच्यातील संवाद असेल किंवा सुनयना आणि तिच्या आईमधला संवाद हा खूप वास्तव पद्धतीने, कोणाच्याही घरात सहज पाहायला मिळेल असा आहे. मध्यंतरापूर्वी चित्रपट बराच रेंगाळला आहे, त्या मानाने उत्तरार्धात वेगाने घटना घडतात. ‘पैंतरा’सारखे एखादे गाणे वगळता इतर गाणी ठाव घेत नाहीत.

कलाकारांच्या बाबतीत श्रीमंत असा हा चित्रपट आहे. जिम्मी शेरगिल आणि रवी किशन ही मान्यवर नावे सोडली तर नायक विनीत कुमारपासून सगळेच कलाकार तुलनेने नवीन आहेत, पण अभिनयाच्या बाबतीत सगळे एकापेक्षा एक सरस ठरले आहेत.

चित्रपट समीक्षक – रेश्मा राईकवार

First Published on January 13, 2018 8:21 am

Web Title: mukkabaaz movie review in marathi the vineet kumar singh and anurag kashyap film knock out punch