24 February 2019

News Flash

Mulk Movie Review : जातीयवादात अडकलेल्या समाजाला आरसा दाखवणारा ‘मुल्क’

Mulk Movie Review : चित्रपटाचा प्रत्येक भाग वास्तवदर्शी दिसून आला आहे.

Mulk Movie Review

Mulk Movie Review :  देश प्रेम, देशभक्ती हे शब्द ऐकायला छान वाटतात नाही ? मात्र ते सिद्ध करण्याची वेळ आली की अनेकांना शक्य होत नाही. अनेक वेळा आपल्याच देशात, आपल्या बरोबर वावरणारे लोक ज्यावेळी आपल्याला देशद्रोही, दहशतवादी म्हणून हिणवतात त्यावेळी एखाद्याची काय अवस्था होत असेल हे शब्दात सांगणं शक्य नाही. मात्र मनाची होणारी घुसमट, देशप्रेम आणि एखाद्या गोष्टीकडे समाजाचा बदलेला दृष्टीकोन मांडण्याचा प्रयत्न अनुभव सिन्हा यांनी ‘मुल्क’ या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे.

पाकिस्तान सोडून अन्य देशांमध्ये स्थायिक असलेला मुस्लीम व्यक्ती कायमच दहशतवादी कारवायांचा एक भाग असेलच असं नाही. आजवर असे अनेक मुस्लीम नागरिक आहेत जे पाकिस्तान सोडून अन्य देशांमध्ये राहतात. मात्र ते ज्या देशात राहतात त्या देशाचे पूर्णपणे होऊन जातात. त्यांच्या मनात त्याच देशाबद्दलचा आदर असतो जेथे ते राहतात. जी त्यांची कर्मभूमी असते. या साऱ्याचा सारासार विचार करुन हिंदू-मुस्लीम व्यक्तींमधील प्रेम ‘मुल्क’मधून दिसून येतं. मुराद अली मोहम्मद, आरती मोहम्मद, शाहिद,बिलाल, संतोष आनंद, दानिश जावेद या पात्रांच्या माध्यमातून चित्रपट साकारण्यात आला असून प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न काही अंशी यशस्वीही ठरला आहे.

अनुभव सिन्हा यांनी चित्रपटाला योग्य दिशा दाखविली असून त्यांनी दिग्दर्शकाची जबाबदारी उत्तमरित्या पार पडली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कुठेही जातीयवाद निर्माण होईल किंवा एखाद्या धर्मावर टीका होईल असं चित्रीत करण्यात आलेलं नाही. त्यामुळे चित्रपटाला योग्य दिशा मिळाल्याचं दिसतं. त्याप्रमाणेच हा चित्रपट कोर्टरुम प्रकारात मोडत असल्यामुळे एकाच वेळी सहा कॅमेरांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटाचा प्रत्येक भाग वास्तवदर्शी दिसून आला आहे.

वाराणसीमधील एका सामान्य मुस्लीम कुटुंबात वाढलेल्या शाहिदवर एका प्रकरणामुळे दहशतवादी हा ठप्पा बसतो. ज्याची झळ संपूर्ण कुटुंबाला लागते. रोज हिंदू कुटुंबांच्या सानिध्यात राहणाऱ्या या मुस्लीम कुटुंबाकडे क्षणार्थात सारं वाराणसी दहशतवादी म्हणून पाहू लागतं. इथूनच सुरु होतो या कुटुंबाचा समाजाबरोबरचा लढा. प्रत्येक मुस्लीम व्यक्ती दहशतवादी नसतो. त्या मुस्लीम व्यक्तीचंही त्या राष्ट्रावर तेवढंच प्रेम असतं जेवढे त्या राष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं असतं. त्यामुळे समाजाबरोबरची सुरु झालेली ही लढाई न्यायालयाच्या पायरीवर येऊन पोहोचते.

शाहिदला दहशतवादी संघटनेबरोबर हातमिळवणी करण्यास त्याच्या वडीलांनी (बिलाल) यांनीच फूस लावल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्यात येते. यातून पुढे चित्रपटाची खरी रंगत वाढत जाते. त्यातून बिलाल यांचा भाऊ मुराद अली मोहम्मद (ऋषी कपूर) आपल्या भावाला न्यायालयाच्या कचाट्यातून वाचविण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्यांना साथ मिळते ती त्यांची सून आरतीची (तापसी पन्नू). लंडनला राहणारी आरती आपल्या सासरी येते आणि तिला समाजातील या मानसिकतेचं दर्शन होतं. प्रत्येक जाती-धर्माच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेणाऱ्या गाण्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कुटुंब, समाज यांच्यावर प्रकाश टाकण्याचं काम या गाण्यांमधून होत असल्याचं पाहायला मिळतं.

‘मुल्क’च्या माध्यमातून अनुभव सिन्हा यांनी उत्तम कलाकारांची निवड केली आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे तापसी पन्नू आरतीची भूमिका जगली आहे. तर ऋषी कपूर (मुराद अली मोहम्मद) यांनीही तिला तोडीस तोड असा अभिनय केला आहे. या साऱ्यामध्ये संतोष आनंदने (आशुतोष राणा) वकीलाची भूमिका करत बाजी मारुन नेली आहे. विशेष म्हणजे बिलाल (मनोज पाहवा) यांनीही देश आणि मुलगा याच्या कचाट्यात सापडलेल्या वडीलांच्या द्विधा मन:स्थिती उत्तमरित्या रेखाटली आहे.

थोडक्यात, काय तर देशप्रेम कधी सिद्ध करता येत नाही. तर आपण देशावर केवळ प्रेम करायचं असतं. प्रत्येक राष्ट्र हे कोणासाठी ‘मुल्क’ असेल तर कोणासाठी ‘देश’. पण तेथे राहणारा प्रत्येक नागरिक त्याच्यावर भरभरुन प्रेम करत असतो, हेच यातून रेखाटण्यात आलं आहे.

 

First Published on August 3, 2018 12:37 pm

Web Title: mulk movie review in marathi