21 January 2019

News Flash

Movie Review Aapla Manus: स्वतःच्या चुका शोधायला लावणारा ‘आपला मानूस’

आपलं कोणीतरी आहे ही भावनाच सुखावून जाते

नाना पाटेकर

‘हा माझा माणूस आहे…’ असं म्हणताना म्हणणाऱ्याची छाती आपसूक फुलून येते. आपलं कोणीतरी आहे ही भावनाच सुखावून जाते. आपला ‘माणूस’ म्हणा किंवा ‘मानूस’, आपलं म्हटलं की त्यात जवळीक, आपुलकी ही आलीच. त्यातही भारतीय माणूस हा सहसा नातेसंबंधांच्या बाहेर जाण्याचे धाडस करत नाही. तो स्वतःबरोबर प्रत्येक नाती पुढे घेऊन जात असतो. त्यात त्याची संमती किती असते हा एक वेगळा मुद्दा. जग बदलतंय तसं माणसांचं राहणीमान आणि त्यांची विचारसरणीही बदलत चालली आहे. आजच्या तरुण पिढीच्या मनात नातेसंबंध, कुटुंबपद्धती यासर्वाबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रत्येकाचे मन राखायची खरंच गरज आहे का? असा सवाल हल्ली अनेकजण विचारताना दिसतात. एकत्र राहूनही एकमेकांमधला संवाद कमी का झाला आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘आपला मानूस’ हा सिनेमा एकदा तरी पाहावा लागेल.

विवेक बेळे यांच्या ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकावर हा सिनेमा आधारित आहे. राहुल (सुमित राघवन) आणि भक्ती (इरावती) हे दाम्पत्य बदलत्या शहरी जीवनाशी सामना करत असतात. तर दुसरीकडे घरी असलेल्या राहुलच्या बाबांसोबत शक्य तेवढे जुळवून घेण्याच्या प्रयत्न करत असतात. राहुल हा वकील असतो तर भक्तीही कॉलेजमध्ये शिक्षिका असते. सध्याची पिढी ही करिअरला सर्वोतोपरी प्राधान्य देत असल्यामुळे घराकडे फारसे लक्ष देऊ शकत नाही. हे सर्व जाणीवपूर्वक केले जाते असे नाही, पण या स्पर्धात्मक युगात त्यांना पुरेसावेळ घरात देता येत नाही. पण जुन्या पिढीला यासर्व गोष्टी उमगण्यास काहीसा जास्त वेळ द्यावा लागतो. तेवढा वेळ देण्याची तयारी सध्याच्या पिढीची नसते. यातच सुरू होतो वाद- प्रतिवाद आणि सूडाचा खेळ.

सिनेमात नाना पाटेकरांच्या एण्ट्रीसाठी दिग्दर्शकाला कोणताही विशेष घाट घालावा लागला नाही. कारण कथानकाचा प्रवाह आणि गरजेनुसार नाना कधी आपल्या समोर येतात ते कळतही नाही. पण ते पडद्यावर दिसल्यावर नानाची एण्ट्री झाली याची अनुभूती आपसुक होते. सिनेमाच्या सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत मारुती नागरगोजे (नाना पाटेकर) हा वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्याच्या तोंडी असलेले संवाद भाव खाऊन जातात. पण याचा अर्थ नानांमुळे सुमित आणि इरावतीचे काम दिसत नाही असे मुळीच नाही. सिनेमात जेवढे नाना दिसतात तेवढेच सुमित आणि इरावतीही दिसतात. उत्कृष्ट अभिनय कसा असावा यासाठी हा सिनेमा पाहण्यापेक्षा, अभिनयात सहजता कशी असावी यासाठी हा सिनेमा नक्की पाहावा. प्रत्येकाने आपल्या नावाला साजेसा असाच अभिनय केला आहे. थरारपट असल्यामुळे आपल्याला गुन्हेगार कळला असे वाटत असतानाच सिनेमाची कथा नवे वळण घेते आणि पुन्हा नव्याने सुरू होते. गुन्ह्यातील प्रत्येक पैलू उलगडून दाखवताना सिनेमा काहीवेळा लांबला आहे असे वाटते. पण तुम्हाला हे वाटतानाच सिनेमा पुढे सरकलेला असतो. सिनेमात कोणतीही गाणी नाहीत. पण सिनेमाचे पार्श्वसंगीत ही जमेची बाजू आहे. सिनेमात व्हीएफएक्सचाही वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. थरारपट सिनेमात व्हिएफक्सची गरज काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण सिनेमा पाहताना त्याचे कारण स्पष्ट होते. सिनेमाच्या जमेच्या बाजूत दिग्दर्शन, कलाकार यांचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व संकलनाचेही आहे.

सिनेमातील संवाद हा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे. हे संवाद ऐकताना आपण स्वतःला त्या परिस्थितीत ठेवतो आणि कळत- नकळत आपल्याला आपल्या माणसाची, त्या परिस्थितीची आठवण होऊन जाते. एकाच नाण्याला दोन बाजू असतात. पण आपलीच बाजू कशी खरी हे सिद्ध करण्यात अनेकदा आपण दुसरी बाजू पाहतच नाही. आज आपण इतरांना खूप प्रश्न विचारतो, पण स्वत:ला कधीच प्रश्न विचारत नाही. स्वत:शी बोलत नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आणि तरुण जोडप्यांच्या नात्यामध्ये आलेली गुंतागुंत या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘आपला मानूस’ सिनेमातून ही गुंतागुंत सोडवण्याचा सतीश राजवाडेच्या टीमने काही अंशी प्रयत्न केला आहे असे म्हणावे लागेल. त्यामुळे सिनेमा पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या आपल्या मानसाची आवर्जून विचारपुस कराल हे निश्चित.

– मधुरा नेरूरकर

madhura.nerurkar@loksatta.com

First Published on February 9, 2018 7:00 am

Web Title: nana patekar sumeet raghwan iravati harshe satish rajwade marathi movie aapla manus movie review