17 December 2017

News Flash

Newton Review : समाज‘व्यवस्थे’ची रंगतदार सर्कस

दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी या व्यवस्थेतील मूळ विसंगतीवरच अचूक बोट ठेवले आहे.

Updated: September 23, 2017 8:33 AM

न्यूटन, राजकुमार राव

काही शब्दांचे कौतुक करावे तितके थोडे इतके ते रोजच्या व्यवहारात चपखल बसून जातात. ‘व्यवस्था’ हा आपल्या एकूणच सामाजिक, सरकारी आणि अगदी वैयक्तिक नित्यक्रमासाठीही महत्त्वाचा असलेला असा शब्द. लोकशाही व्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि आपली स्वत:च्या सोयीची व्यवस्था यात प्रत्येक जण इतका व्यवस्थित अडकला आहे की त्यातून बुद्धीच्या किंवा तर्काच्या आधारेही कोणी बाहेर पडायचा प्रयत्न केलाच तर तो इतरांच्या दृष्टीने वेडा ठरतो. ‘न्यूटन’ या आपल्या दुसऱ्याच चित्रपटातून लोकशाही व्यवस्था आणि निवडणुका ही आपल्या समाजव्यवस्थेची दरवर्षी रंगणारी सर्कस दाखवताना दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी या व्यवस्थेतील मूळ विसंगतीवरच अचूक बोट ठेवले आहे.

सहज घडलेला एखादा किस्सा सांगताना त्यातली प्रमुख पात्रे हळूहळू तपशिलासह उलगडत नेऊन त्यांच्या वृत्ती-प्रवृत्ती आणि आजूबाजूच्या परिस्थितीच्या संघर्षांतून आपल्याला जे सांगायचे आहे ते नेमकेपणाने दाखवून देणे फार थोडय़ा लोकांना जमते. अमित मसूरकर यांनी ‘न्यूटन’मध्ये ते सहज-साध्या आणि प्रभावी पद्धतीने दाखवून दिले आहे. न्यूटन म्हणजे नूतन कुमार (राजकुमार राव) हा तत्त्वांना जीव की प्राण मानून चालणारे व्यक्तिमत्त्व. त्याच्या या अत्यंत प्रामाणिक असण्याचा फायदा होण्यापेक्षा अनेकांना फटकाच बसतो. पण त्याचे वागणे अगदीच चुकीचे नाही हेही सुज्ञ लोक ओळखून आहेत. त्यामुळे न्यूटनला जेव्हा निवडणूक अधिकारी म्हणून छत्तीसगढच्या नक्षलवादी भागात पाठवायची वेळ येते तेव्हा वरिष्ठ अधिकारीही त्याच्या या स्वभावामुळे त्याला सांभाळून वागण्याचा सल्ला देतात. न्यूटनचा स्वभाव, त्या स्वभावामुळे त्याच्या वैयक्तिक जीवनात होणाऱ्या उलाढाली ते नक्षलग्रस्त गावात येऊन ठेपण्यापर्यंतचा त्याचा प्रवास हा या चित्रपटाचा एक भाग आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे नक्षलग्रस्त गावातही मतदान झालेच पाहिजे, या उद्देशाने झपाटून जाऊन काम करणारा न्यूटन आणि अशा गावात मतदान झाले काय नाही झाले काय?, फार फरक पडणार नाही. असे ऐकवत तिथली सुरक्षेची घडी बिघडू नये म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांना नक्षलवाद्यांच्या भीतीचा बागुलबुवा उभा करीत आल्या पावली परत पाठवण्याचा हट्ट करणारा मेजर आत्मा सिंग (पंकज त्रिपाठी) या दोन वृत्तींमधला संघर्ष इथे महत्त्वाचा ठरतो. दोन टोकाची मते असलेले हे अधिकारी जसे आहेत. तसेच यातला सुवर्णमध्य साधत हरएक व्यवस्थेत फिट बसण्याचा प्रयत्न करणारी सामान्य जनता या अर्थाने न्यूटनचे सहकारी लोकनाथ (रघुवीर यादव), शंभुनाथ (मुकेश प्रजापती) आणि माल्को (अंजली पाटील) यांचीही बाजू दिग्दर्शकाने ठळकपणे मांडली आहे. या एवढय़ा व्यक्तिरेखा एकत्र आल्यानंतर त्यातून रंगणारी व्यवस्थेची सर्कस दिग्दर्शकाने अत्यंत प्रामाणिकपणे मांडली आहे.

देशाच्या दूरगामी भागात विकास पोहोचला असण्याचा दावा करणारे सरकारी कागद किती फोल आहेत, हे वास्तव सरकारी अधिकाऱ्यांसह सर्वसामान्यांनाही ज्ञात आहे. त्यामुळे न्यूटनसारखा तत्त्व ‘वेडा’ अधिकारी जेव्हा येतो तेव्हा त्याच्या कर्तव्यपूर्तीच्या हट्टापायी का होईना त्या गावात मतदानासाठी म्हणून लोकांना एकत्र केले जाते. त्याच वेळी दाखवण्यापुरती का होईना मतदान झाले आहे म्हटल्यावर आपल्याला डोके दुखी ठरणार नाही, अशा पद्धतीने मतदान आटोपून न्यूटन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बाहेर पडावे यासाठी हरएक प्रयत्न करणाऱ्या मेजरची सुरक्षेची आपली एक व्यवस्था आहे. आणि ती चोख पार पडली पाहिजे ही कर्तव्याची भावना त्याच्याही मनात घर करून असल्याने तो पूर्णपणे चुकीचा नाही हेही इथे लक्षात येते. लोक नाथ हे वर्षांनुवर्षे निवडणूक अधिकारी म्हणून काम करीत असल्याने त्यांनी असे अनेक अनुभव पचवले आहेत. आल्या प्रसंगात कमीत कमी चुका करीत जास्तीत जास्त बरोबर काम करण्याचा प्रयत्न करीत आपण या व्यवस्थेतून बाहेर पडायचे नाही एवढी हुशारी त्यांनी अनुभवाने कमवली आहे. रघुवीर यादव यांनी ज्या सहजतेने लोकनाथ ही व्यक्तिरेखा रंगवली आहे त्याला तोड नाही.

एवढय़ा तणावाच्या प्रसंगातही लोकनाथ यांनी दंडकारण्याचा संदर्भ जोडणे, सीतेला विमानातून पळवून नेणारा रावण हा पहिला वैमानिक होता, अशा चिवित्र गमती करणारा हसतमुख लोकनाथ त्यांनी मस्त रंगवला आहे. तर मुळातच नक्षलग्रस्त गावात जन्मलेली, तिथेच शिकलेली माल्को त्या भागातील नक्षलवादाचे वास्तव आणि सरकारी विपर्यास दोन्ही जाणून आहे. ते न्यूटनलाही आपल्या पद्धतीने समजावू पाहणाऱ्या माल्कोच्या भूमिकेत अंजली पाटील फिट बसली आहे. राजकुमार राव हा या चित्रपटाचा मुख्य जीव आहे.

काही न बोलता, केवळ डोळ्यांतून भाव व्यक्त करणे हे राजकुमारच्या अभिनयाचे प्रभावी अस्त्र आहे ज्याचा त्याने यात पुरेपूर वापर केला आहे. त्याला तितकीच तगडी साथ गेल्या काही दिवसांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिकोंमधून आपली चमक दाखवणाऱ्या पंकज त्रिपाठींनी आत्मा सिंगच्या भूमिकेत दिली आहे. प्रभावी व्यक्तिरेखा, त्यांचे वास्तववादी चित्रण आणि तरीही कोणाला न दुखावता, चिमटे न काढताही जे आहे ते मांडत विचार करायला लावणारा ‘न्यूटन’ हा सर्वार्थाने वैचारिक ताकदीचा चित्रपट आहे.

समीक्षक – रेश्मा राईकवार

First Published on September 23, 2017 8:27 am

Web Title: newton movie review in marathi rajkummar rao pankaj tripathi shine in this political film by amit masurkar