News Flash

Padmaavat Review : आश्चर्याच्या परिसीमा ओलांडणारा ‘पद्मावत’

एकंदरीत अगदी शंभर टक्के नसला तरी भन्साळींचा हा चित्रपट पूर्ण वेळ प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरणारा आहे.

पद्मावत

‘पद्मावत…, नाम  मे  ही  सब  छुपा  है…’  असं  या  चित्रपटाच्या  सुरुवातीपासून  म्हटलं गेलं  खरं.   पण,  कालांतराने  ही समीकरणं पार  बदलून गेली.  मुळात  चित्रपट  प्रदर्शित  होतो  कि नाही  याविषयी समीक्षकांच्याही मनात  शंका होती.  ज्या उत्सुकतेने भन्साळींचा हातखंडा असणाऱ्या  भव्यतेची अपेक्षा  मनात  घेऊन  चित्रपट  गृहात प्रवेश  होतो  ती  भव्यता  पहिल्या  दृश्यापासून  ते  अगदी  शेवटच्या दृष्यापर्यंत  पाहायला  मिळते.  चित्रपटात  राणी  पद्मावती,  महारावल  रतन सिंह  आणि अलाउद्दीन खिल्जी या तीन  महत्वाच्या पात्रांचे  प्रवेश मात्र अगदी  साधेच  ठेवण्यात आले आहेत.

विविध रंगांनी, विविध छटांनी साकारलेल्या चित्रांची पानं डोळ्यांसमोरून जावीत, तसाच काहीसा अनुभव दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ हा चित्रपट देतो. ‘लार्जर दॅन लाइफ’ चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांना देण्याचे वैशिष्ट्यच त्यांचे आहे. प्रदर्शनापुर्वीच बरेच वाद झाल्याने प्रकाशझोतात राहिलेला ‘पद्मावत’ चित्रपटगृहात मात्र दाद मिळवणारा ठरतो.

राजपूतांची गौरवगाथा सांगणाऱ्या ‘पद्मावत’मध्ये राणी पद्मावती, महारावल रतन सिंह यांची प्रेमकथा आणि क्रूरकर्मा अलाउद्दीन खिल्जीच्या वाईट मनसुब्यांचे चित्रण करण्यात आले. सौंदर्यवती असलेली सिंघलची राजकुमारी पद्मावतीला पाहताच क्षणी मेवाडचे राजा महारावल रतन सिंह प्रेमात पडतात. विवाहित असलेले महारावल रतन सिंह पद्मावतीशी दुसरं लग्न करतात.

राणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाचा मध्यांतरानंतरचा अभिनय प्रशंसनीय ठरतो. तर शाहिद कपूरने साकारलेल्या महारावल रतन सिंहच्या भूमिकेत स्थिरता जाणवते. मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष वेधून घेणारा अभिनय अलाउद्दीन खिल्जी साकारणाऱ्या रणवीर सिंगचा ठरतो. नजरेतील क्रोधाग्नी, स्वभावातील क्रूरता चेहऱ्यावर आणण्याचे रणवीरचे कौशल्य थक्क करणारे आहे. या तीन मुख्य भूमिकांसोबतच सहाय्यक भूमिकांचीही कामगिरी उल्लेखनीय ठरते. विशेषकरून जिम सर्भ आणि अदिती राव हैदरी यांच्या भूमिका. थोड्याच वेळासाठी झळकलेली अदितीसुद्धा तिची एक वेगळी छाप सोडते.

चित्रपटाचा गाभा  असणारं कथानक कुठेही  चुकीच्या मार्गावर जात असल्याची  पुसटशी  अनुभूतीही होत  नाही.  मुळात  ‘पद्मावत’ला  विरोध  का केला  जातोय  हाच  प्रश्न  इथे  एकसारखा  मनाला  टोचत राहतो. चित्रपटाच्या कथानकाच्या दृष्टीने  भन्साळींनी अनेक बारकावे  टिपले असून काही घटकांवर तर त्यांनी जातीने लक्ष दिल्याचं चित्रपट पाहताना ध्यानात येतं.  एका वेगळ्या काळातील कथा,  संस्कृती साकारताना त्यासाठी  केलेला अभ्यास आणि मेहनतीची दाद द्यावी  तितकी कमीच.  भन्साळींचा हा  प्रोजेक्ट म्हणजे कलाकारांची कला आणि त्यांच्या कौशल्याची परीक्षा घेणारा प्रोजेक्ट ठरला असं म्हणावं लागेल.

कलाकारांच्या दमदार  अभिनयासोबतच ‘पद्मावत’मध्ये अनेक गोष्टींवर नजर  खिळते.  काय,  किती  आणि कसं पाहावं हाच मोठा प्रश्न.  चित्रपटातील गाणी  आणि पार्श्वसंगीतामध्ये राजस्थानी बाज जपण्यात आला आहे.  पण,  त्यासोबतच खिल्जीच्या अय्याशीची ओळख करून देणारी आणि त्याच्या क्रूरतेला अधोरेखित करणारी गाणीसुद्धा ‘क्या बात’ म्हणायला भाग पाडतात. दीपिका आणि शाहिदने साकारलेले राणी आणि राजा हे केवळ भातुकलीच्या खेळातील राजा-राणी नसून त्यांच्या भूमिकांच्या जिवंतपणाची अनुभूती आल्यावाचून राहत नाही. कलाकारांच्या वेषभूषेबद्दल बोलावे तितके कमीच.  राजेशाही थाट, श्रीमंती, घरंदाजपणा आणि (ग्राफिक्सचं वजन वगळता) त्या त्या भूमिकेच्या वेषभूषेचं वजन  या गोष्टी जपताना खिल्जीच्या पेहरावातूनही त्याची विक्षिप्त बाजू दिसेल याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.

‘पद्मावत’मध्ये भन्साळी पुन्हा एकदा त्यांच्या दिग्दर्शनाची छाप सोडतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  चित्रपटातील प्रत्येक दृश्य अगदी मनात आणि एखाद्या फोटो फ्रेममध्ये साठवून ठेवावं असंच आहे.  त्यासाठी छायांकनाची प्रशंसा झालीच पाहिजे. त्याशिवाय स्पेशल इफेक्टसचा बळावर उभं राहिलेलं हे साम्राज्य म्हणजे तंत्रज्ञान आणि कलात्मकता यांची अद्वितीय सांगडच म्हणावी लागेल. कथेचा शेवट जरी माहित असला तरी त्यातील थरार टिकून राहतो. एकंदरीत अगदी शंभर टक्के नसला तरी भन्साळींचा हा चित्रपट पूर्ण वेळ प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरणारा आहे.

– स्वाती वेमूल

swati.vemul@indianexpress.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 5:25 am

Web Title: padmaavat movie review sanjay leela bhansali deepika padukone ranveer singh shahid kapoor
Just Now!
X