23 April 2019

News Flash

Movie Review Rakshas: हरवून सापडलेला ‘राक्षस’

सई आणि शरदपेक्षा सिनेमात बालकलाकार ऋतुजा जास्त लक्षात राहते

मराठी सिनेसृष्टी ही नवनवीन प्रयोगांसाठी ओळखली जाते. या सिनेसृष्टीत आजही संहितेला अधिक महत्त्व दिले जाते. जितकी संहिता उत्कृष्ट सिनेमाही तितकाच चांगला हा नियम आजही मराठी सिनेमांच्या निर्मितीत पाळला जातो. ‘फँड्री’, ‘हाफ तिकीट’, ‘शाळा’ अशा आशयघन सिनेमांची निर्मिती केल्यानंतर विवेक कजारिया आणि निलेश नवलेखा या जोडीने ‘राक्षस’ या सिनेमाची निर्मिती करुन एक नवा प्रयोग करण्याचे पुन्हा एकदा ठरवले. त्यांचा हा प्रयोग फसला असे मुळीच म्हणता येणार नाही.

राक्षसच्या निमित्तानं ‘लय भारी’मध्ये खलनायकी भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकर आणि अभिनेत्री सई ताम्हणकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली. अविनाश प्रकाश (शरद), इरावती प्रकाश (सई) आणि त्यांची मुलगी अरु (ऋतुजा देशपांडे) हे त्रिकोणी कुटुंब त्यांच्या रोजच्या जीवनात- तडजोडीत आयुष्य जगत असते. अविनाश हा डॉक्युमेंट्री बनवणारा असतो. तो एका आदिवासी गावावर डॉक्युमेंट्री बनवत असतो. या गावात पॅराडाइज प्रकल्प येऊ घालतो, ज्याला आदिवासींचा विरोध असतो. पॅराडाइज प्रकल्पाविरोधात आदिवासी आंदोलन करतात. अविनाश कळत- नकळत या आंदोलनाचा भाग होतो आणि एक दिवस अचानक त्या गावातून गायब होतो. मग सुरू होतो अरु आणि इरावतीचा त्याला शोधण्याचा प्रवास.

अनेकदा माणसांना एखादी साधी- सरळ गोष्ट पटकन कळत नाही. ती गोष्ट कळण्यासाठी वेगळ्या पद्धतीने सांगावी लागते. राक्षस हा सिनेमाही काहीसा तसाच आहे. ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित या सिनेमाची कथा कल्पनाविश्वातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. सिनेमाचा पूर्वार्ध जरी संथ वाटत असला तरी उत्तरार्ध रंजक होत जातो आणि तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो. अनेकदा सिनेमा पाहताना हे असे कसे किंवा हे असे का असे प्रश्न मनात डोकावून जातात. पण सिनेमा कल्पनाविश्वातच फुलत असल्यामुळे तो पाहताना अशा प्रश्नांना बगल देणेच योग्य.

सिनेमाची जमेची बाजू म्हणजे संकलन आणि छायांकन. मयुर हरदसच्या संकलन आणि छायांकनामुळे हा सिनेमा पाहावासा वाटतो. सई आणि शरदपेक्षा सिनेमा बालकलाकार ऋतुजाभोवती फिरत असल्यामुळे ती जास्त लक्षात राहते. ऋतुजाने साकारलेली अरू ‘राक्षस आणि शुर राजकन्या’ हे पुस्तक वाचताना त्या भावविश्वात हरवून जाते आणि तिच्या त्या वाचनानेच सिनेमाचे कथानक पुढे जाते. आपल्या वडिलांना शोधण्यासाठीची तिची धडपड सुरू असतानाच इरावतीही तिच्यापरिने पतीचा शोध घेत असते. सिनेमात दोन पद्धतीने एकाचवेळी गोष्टीचा शोध घेतल्यामुळे ‘राक्षसा’चे नानापैलू पाहायला मिळतात. त्याचवेळी लहान मुलांचे भावविश्व डोळ्यासमोर ठेवून प्रेक्षकांना त्या गोष्टी पटवून घ्यावा लागतात. अरुची ही शोध मोहीम तिला नेमकी कोणत्या टप्प्यावर नेऊन सोडते हे राक्षसच आपल्याला सांगू शकतो. त्यामुळे नुसता पुस्तकातून राक्षस अनुभवण्यापेक्षा एकदा तरी सिनेमागृहात जाऊन मोठ्या पडद्यावरचा राक्षस पाहा.

-मधुरा मोहन नेरुरकर
madhura.nerurkar@loksatta.com

First Published on February 23, 2018 1:13 am

Web Title: saie tamhankar sharad kelakar marathi movie rakshas review