17 December 2017

News Flash

Bhoomi Movie Review : जुन्याच विषयाची पुनर्मांडणी

संजय दत्तचा कमबॅक चित्रपट

Updated: September 22, 2017 4:21 PM

'भूमी'

बऱ्याच कालावधीनंतर अभिनेता संजय दत्त ‘भूमी’ चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक करत आहे. ‘मेरी कोम’, ‘सरबजीत’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या ओमंग कुमारने वडील आणि मुलीच्या कहाणीवर आधारित ‘भूमी’चं दिग्दर्शन केलं आहे. संजय दत्तचा कमबॅक चित्रपट असल्याने प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. पण त्या प्रमाणात हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर फारसा प्रभाव टाकण्यात अपयशी ठरतो.

चित्रपटात संजय दत्तसोबतच अदिती राव हैदरी, सिद्धांत गुप्ता आणि शरद केळकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. अरुण सचदेव (संजय दत्त) चपलांच्या दुकानाचा मालक असतो. आपली मुलगी भूमीसोबत (अदिती राव हैदरी) तो आग्रा येथे राहत असतो. आपल्या मुलीचं लग्न एका चांगल्या मुलासोबत व्हावं आणि तिला सर्व सुख मिळावं अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते. भूमीची ओळख नीरजशी (सिद्धांत) होते आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघांचं लग्न ठरतं आणि इथूनच कथेला वळण येतं. परिसरातील एक मुलगा भूमीला एकतर्फी प्रेम करु लागतो. आपल्या चुलत भावाच्या (शरद केळकर) मदतीने भूमीच्या लग्नाच्या एक दिवस आधी तिचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करतो. आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी झगडणाऱ्या पित्याची कहाणी यामध्ये दाखवण्यात आली आहे.

दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी आणि लोकेशन्स ही चित्रपटाची सकारात्मक बाजू आहे. बऱ्याच कालावधीनंतर संजय दत्तचं पडद्यावर येणं आणि तेवढंच दमदार अभिनय करणं प्रशंसनीय आहे. भावनिक कथा असलेल्या या चित्रपटात अदितीनेही चांगली भूमिका साकारली. तर खलनायकाची भूमिका साकारणारा शरद केळकर प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी ठरतो.

चित्रपटाचा पूर्वाध प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरत असला तरी उत्तरार्ध मात्र विशेष नाही. कथेत पुढे नेमकं काय होणार हे आधीच कळत असल्याने सरप्राइज एलिमेंटचा अभाव दिसून येतो. संवाद आणि स्क्रीनप्लेसुद्धा कमकुमत आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शन

या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च २२ कोटी आणि प्रमोशनचा खर्च जवळपास आठ कोटी इतका आहे. एकूण ३० कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट भारतात १८९४ स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. तर परदेशात २४० प्रिंट पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विकेण्डला चित्रपटाची कमाई वाढेल अशी अपेक्षा आहे.

First Published on September 22, 2017 4:12 pm

Web Title: sanjay dutt aditi rao hydari bhoomi movie review