22 July 2019

News Flash

Kedarnath Movie Review : यात्रा त्यागाची अन् नि:स्वार्थी प्रेमाची!

सुशांतपेक्षा साराच केदारनाथमध्ये जास्त भाव खाऊन जाते पण या कथेचा शेवट मात्र काळजात चर्ररsss करुन जातो.

केदारनाथ

जून २०१३ मध्ये ‘केदारनाथ’नं निसर्गाचं रौद्ररुप पाहिलं. हजारोंनी आपले प्राण गमावले, कित्येकांनी आपली जीवाभावाची माणसं डोळ्यादेखत गमावली. काही तर आजही आपल्या माणसांच्या परतण्याची वाट पाहत आहेत. या प्रलयातून वाचलेल्या प्रत्येकाकडे सांगायला बरंच होतं आणि आहेही. कुठेतरी यातल्याच न व्यक्त झालेल्या एका नि:स्वार्थी प्रेमकथेची सांगड घालून अभिषेक कपूरनं उभा केलाय ‘केदारनाथ’. केदारनाथची कथा दिग्दर्शकानं केवळ श्रद्धा, विश्वास, प्रेमाची सांगड घालून गुंफली नव्हती, तर या कथेतल्या प्रत्येक टप्प्यावर निस्वार्थी प्रेम आणि त्यागाची प्रचिती पावलोपावली येत होती.

‘केदारनाथ’ची कथा आहे एका हिंदू पुजाऱ्याच्या मुलीवर प्रेम करणाऱ्या मुस्लिम पिठ्ठूची. ही कथा आहे कुटुंबीयांशी वैर पत्करून सामान्य मुलावर प्रेम करणाऱ्या एका बंडखोर हट्टी मुलीची. खरंतर हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा अशी प्रेमकथा बॉलिवूडला काही नवी नाही. वर्षांनुवर्षे याच कथेवर बॉलिवूडमध्ये कित्येक चित्रपट आले होते आणि येतच राहतील. पण सगळ्यात कथेचा साधेपणा जपणारा ‘केदारनाथ’ काहीसा वेगळा ठरला हे मात्र नक्की. मन्सुर खान केदारनाथमधल्या शेकडो पिठ्ठूपैकी एक. मुस्लिम असूनही भोळ्या शंकरावर श्रद्धा ठेवणं, उपजिविकेसाठी नाही तर श्रद्धाळूंची सेवा करण्यासाठी धडपडणं, या निसर्गावर प्रेम करणं ही त्याची स्वभाववैशिष्ट्ये त्याला इतरांपासून वेगळी करतात. तर मुक्कू म्हणजेच केदारनाथमधल्या पुजाऱ्याची मुलगी याहून अगदी उलट. बंडोखोर, जीभेला हाड नसणारी, हट्टी मुलगी. मनाविरुद्ध मोठ्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याशीच आईबाबांनी साखरपुडा करून दिल्याने तो राग मनात ठेवून आई वडिलांशी हटकून वागणारी मुक्कू अनेकांना आपल्यातलीच एक वाटते.

या मुक्कूला साध्या, दुसऱ्यासाठी धावून जाणाऱ्या स्वभावाचा मन्सूर खूप भावतो. तिच्या आजुबाजूला वावरणाऱ्या स्वार्थी लोकांच्या दुनियेत तो तिला खूपच वेगळा आणि जवळचा वाटतो आणि इथूनच सुरू होते त्याला आपलंस करण्याची तिची धडपड. मुक्कू म्हणजेच सारा अली खानला दररोज तिच्या घरापासून केदारनाथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पिठ्ठू मन्सुर म्हणजे सुशांत सिंह राजपूतकडे असते. या प्रवासात मन्सुरला आपलंस करण्याची तिची ओढ दिवसेंदिवस वाढत जाते. या ओढीचं रुपांतर नकळत प्रेमात होतं.

सारं काही सुरळीत सुरू असताना बहिणीमुळे आपलं लग्न मोडलं याचा राग मनात ठेवून मुक्कूची बहिण मन्सुरचा अपमान करून त्याला मुक्कूपासून वेगळं करते. आजपर्यंत केवळ डोंगरदऱ्या आणि त्या ‘केदारनाथला’ माहिती असलेल्या प्रेमकहाणीचं बिंग कुटुंबीयांसमोर फुटतं. मुस्लिम पिठ्ठू अन् हिंदू मुलीच्या प्रेमाची गोष्ट कुटुंबीयच काय पण समाजही मान्य करत नाही. मुक्कूचं बळजबरीनं लग्न लावण्यात येतं, पण मुळातचं बंडखोर असलेली मुक्कू लग्नाच्या दिवशी आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करते. तर मुक्कूच्या होणाऱ्या नवऱ्याकडून धमक्या मिळाल्यानं इतर पिठ्ठूच्या पोट्यापाण्याचा विचार करता मन्सूर केदारनाथ कायमचं सोडून जाण्याचा निर्धार करतो. पण, मन्सूर आणि मुक्कूच्या प्रेमात आलेलं वादळ इथेच थांबत नाही, त्याचदिवशी केदारनाथमध्ये प्रलय येतो निर्सगाच्या सुंदरतेचं दर्शन घडलेल्या प्रत्येक भाविकाला प्रलयाच्या रुपानं मृत्यू समोर उभा ठाकलेला दिसतो. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुक्कूला जेव्हा जाग येते तेव्हा आजूबाजूला विनाशाचं रौद्र रुप ती पाहत असते. या धक्क्यातून ती सावरत नाही तोच तिची आई- बहिण तिच्या डोळ्यादेखत या प्रलयात वाहून जाते.
केदारनाथपासून दूर जात असलेल्या मन्सूरला मंदिर परिसरात काहीतरी अघटित घटतंय याची जाणीव होते. आपल्या आईला सुरक्षित स्थानी पोहोचवून लोकांची मदत करण्यासाठी, आणि मुक्कूला शोधण्यासाठी तो वर धाव घेतो. मंदिरातच हरवलेलं प्रेम त्याला पुन्हा एकदा नव्यानं मिळतं मात्र नियती प्रत्येक पावलावर या दोघांच्या प्रेमाची परीक्षा घेत जाते.

या चित्रपटात केदारनाथ परिसराचं सौंदर्य ते त्यांच्या रौद्र रुपाची मांडणी उत्तम केलीय. ही दृश्य पाहताना पावलोपाली या चित्रपटातील प्रत्येक गोष्टींशी आपण स्वत:ला नकळत जोडत जातो. ‘नमो नमाय शंकरा’ या गाण्यापासून ते विनाशानंतर पहिल्यांदाच या मंदिराचे उडलेले दार सारं काही प्रेक्षकांचा एक वेगळाच अनुभव देऊन जातो. पिठ्ठूची भूमिका साकारताना सुशांतनं घेतलेली मेहनत चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यातून दिसून येते. तर सैफची मुलगी सारा चित्रपटगृहातून बाहेर आलो तरी मनात घर करून बसते. तिचा अभिनय अगदी सहज वाटतो. तिच्या प्रत्येक कृतीत आई अमृता सिंगचाच भास होत जातो. ही अमृताच नाही ना असं सारखं वाटतं राहतं. सुशांतसोबतची तिची जोडी उत्तम दिसत असली तरी नकळत सुशांतपेक्षा साराच केदारनाथमध्ये जास्त भाव खाऊन जाते.

या कथेचा शेवट मात्र काळजात चर्ररsss करुन जातो. पण जाता जाता या चित्रपटाची कथा आणि कथेशी निगडीत असलेलं प्रत्येक पात्र आपल्याला नि:स्वार्थी प्रेम आणि त्यागाची व्याख्या शिकवून जातं हे मात्र तितकंच खरं.!

 

प्रतीक्षा चौकेकर

Pratiksha.choukekar@loksatta.com

First Published on December 7, 2018 10:33 am

Web Title: sara ali khan sushant singh rajput kedarnath movie review marathi