20 November 2017

News Flash

Movie Review : ‘त्या’ समस्यांना विनोदी पद्धतीने मांडणारा ‘शुभ मंगल सावधान’

चित्रपटात काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले.

Updated: September 1, 2017 2:33 PM

शुभ मंगल सावधान

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कल्याण समयाल साधम’ या तामिळ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर चार वर्षांनी आता दिग्दर्शक आर.एस. प्रसन्ना यांनी त्याचा हिंदी रिमेक ‘शुभ मंगल सावधान’ प्रेक्षकांच्या भेटीला आणलाय. आनंद एल राय आणि इरॉस इंटरनॅशनल निर्मित या चित्रपटात पुरुषांशी संबंधित एका महत्त्वाच्या समस्येवर भाष्य केलंय. त्याचबरोबर इतरही काही मुद्दे यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहेत.

दिल्लीत राहणाऱ्या मुदित शर्मा (आयुषमान खुराना) आणि सुगंधा जोशी (भूमी पेडणेकर) यांची ही कथा आहे. सुगंधाला पाहताच क्षणी मुदित तिच्या प्रेमात पडतो. इथूनच प्रेम व्यक्त करण्याचा त्याचा संघर्ष सुरु होतो. ज्यादिवशी तो सुगंधाकडे आपलं प्रेम व्यक्त करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा रस्त्यावर नाचणाऱ्या एका अस्वलाच्या कचाट्यात तो सापडतो. त्याला पाहून सुगंधा खळखळून हसू लागते आणि तीसुद्धा त्याच्या प्रेमात पडते. मुदित आपल्या लग्नाची ‘ऑनलाइन रिक्वेस्ट’ सुगंधाला पाठवतो. दोघांच्याही घरचे या लग्नाला होकार देतात. मुदित-सुगंधाचा साखरपुडा होतो. मात्र, लग्नापूर्वी सुगंधाला मुदितच्या लैंगिक समस्येविषयी समजतं. येथूनच मूळ कथेला सुरुवात होते. ही समस्या जेव्हा दोन्ही कुटुंबियांना कळते तेव्हा काय होतं, हे सर्व या चित्रपटात मांडण्यात आलंय.

चित्रपटाचा विषय थोडा हटके असल्यास आणि ट्रेलरमध्ये त्या विषयाचा चांगल्या पद्धतीने उल्लेख केल्यास प्रेक्षकांना तो नक्कीच आकर्षित करतो. असंच काहीसं ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटासोबतही झालंय. आर.एस. प्रसन्ना यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. कॅमेराचा वापर आणि चित्रपटातील लोकेशन्स कथेला पूर्ण न्याय देतात. विनोदी वळणातूनही काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्याचे प्रयत्न केल्याने हितेश कवालिया यांनी लिहिलेले संवाद उल्लेखनीय आहेत. ‘दम लगा के हैशा’ चित्रपटात आयुषमान आणि भूमीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यामुळे दोघांमधील केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकते.

एकीकडे दमदार पटकथा आणि कलाकार ही चित्रपटाची मजबूत बाजू असताना उत्तरार्धात मात्र विषय ताणला गेल्याचं पाहायचं मिळतंय. पूर्वार्धात प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केल्यानंतर मध्यांतरानंतरच्या कथेवर प्रेक्षकांच्या साहजिकच अपेक्षा उंचावल्या जातात. मात्र त्या अपेक्षा उत्तरार्धात अपूर्ण राहतात.

एकंदरीत सिनेमॅटोग्राफी आणि पटकथा चांगली असल्याने या वीकेंडला तुम्हाला हा चित्रपट निराश करणार नाही हे नक्की.

First Published on September 1, 2017 2:31 pm

Web Title: shubh mangal saavdhan movie review ayushmann khurrana and bhumi pednekar