‘संघर्ष’ या शब्दाचा अर्थ सांगता येत नाही. तो प्रत्यक्ष अनुभवावा लागतो. या संघर्षातून प्रत्येक व्यक्ती गेलेला असतो. जीवन जगत असताना तो कोणालाही चुकलेला नाही. मात्र या संघर्षावर मात करत जो मार्ग काढतो तच खरा लढवैय्या ठरतो असं सांगणारा ‘सुई धागा’ हा चित्रपट दिग्दर्शक शरत कटारिया यांनी पडद्यावर उमटविला. या चित्रपटाच्या माध्यमातून ममता (अनुष्का शर्मा) आणि मौजी (वरुण धवन) प्रेक्षकांच्या भेटीला आले. विशेष म्हणजे या कलाकारांनीही आपल्या संघर्ष आणि त्यातून तयार झालेला ‘मेक इन इंडिया’ याविषयी उत्तमरित्या सादरीकरण केलं.

एका लहानशा गावात राहणारा मौजी आणि ममता यांची ही कथा. लहानशा गावात राहत असल्यामुळे ममतावर अनेक बंधनं, त्यात घरातल्यांचा धाक. तर संसाराचा गाडा हाकायचा म्हणजे कष्ट करणं आलेच. त्यामुळे मौजीदेखील घर चालविण्यासाठी एका ठिकाणी काम करत असतो. मात्र मौजी काम करत असलेल्या ठिकाणी मालकाकडून त्याचा सतत अपमान होतो. आपल्या नवऱ्याला मिळणारी ही अपमानास्पद वागणूक पाहून ममता त्याला स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यास सांगते आणि त्यासाठी लागणारी सर्वोतोपरी मदतही करते. यातून मौजी आणि ममताला नवी दिशा मिळते. मौजीला त्याच्यातील टेलरिंगची कला गवसते आणि तो एक टेलर म्हणून उदयाला येतो. इतकंच नाही तर यातूनच एका नव्या पर्वाची सुरुवात होते. एका कामगारापासून सुरु केलेला प्रवास ते एक ब्रॅण्डकर्त्याचा प्रवास शरत काटारिया यांनी मेक इन इंडियाच्या आधारे या चित्रपटात मांडला आहे. विशेष म्हणजे त्यांनी या चित्रपटाला न्याय देण्यासाठी कलाकारांची केलेली निवड योग्य ठरल्याचं चित्रपटातून दिसून येतं.

आयुष्यात येणारे चढउतार, या काळात पत्नीने दिलेली साथ आणि त्यांच्यातील प्रेम या चित्रपटामध्ये उत्तमरित्या रेखाटण्यात आलं असून त्याला चित्रपटातील गाण्यांचीही जोड मिळाली आहे. प्रत्येक गाण्यातून ममता -मौजी यांच्या नात्यातील प्रेमाचा गोडवा दिसून येतो. त्याप्रमाणेच पहिल्यांदाच अनुष्का मेकअपशिवाय दिसून येत आहे. मात्र तरीदेखील तिच्या अभिनयामुळे या चित्रपटाचं सौंदर्य वाढलं आहे.

अनुष्का आणि वरुणप्रमाणेच सहाय्यक भूमिका करणाऱ्या रघुवीर यादवने देखील त्यांच्या परीने भूमिकेला न्याय दिला आहे. तर मौजीच्या आईची भूमिका करणाऱ्या आभा परमार यांनीही उत्तमरित्या मायेचा ओलावा भूमिकेत ओतला आहे. त्याबरोबरच चित्रपट पुढे सरकत असताना प्रेक्षकांचं प्रत्येक क्षणाला मनोरंजन होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यात आलं आहे. तसंच यातून ‘मेक इन इंडिया’वर अनेक वेळा प्रकाशही टाकण्यात आला आहे.
शरत कटारिया यांनी योग्य कलाकारांची निवड केल्यामुळे चित्रपटातील प्रत्येक गोष्ट जीवंत झाल्यासारखी वाटत आहे. त्याबरोबरच एक सामान्य व्यक्तने ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देण्यासाठी केलेली धडपडही दिसून येत आहे. विशेष म्हणजे कितीही संकट आली तरी ‘सब ठीक है’ म्हणत नीडरपणे संघर्षाला सामोरं जायचं हे या चित्रपटातून शिकायला मिळतं हे नक्की.