25 April 2019

News Flash

Tumbbad Movie Review : थरकाप उडविणारा ‘तुंबाड’

दहा वर्षापूर्वीच 'तुंबाड'चं कथानक लिहीलं होतं.

तुंबाड रिव्ह्यु

भावभावना, विचार हे स्पष्टपणे व्यक्त करायचे असतील तर त्याचं प्रभावी माध्यम म्हणजे लेखणी. या लेखणीला धार मिळते ती शब्दांची. त्यामुळे एखादा लेखक आपले विचार लिखाणातून व्यक्त करत असतो. या लिखाणामध्ये लेखकाचे विचार, त्याने जीवनात घेतलेला अनुभव आणि त्याची कल्पनाशक्ती यांची सांगड घातलेली असते. अशाच या तीन गोष्टींचा संगम ‘तुंबाड’ या चित्रपटामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं. राही बर्वे यांची लेखणी त्यांना स्वस्थ बसू देईना त्यामुळे त्यांनी दहा वर्षापूर्वीच ‘तुंबाड’चं कथानक लिहीलं होतं. जे आज प्रत्यक्षात उतरलं आहे.

महाराष्ट्रातील एका गावातील स्वातंत्र्यपूर्वी काळातील घटना ‘तुंबाड’ या चित्रपटामध्ये रेखाटण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा ही संपूर्णपणे काल्पनिक आहे. तुंबाड या गावात राहणाऱ्या सदाशिव ,त्याचा मोठा भाऊ विनायक (सोहम शहा) आणि विधवा आई (ज्योती मालशे) यांच्या भोवती हे कथानक फिरताना दिसतं. या कुटुंबाचं राव असं आडनाव असून त्यांचं परिवार शाप आणि उ:शाप यांच्या फेऱ्यामध्ये अडकलं आहे. एका मोठ्या वाड्यामध्ये सदाशिवची आई आपल्या वयस्कर सासऱ्यांची सेवा करत असते. तर दुसरीकडे सदाशिव, विनायक एका लहानशा झोपडीमध्ये राहत असून त्यांच्या आजीला एका विशिष्ट जागी साखळदंडाने बांधून ठेवलं असतं. ही आजी एक राक्षस असून ती केवळ ‘हस्तर’ या एकाच नावाला प्रचंड घाबरत असते. हस्तर हा एका देवीचा मुलगा असून तो प्रचंड स्वार्थी असतो. त्यामुळे त्याची कधीच कोणी पूजा करु शकणार नाही असा शाप देवांनी त्याला दिला होता. परंतु राव या हस्तराची पूजा करण्याचा निर्णय घेतात आणि त्याचं मंदिर बांधतात. विशेष म्हणजे हस्तर याला मिळालेल्या शापामुळे तो एक दानव झाला असतो. मात्र राव कुटुंबाने त्याची सेवा केल्यामुळे तो त्यांच्यावर प्रसन्न होतो आणि या कुटुंबासाठी समुद्धीचं एक माध्यमं बनतो. या हस्तकाची पूजा करताना राव कुटुंबाची प्रगती होणार असतं. मात्र यामध्ये त्यांना प्रचंड जोखीमही उचलायची असते. ही जोखमी एक दिवस या कुटुंबाला उचलावी लागते आणि चित्रपटाचं खरं कथानक समोर उभं राहातं.

विशेष म्हणजे दहा वर्षांचा संघर्षाचा काळ ओलांडल्यानंतर ‘तुंबाड’ साकरण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा, मांडणी, ‘व्हीएफएक्स’चा वापर आदी सगळ्याच बाबतीत एक वेगळा प्रयोग असल्याचं दिसून येतं. या कारणास्तव चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक राही बर्वे, निर्माते आनंद एल. राय यांना हा चित्रपट यशस्वी करण्यात यश आल्याचं दिसून येत आहे.

लेखक नारायण धारप यांच्या कथेवर आधारित ‘तुंबाड’ हा चित्रपट पाहताना प्रत्येक वेळी अंगावर काटा उभा राहतो. इतकंच नाही जसजसं कथानक पुढे सरकतं तसतशी या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढतं जाते. त्यामुळे या चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे.

काल्पनिक भयपट आणि थरारक दृश्यांनी खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेता सोहम शाहने आपल्या अभिनयाला पुरेपूर न्याय दिला आहे. सोहमसोबतच अनिता दाते-केळकर, दीपक दामले, धुंडिराज जोगळेकर, हरीश खन्ना, ज्योती मालशे हे कलाकार झळकले असून त्यांच्या अभिनयामुळेही चित्रपटाचं कथानक जिवंत झाल्याचं दिसून येतं.

‘तुंबाड’मधील प्रत्येक गोष्ट सत्य वाटावी यासाठी चित्रपटाच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली असून पावसामध्ये एका दृष्य चित्रीत करण्यासाठी दिग्दर्शक-निर्मात्यांनी खऱ्या पावसाची वाट पाहिल्याचं दिसून आलं. अनेक हिंदी चित्रपटांची निर्मिती करणारे आनंद एल. राय यांनी ‘तुंबाड’च्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं असून त्यांचा हा पहिला प्रयोग यशस्वी ठरला आहे.

दरम्यान, ‘गुलाब गँग’, ‘सिमरन’ यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सोहम शहाने त्याच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे. ‘तुंबाड’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर एक वेगळं कथानक सादर करण्यात आलं असून हे कथानक प्रेक्षकांना भावत आहे.

First Published on October 12, 2018 1:37 pm

Web Title: tumbbad movie review sohum shah