22 October 2019

News Flash

Uri The Surgical Strike Movie Review: अंती विजयी ठरू…

उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा कसा सूड घेतला याची शौर्यगाथा म्हणजेच 'उरी द सर्जिकल स्ट्राईक'

‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’, असं म्हणणाऱ्या भारताच्या सूडाची कहाणी म्हणजेच ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपट होय. जम्मू- काश्मीरमधल्या उरी येथील मुख्यालयावर १८ सप्टेंबर २०१६ मध्ये पहाटेच्या सुमारास चार दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्याची जगभरातून निंदा झाली. भारतानं या हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं हे उत्तर म्हणजेच ‘सर्जिकल स्ट्राईक’ होय. दहशतवाद्यांनी भारताच्या मुख्यालयावर हल्ला केला ही गोष्ट भारतीयांनाच काय संपूर्ण जगाला माहिती आहे. पण, या हल्ल्यानंतर गप्प न बसता भारतानं या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा कसा सूड घेतला याची शौर्यगाथा म्हणजेच ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’

चित्रपटाची सुरूवात होते उरी हल्ल्याच्या बरोबर एक वर्ष आधी मणिपुरमध्ये सैन्यांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं. या हल्ल्याच्या कटात सामील झालेल्या प्रत्येक दहशतवाद्याला वेचून कंठस्नान घालणाऱ्या भारतीय सैन्याच्या ताकदीचा अंदाज पहिल्या दहा मिनिटांत चित्रपटात येतो. जस जसा चित्रपट पुढे सरकतो तसं ‘सर्जिकल स्ट्राइक’बद्दल केवळ ऐकून, वाचून माहिती असलेल्या धाडसाची कथा पडद्यावर पाहण्याचा रोमांच प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो. केवळ दहा दिवसांत या लक्ष्यभेदी हल्ल्याच्या कारवाईची योजना भारतीय सैन्यानं कशी आखली, शत्रूच्या घरात घुसून त्यांना कंठस्नान कसं घातलं याचा थरारपट दिग्दर्शक आदित्य धार यांनी उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तो साकारताना आजच्या घडीचं वातावरण पाहता योग्य ‘हित’ साधून घेण्याचा प्रयत्न केलाय ही गोष्ट नाकारता येणार नाही हेही तितकंच खरं. काही ठराविक अडचणी सोडल्या तर आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला हे जितकं सहजपणे आपण आज सांगतो तितकंच सहज सीमेवर सगळं घडलं होतं का असा प्रश्न चित्रपटातील काही दृश्य पाहताना ‘सुजाण प्रेक्षका’ला पडल्याशिवाय राहत नाही.

या चित्रपटात अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत दाखवण्यात आला आहे. एकीकडे भारत मातेचं संरक्षण हाच खरा धर्म मानणारा कणखर सैनिक आणि दुसरीकडे आपल्या आईच्या ढासळत चाललेल्या तब्येतीमुळे तितकाच हळवा होणारा मुलगा असा समतोल साधणारा विकी या चित्रपटात उठून दिसतो. परेश रावल, मोहित रैना, किर्ती कुल्हारी, यामी गौतम चित्रपटात छोट्या छोट्या भूमिकेत आहेत. मात्र सगळ्यांचा चित्रपटातील खारीचा वाटा तितकाच कौतुक करणारा आहे. देशभक्ती, बलिदान, सूड, विजय आणि राजकारण अशा सगळ्यांचा अनुभव देणारी आणि अंती विजयी ठरणारी या उरीची शौर्यगाथा एकदा मोठ्या पडद्यावर पाहावी अशी आहे.

First Published on January 9, 2019 1:25 pm

Web Title: uri the surgical strike movie review in marathi