जबाबदारीचं कोणतंही भान नसलेला मुलगा सुंदर मुलीच्या प्रेमात पडतो मात्र मुलीच्या वडिलांचा या प्रेमाला विरोध असतो, मग मुलीसाठी सात समुद्र पार करून तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला हिरो तिला मिळवण्यासाठी काहीही करतो. लव्हस्टोरी म्हटलं की बॉलिवूडमध्ये थोड्याफार फरकानं याच कथानकावर चित्रपटाची कथा फिरते. कित्येक दशकापासून हे चित्र कायम आहे. तेव्हा आयुष शर्मा आणि वरीना हुसैन या दोन ‘लव यात्रीं’च्या प्रेमाचा प्रवास छोटीमोठी वळणं घेत काहीसा याच मार्गावरून जातो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

नवरात्रीच्या नऊ दिवस आणि नऊ रात्रीत घडणारी सुश्रुत आणि मिशेलची प्रेमकथा म्हणजेच ‘लवयात्री’ होय. आयुष्यात कोणतीही महत्त्वाकांक्षा नसलेला सुश्रुत गरबा प्रशिक्षक म्हणून वडोदरामध्ये प्रसिद्ध. तर मिशेल ही इंग्लडमधल्या भारतीय कुटुंबात वाढलेली मुलगी. नवरात्रीच्या आधी ती भारतात येते. गुजरातमध्ये नवरात्रीचा सण मोठा असल्यानं घरच्यांच्या आग्रहाखातर ती वडोदरामध्ये थांबते. यावेळी तिची भेट होते सुश्रुतची. पहिल्याच भेटीत मिशेलच्या प्रेमात पडलेल्या सुश्रुतची नवरात्रीच्या नऊ दिवसांत तिचं प्रेम जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची धडपड या ‘लवयात्री’त दिसत आहे.

आयुष आणि वरिना या दोघांचाही हा पहिलाच चित्रपट. अभिनयात दोघांनाही मेहनत घेण्याची अजूनही गरज आहे. सलमानचा मेहुणा अशी बॉलिवूडमध्ये ओळख असलेला आयुष या चित्रपटातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यास पूर्णपणे अपयशी ठरताना दिसत आहे.  कथानक जरी वेगळं नसलं तरी चित्रपटात नवरात्रीचा माहोल मात्र तितकाच प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. नवरात्री हिच महत्त्वाची थीम असल्यानं प्रत्येक गाण्यात पारंपारिक गरबा आणि आत्ताची आधुनिकता यांचा मेळ तितक्यात सुंदर रितीनं गुंफलेला पाहायला मिळतो, त्यामुळे चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर वरिना आणि आयुष हे दोघंही स्मृतीपटलावरून पुसट होत गेले तरी काही गाणी मात्र चांगलीच लक्षात राहतात.

आयुष बरोबरच रोनित रॉय, राम कपूरही यात प्रमुख भूमिकेत आहे. अभिराज मीनावाला यांच्या दिग्दर्शनाखाली सुरू झालेल्या दोन्ही लवयात्रीचा प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा असणार आहे हे मात्र नक्कीच येणाऱ्या काळात पाहण्यासारखं ठरणार आहे.