थंडीमध्ये येणारी रूक्षता केस व त्वचेला जास्त जाणवते. कारण त्वचा व केस बा वातावरणाच्या जास्त संपर्कात येतात. त्वचेला, केसांना स्निग्धता मिळावी म्हणून जसे आपण तेल, क्रीम इत्यादी गोष्टींचा वापर करतो तसेच शरीराला आतूनही स्निग्धता मिळाली पाहिजे.

केस : या दिवसांमध्ये केसांची रुक्षता वाढते व कोंडय़ाचा प्रादुर्भाव होतो. केसांना आतूनही स्निग्धता मिळावी म्हणून बदाम, अक्रोड, जवस, तीळ, पिस्ता, साजूक तूप, खोबरे इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव आपण आपल्या आहारात अवश्य करावा. कढीपत्ता, आवळा, कांदा, टोमॅटो, डाळिंब, संत्री, मोसंबी इत्यादी रोजच्या आहारात ठेवावे. तेलकट, मसालेदार, मैद्याचे पदार्थ शक्यतो टाळावेत. जास्त प्रमाणात शांपूचा किंवा रासायनिक पदार्थाचा अतिरेक टाळावा.

त्वचा : त्वचा हवामानामुळे रुक्ष होते. केवळ स्थानिक स्निग्ध उपचार केले तर तात्पुरता रूक्षपणा कमी होतो. म्हणून स्थानिक उपचारांना आहारीय द्रव्यांची जोड जरूर द्यावी. बदाम, चारोळी, पिस्ता, अक्रोड, शेंगदाणे, खोबरे, जवस, ऑलिव्ह ऑइल, आवळ्याचे सर्व पदार्थ, डाळिंब, खारीक, काजू, तीळ, साजूक तूप, लोणी इत्यादी अनेक पदार्थ त्वचा स्निग्ध ठेवण्यास मदत करतात. केसांप्रमाणेच त्वचेलाही साबणाचा अतिरिक्त वापर टाळावा. चेहऱ्याची त्वचा हिवाळ्यात लवकर रूक्ष होते. सुरकुत्या दिसू लागतात. त्यामुळे या रासायनिक पदार्थामुळे ती अधिक कोरडी पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि पाणी भरपूर प्यावे.

डॉ. सारिका सातव – dr.sarikasatav@rediffmail.com