16 October 2019

News Flash

नवरात्रीचे रंग

खाण्यातील वैविध्य चव, रंग, आकार इत्यादी अनेक प्रकारांत असते

पितृपंधरवडा संपून आजपासून नवरात्रीला प्रारंभ झाला आहे. खाण्याची विविधता या सणावारांतूनच येते. विशिष्ट सणाला विशिष्ट पदार्थ खाल्ले जातात, पण खाण्यातही वैविध्य असावे हाच संदेश आपल्याला सणांमधून मिळतो. हे खाण्यातील वैविध्य चव, रंग, आकार इत्यादी अनेक प्रकारांत असते. या दिवसांमध्ये विविध रंगांची फळे, भाज्या सहज उपलब्ध असतात. नवरात्रीचे नऊ रंग असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक चव, रंग यांचे स्वत:चे काही विशिष्ट गुणधर्म असतात. म्हणून चव, रंगांत जेवढे वैविध्य असेल तेवढे जास्त जीवनसत्त्वे आपल्याला मिळतात.

उदाहरणार्थ रंगातील वैविध्य – जेवढे पिवळ्या, हिरव्या, नािरगी रंगाचे पदार्थ आहेत त्यामध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. जसे- गाजर – ‘अ’ जीवनसत्त्व जास्त, संत्री/ मोसंबी – ‘क’ जीवनसत्त्व जास्त म्हणून सणासुदीच्या निमित्ताने भरपूर प्रकारचे आणि रंगाचे खाद्यपदार्थ आणि फळे खावीत ज्यायोगे भरपूर जीवनसत्त्वे मिळतील व त्यायोगे प्रतिकारशक्ती चांगली राहीलच, शिवाय भरपूर अँटिऑक्सिडण्टही मिळतील, जे आजकालच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनात आवश्यक आहे.

चवीतले वैविध्य – जेवढे तिखट जास्त तेवढा पित्ताचा त्रास जास्त. त्यातून पुढे आम्लपित्त, पित्ताचे खडे, अल्सर इत्यादी तक्रारी येऊ शकतात. जर गोड खाण्यात जास्त आले तर वजन वाढणार, मधुमेह असेल तर रक्तातील साखर वाढेल आणि खारट जास्त खाण्यात आले तर पित्ताचा त्रास तर होऊ शकतोच, शिवाय रक्तदाबाच्या रुग्णांचा रक्तदाब वाढू शकतो. म्हणून कुठल्याही गोष्टीचा, चवीचा अतिरेक नको. कुठलीच एक गोष्ट सलग न खाता वैविध्य ठेवायला हवे तरच आरोग्य चांगले राहील. सणासुदीच्या काळात बिघडणार नाही.

डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ

dr.sarikasatav@rediffmail.com

First Published on October 1, 2016 1:15 am

Web Title: colurfull navratri