23 July 2019

News Flash

उपवासाविषयीचे गैरसमज

एका विशिष्ट कामासाठी आपली किती ऊर्जा खर्च होणार हे त्या वेगावरून ठरते.

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना उपवासाचे दिवस हे दुहेरी पर्वणी वाटतात, कारण उपवासही होतो शिवाय त्यामुळे काहीही न करता वजन आपोआपच कमी होईल अशी त्यांची चुकीची समजूत असते. उपवासाने वजन कमी होते हा खूप मोठा गैरसमज आहे.

प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा असा एक चयापचय क्रियेचा वेग असतो.  एका विशिष्ट कामासाठी आपली किती ऊर्जा खर्च होणार हे त्या वेगावरून ठरते. हा वेग जेवढा जास्त तेवढा ऊर्जेचा खर्च जास्त व वजन कमी राहते. हा वेग जेवढा कमी तेवढा ऊर्जेचा खर्चपण कमी व वजन वाढत राहते. प्रत्येक माणूस जसा वेगळा असे आपण म्हणतो तसाच त्याचा चयापचय क्रियेचा वेगही वेगवेगळा असतो म्हणजेच कोणत्याही क्रियेसाठी मग ते श्वसन, पचन इत्यादी असो किंवा रोजच्या शारीरिक हालचाली असोत, प्रत्येकाची खर्च होणारी ऊर्जा वेगवेगळी असते. म्हणून तर खाण्याचे प्रमाण, व्यायामाचे प्रमाण समान असलेल्या व्यक्तींमध्येसुद्धा वजन कमी-जास्त होण्याचे प्रमाण वेगवेगळे असते.

या चयापचय क्रियेच्या वेगावर बऱ्याच गोष्टींचा परिणाम होतो. उदाहरणार्थ जेवणाची वारंवारता,  जेवणातील तंतुमय पदार्थाचे प्रमाण, व्यायाम इत्यादी. जेवणाची वारंवारता जेवढी जास्त तेवढा हा वेग जास्त. म्हणजेच जेवणाच्या वेळा जास्त असल्या म्हणजे ऊर्जा खर्च करण्याचे प्रमाणही वाढते. अर्थात प्रत्येक जेवणामध्ये कमी ऊर्जा असलेले पदार्थ अंतर्भूत करणे अपेक्षित आहे. शिवाय आपल्या आपल्या पचनशक्तीवरही ही वारंवारता अवलंबून ठेवावी. म्हणजेच जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा जर काहीच खात नसू, तर हा चयापचयाचा वेग कमी होऊन ऊर्जा खर्च होण्याचे प्रमाण नैसर्गिकरीत्या शरीराकडून कमी केले जाते व हे जर वरचेवर होत राहिले तर वजन वाढण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे बऱ्याच लोकांना हा प्रश्न सतावत राहतो की, उपवास करूनसुद्धा वजन कमी न होता का वाढतय?

शिवाय जर उपवासाचे पदार्थ खाऊन जर उपवास करत असू तर पोटात पिष्टमय पदार्थ जास्त गेल्यानेसुद्धा वजन वाढते. म्हणूनच उपवास करणे हा वजन कमी करण्याचा उपाय न मानता तज्ज्ञांच्या सल्ल्याने शास्त्रोक्त पद्धतीनेच वजन कमी करावे.

 

डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ

dr.sarikasatav@rediffmail.com

First Published on September 3, 2016 1:11 am

Web Title: fasting and misunderstanding