19 March 2019

News Flash

स्निग्ध पदार्थ

स्निग्धता वाढविण्यासाठी स्निग्ध पदार्थ खूप उपयोगी पडतात.

हिवाळा आणि स्निग्ध पदार्थ यांचा अगदी जवळचा संबंध आहे. थंडीमुळे जशी त्वचेची रुक्षता वाढते आणि आपण वरून त्यावर तेल, क्रीम इत्यादी गोष्टी लावतो. तसेच शरीराच्या आतील रुक्षता कमी करण्यासाठी व स्निग्धता वाढविण्यासाठी स्निग्ध पदार्थ खूप उपयोगी पडतात. हे स्निग्ध पदार्थ पचविण्याची ताकदही यावेळी शरीरात असते. पचायला जड असले तरी हे स्निग्ध पदार्थ या दिवसात चांगले पचतात व शरीराला स्निग्धता देतात. स्निग्ध पदार्थामध्ये खूप ऊर्जा असते. (१ ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून ९ कॅलरीज मिळतात. ऊर्जेची आवश्यकता या दिवसांमध्ये जरूर असते, पण काही वेळेला किंवा बऱ्याच वेळेला आपण ही सीमारेषा ओलांडतो आणि ही ऊर्जा खर्च न होता साठून राहते. साठून राहिलेली ऊर्जा बऱ्याच तक्रारी निर्माण करू शकते. म्हणून व्यायामाची पण तेवढीच गरज आहे. व्यायामाची क्षमता या दिवसांमध्ये चांगली असते म्हणून स्निग्ध पदार्थ जरूर खावेत पण व्यायामही चांगला करावा तरच हे स्निग्ध पदार्थ आपल्याला खूप सारे फायदे देतात. अन्यथा हिवाळा संपेपर्यंत वजन वाढण्याची शक्यता असते.

तीळ, शेंगदाणे, खोबरे, बदाम, अक्रोड, तूप, लोणी इत्यादी अनेक पदार्थाचा आपण या स्निग्ध पदार्थातर्गत अंतर्भाव करू शकतो. प्रत्येकाचे गुणधर्म, वापरण्याची पद्धत, प्रमाण इत्यादी निराळे आहेत. म्हणून आपली शरीरयष्टी, रोजच्या कामाचे स्वरूप, वय, पचविण्याची ताकद इत्यादी अनेक गोष्टींचा सारासार विचार

करून या पदार्थाची निवड करावी. या पदार्थामधून बाकीची इतर जीवनसत्त्वेही मिळतात. उचित वापर केल्यास हे स्निग्ध पदार्थ आपला हिवाळाही नक्कीच सुखावह करतील.

 

dr.sarikasatav@rediffmail.com

डॉ. सारिका सातव, आहारतज्ञ

First Published on November 12, 2016 1:15 am

Web Title: fat foods