20 February 2019

News Flash

उष्णतेवर मात

बरेच पदार्थ उन्हाळ्यातील खास असे आपण रोजच्या आहारात वापरतो.

बरेच पदार्थ उन्हाळ्यातील खास असे आपण रोजच्या आहारात वापरतो. हे पदार्थ अगदी पूर्वीपासून घराघरातून वापरले जातात आणि ते ऋतुनुसार योग्य पण आहेत. सर्व पदार्थाचा उद्देश हा बाहेरील उष्णतेपासून शरीराचे रक्षण करणे हाच आहे.
गुलकंद : गुलाबपाकळी आणि खडीसाखर यांपासून गुलकंद बनविला जातो. प्रवाळ इत्यादी पदार्थ त्यामध्ये असतात/ नसतात. गुलकंद दुधातून किंवा तसाच घेऊ शकतो. पित्ताच्या तसेच उष्णतेच्या तक्रारी दूर होतात.
कैरीचे पन्हे : कैऱ्या उकडून पन्हे बनविले जाते. पन्ह्य़ामुळे शरीरातील उष्णता कमी होते. उन्हातून आल्यावर जरूर पन्हे घ्यावे. चहा, कॉफी किंवा इतर थंड पेयांपेक्षा पन्हे फायदेशीर ठरते.
मोरावळा : आवळा पाकात मुरवून मोरावळा बनविला जातो. सर्व प्रकारचे उष्णतेचे, पित्ताचे विकार याने कमी होतात. घेण्याचा कालावधी सकाळी उपाशी पोटी असले तर जास्त उत्तम.
सोलकढी : नारळाचे दूध व कोकम यांपासून सोलकढी बनवितात. दोन्ही पदार्थ पित्तशामक आहेत. रोजच्या आहारातही वापरल्यास उत्तम.
काकडी-कोशिंबीर : पाण्याचा अंश काकडीमध्ये जास्त असल्यामुळे काकडीचा वापर जास्त करावा. रोजच्या जेवणामध्ये काकडी, कोथिंबीर घ्यावी.
कोहळा : पाण्याचे प्रमाण कोहळ्यामध्ये जास्त असते व अतिशय थंड असतो. कोहळ्याची
खीर, पाक, वडय़ा इत्यादी अनेक प्रकार कोहळ्यापासून बनविता येतात. उष्णतेमुळे येणारी रुक्षता, कडकी, अशक्तपणा कोहळ्यामुळे दूर होतो. पित्तामुळे होणाऱ्या डोळ्यांचा व हातापायांचा दाह याने कमी होतो.

डॉ. सारिका सातव, आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com

First Published on March 26, 2016 12:18 am

Web Title: healthy summer foods to add to your diet