दिवाळी संपली आहे, पण फराळ अजून संपायचा असेल. त्यातच थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. या दिवसांत शरीराचाही पोषणाचा काळ सुरू होतो. या दिवसांत आरोग्य जास्तीत जास्त चांगले राहते. वातावरणातील उष्णता कमी होऊन थंडी सुरू होते. शरीराची कार्यक्षमता या दिवसामध्ये जास्तीत जास्त चांगली असते. शिवाय पचनशक्ती उत्तम असते. त्यामुळे खाल्लेले अन्न जास्तीत जास्त प्रमाणात शोषले जाते. आरोग्य उत्तम राहते. या काळात पचनशक्ती चांगली असल्याने जड अन्नपदार्थही चांगल्या प्रकारे पचविले जातात. पचनाच्या तक्रारी कमीत कमी राहतात. भुकेचे प्रमाण वाढते. कृश व्यक्ती, लहान मुले, गर्भवती स्त्रिया इत्यादींना तर हा काळ म्हणजे वरदानच. शरीराचे पोषण उत्तमरीत्या होते. वजन वाढण्यास चांगली मदत होते. पण पोषक आहार घेणे आवश्यक. जेवढा आहार पोषक तेवढे जास्तीत जास्त चांगले आरोग्य राखण्यास मदत होते. जसा आहार पचविण्याची क्षमता वाढते तसेच व्यायामाचीही क्षमता वाढते. म्हणजेच व्यायामाने स्नायूंचे सबलीकरण वाढते. आहार व व्यायाम या दोन्हीने मिळून शरीराचे सदृढीकरण होते. त्याचबरोबर शरीराला आवश्यक असणारी विश्रांती शरीराला आपोआपच मिळते, कारण रात्र मोठी व दिवस लहान असतो. झोप व्यवस्थित झाली तर ही नैसर्गिक विश्रांती खूप बल देते. म्हणजेच आहार, व्यायाम आणि निद्रा या तीनही दृष्टीने हा काळ अतिशय उत्तम आहे. त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग नक्की करायला हवा.

 

डॉ. सारिका सातव, आहारतज्ञ

dr.sarikasatav@rediffmail.com