21 March 2019

News Flash

ऑक्टोबर हीट

वातावरणातील उष्णतेपासून बचाव करण्यासाठी जरूर काळजी घ्यावी

ऑक्टोबर महिन्यामध्ये वातावरणातील उष्णता हळूहळू वाढू लागते, ज्याला आपण ‘ऑक्टोबर हीट’ म्हणतो. या ऑक्टोबर हीटमुळे वातावरणाप्रमाणेच शरीरातील उष्णतादेखील वाढते. त्यामुळे उष्णतेच्या तक्रारी पुन्हा सुरू होतात. बऱ्याच जणांना या दिवसांमध्ये पायांच्या तळव्यांची आग होणे किंवा डोळ्यांची आग होणे इत्यादी तक्रारी जाणवतात. काळजी घेतली नाही तर या तक्रारी वाढत जातात, म्हणूनच बाहेर पडताना वातावरणातील उष्णतेपासून बचाव करण्यासाठी जरूर काळजी घ्यावी, (उदाहरणार्थ छत्री वापरणे, टोपी वापरणे आदी) त्यामुळे उष्णतेच्या तक्रारी कमी जाणवतील.

त्यातूनही जर उष्णतेच्या तक्रारी जाणवू लागल्याच तर पुढील काही उपाय करता येतील. उष्णतेमुळे शरीरातील खनिजे आणि क्षार कमी होतात. ते भरून काढण्यासाठी भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात, मग त्या चिरून पाणी घालून ठेवाव्यात. साधारणत: ३ ते ४ तासांनंतर ते पाणी गाळून प्यावे व भाज्यांमध्ये पुन्हा दुसरे पाणी घालून ठेवावे. असे आपण पूर्ण दिवस करू शकतो. यासाठी सगळ्याच भाज्यांचा आपण वापर करू शकतो. दिवसभरानंतर मात्र या भाज्यांचा वापर करू नये. उष्णतेमुळे घामातून होणारा खनिजांचा ऱहास याने भरून निघू शकतो.

त्याप्रमाणे धणे रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी दुसऱ्या दिवशी दिवसभर थोडे थोडे प्यावे. सब्जा भिजवून ते पाणीसुद्धा पिऊ  शकतो. त्याने थंडावा मिळेल. ताजे ताक रोज घ्यावे. या दिवसांमध्ये कोथिंबिरीचा वापर भरपूर करावा. भाज्यांचा रसही उपयुक्त ठरतो. (उदाहरणार्थ – गाजर ज्यूस, टोमॉटो ज्यूस) त्यामध्ये कोथिंबीर, सब्जा वापरावा. कोहळा या वातावरणामध्ये उष्णता कमी करण्यासाठी खूप मदतीचा ठरेल. शिवाय आपले नेहमीचे गुलकंद, काळे मनुके, फळांचे ज्यूस, नारळपाणी, भाज्यांचे सूप, डाळींचे पाणी इत्यादींचे प्रमाणही वाढवणे उष्णतेवर फायदेशीर ठरेल.

डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ

dr.sarikasatav@rediffmail.com

First Published on October 8, 2016 1:14 am

Web Title: october heat