20 March 2019

News Flash

आरोग्यदायी दिवाळी

नवरात्र, दसरा झाला की दिवाळीची चाहूल लागते. वातावरणातील उष्णता हळूहळू कमी होऊन थोडी थंडी पडू लागते.

नवरात्र, दसरा झाला की दिवाळीची चाहूल लागते. वातावरणातील उष्णता हळूहळू कमी होऊन थोडी थंडी पडू लागते. सगळ्यात मोठा सण दिवाळी. नवीन कपडे, अन्नपदार्थाची रेलचेल, भरपूर फटाके, दिव्यांची आरास इत्यादी अनेक गोष्टींमुळे दिवाळी हा मोठा सण असतोच, पण खूप मोठी आनंदाची पर्वणी असते. थंडी पडू लागते आणि पचनशक्ती वाढू लागते. भूक वाढू लागते. पोषण होण्याचा हा काळ असतो. पचविण्याची शक्ती चांगली असल्याने जड अन्नपदार्थ पण चांगले पचवले जातात. खूप सारे पदार्थ दिवाळीत बनविले जातात. करंजी, चकली, लाडू, शंकरपाळी, चिवडा आदी. प्रत्येक पदार्थ वेगळा चवीसाठी पण त्यातील घटक पदार्थासाठी पण. या फराळाद्वारे खूप प्रकारचे अन्नपदार्थ खाल्ले जातात. खाण्यात खूप वैविध्य येते आणि त्यायोगे भरपूर जीवनसत्त्वे शरीराला मिळतात. या पदार्थामध्ये प्रामुख्याने कबरेदके व चरबीयुक्त पदार्थ जास्त असतात. प्रथिने असलेले पदार्थ पण आहेत. उदाहरणार्थ चकली. बरेचसे पदार्थ तळून/साखरेच्या पाकात तयार केले जातात. तूप बऱ्याच प्रमाणात वापरले जाते. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार आपण हे पदार्थ बनवितो त्यात फार काही बदल झाले नाहीत. मिळणारी ऊर्जा भरपूर असते, पण एका गोष्टीत मोठा बदल झाला आहे, ती म्हणजे आपली जीवनशैली. पूर्वीच्या लोकांना भरपूर शारीरिक कष्ट होते आता बैठी जीवनशैली आहे. ऊर्जा खर्च होण्याचे प्रमाण कित्येक पटींनी कमी झाले आहे. म्हणजेच मिळणारी ऊर्जा तेवढीच/वाढत गेली पण खर्च होण्याचे प्रमाण घटले आणि त्यातूनच स्थौल्य, मधुमेह हे आजार उदयास आले. म्हणून दिवाळी जरूर साजरी करा; पण डोळसपणे. जसे आपण आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये काळाप्रमाणे बदल केले तसेच हे पदार्थ बनविण्याच्या पद्धतीमध्ये केले तर दिवाळी आरोग्यदायीसुद्धा होईल.

  • वनस्पती तुपाचा वापर करू नये.
  • मैद्याचा वापर कमीत कमी करावा. तळलेले पदार्थ करण्यापेक्षा ते पदार्थाना बेक करण्याचा प्रयत्न करावा. चिवडा भाजून बनवावा. (तळू नये)
  • तळलेले तेल परत परत तळण्यासाठी वापरू नये.
  • शंकरपाळीसारखे पदार्थ तिखटसुद्धा बनवू शकतो. मुगडाळीचा वापर जास्त करावा.
  • मैद्याऐवजी गहू वापरावा.
  • भरपूर व्यायाम करावा. जेवणाबरोबर फराळ करू नये अधिक ऊर्जा मिळते.

डॉ. सारिका सातव, आहारतज्ञ -dr.sarikasatav@rediffmail.com

First Published on October 22, 2016 5:23 am

Web Title: short essay on diwali festival