मागच्या सर्व लेखांमध्ये आपण हिवाळ्यातील आहाराविषयी जाणून घेतले. वातावरणातील तापमान वाढून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. आहारात पण त्यानुसार बदल करायला हवा.
उन्हाळ्याच्या आहारामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी/द्रव पदार्थ. वातावरणातील उष्णतेमुळे व त्यामुळे येणाऱ्या घामामुळे शरीरातील द्रवांश कमी होत जातो. हा द्रवांश कमी पडल्यामुळे अशक्तपणा, पायाला गोळे येणे, डोळ्यांची जळजळ, मूतखडा, घेरी येणे, मलावष्टंभ, लघवीला जळजळ होणे, नाकातून रक्त येणे इ. अनेक तक्रारी जाणवतात. त्यामुळे हा द्रवांश कमी पडता कामा नये.
साधे पाणी, नारळपाणी, ज्युस, लिंबू पाणी, कोकम सरबत, दूध, दही, ताक, आवळा सरबत, गुलाब पाणी (पिण्याचे), सब्जाचे पाणी, लिंबू सरबत, कोहळा सरबत इत्यादी अनेक प्रकारामध्ये द्रव आहार आपल्या रोजच्या जेवणामध्ये ठेवावा. सर्व द्रवाहार थंड असावा. माठाचा वापर पाणी थंड करण्यासाठी करावा. द्रवाहार एकाच वेळी जास्त न घेता दिवसभरातून विभागून घ्यावा. प्रमाण ३ लिटरपेक्षा जास्त असावे. हे प्रमाण व्यक्तिसापेक्ष बदलते. स्वत:च्या मूत्राच्या रंगावरून पाण्याचे किंवा द्रव पदार्थाचे प्रमाण ठरवावे. तो रंग जेवढा पिवळसर/ पिवळा असेल तेवढी द्रव पदार्थाची आवश्यकता जास्त असते.
बाहेर फिरून काम करणाऱ्यांनी द्रव पदार्थाचे प्रमाण नीट राहील याची अधिक काळजी घ्यावी. बाहेर पडताना पाणी, इतर द्रव पदार्थ जरूर बरोबर घेऊन जावे. आणि तहान लागल्यास लगेचच प्यावे.

– डॉ. सारिका सातव