21 March 2019

News Flash

उष्ण पदार्थ

थंड वातावरण म्हटले की नक्कीच काही तरी गरम खावेसे वाटते किंवा प्यावेसे वाटते

थंड वातावरण म्हटले की नक्कीच काही तरी गरम खावेसे वाटते किंवा प्यावेसे वाटते. कारण त्याच्यामुळे शरीरास उष्णता मिळते. गरम/ उष्ण दोन अर्थानी होऊ शकते. भौतिकरीत्या गरम म्हणजे खाताना/पिताना तो पदार्थ गरम असणे आणि दुसरा अर्थ म्हणजे पदार्थ मूलत: उष्ण असणे. दोन्ही पद्धतीने उष्ण/गरम पदार्थ थंडीमध्ये वापरूशकतो. भौतिकरीत्या गरम पदार्थ म्हणजे गरम-पाणी, चहा, सूप, पाणी, मुगाचे कढण इत्यादी. त्याने घशालाही आराम मिळतो आणि कफही वाढत नाही. थंड वातावरणामुळे वारंवार होणारी सर्दी आपण टाळू शकतो. शिवाय गरम पाणी, ग्रीन टी इत्यादी अनेक पदार्थ वजन आटोक्यात ठेवण्यास मदत करतात. गरम पाण्यामुळे/गरम खाल्ल्याने शरीराची चयापचय शक्ती वाढते. (बेसिक मेटॅबोलिक रेट) त्यामुळे अतिरिक्तमेद साठत नाही. शिवाय पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते.

जे पदार्थ गुणांनीच उष्ण आहेत ते पदार्थही या वातावरणात खूप मदत करतात. उदाहरणार्थ लसूण, मिरे, दालचिनी इत्यादी. या पदार्थाचा विविध पदार्थामध्ये जरूर वापर करावा. त्यामुळेही थंडीपासून बचाव होतो. कफ साठून राहत नाही. कफाचा खोकला, सर्दी यापासून बचाव होतो. श्वसनसंस्थेचे विकार जे कदाचित वातावरणामुळे बळावू शकतात ते या पदार्थामुळे आटोक्यात राहू शकतात. पचनशक्ती चांगली असेल तर बरेचसे आजार तिथेच कमी होतात आणि हे पदार्थ ती पचनशक्ती चांगली ठेवण्यास मदत करतात. पण प्रमाण मात्र व्यक्तिपरत्वे बदलत राहते.

डॉ. सारिका सातव, आहारतज्ञ

dr.sarikasatav@rediffmail.com

First Published on November 19, 2016 5:22 am

Web Title: winter foods