अपमानाने विचलित न होता पुन:पुन्हा आपली मतं ठामपणे शब्दबद्ध करण्याचे धाडस मिर्जा यास यगाना चंगेजी यांच्यामध्ये होते. यगानाला स्वत:बद्दल सार्थ अहंकार होता. तो त्यास शोभून दिसतो. कारण आपल्या विचारमूल्यांसाठी लढणे मंजूर होते, पण वाकणे त्यांना मंजूर नव्हते.
ज्याशायराचं संघर्षमय जीवन, एकाकी पडूनही विरोधकांवर पलटवार करण्याचं धर्य, अपमानाने विचलित न होता पुन:पुन्हा आपली मतं ठामपणे शब्दबद्ध करण्याचं धाडस अन् उर्दू ग़जलला, रुबाइयांना निर्भीड वळण देणारं, त्याचं सृजन अधोरेखित करणारा हा दोहा-
अस्ली *सरकश को कभी, मिली न युग की दाद
लखनौ भूला ‘यास’ को बागी करते याद
त्याच्या शायरीने प्रभावित होऊन राही मासूम रजासारख्याला त्याच्यावर प्रबंध लिहिण्याची प्रेरणा मिळाली. या उर्दू गजलच्या युगप्रवर्तक शायराचं नाव होतं मिर्जा यास यगाना चंगेजी. पहिल्यांदा यास आणि नंतर यगाना या तखल्लुसने त्यांनी शायरी केली.
कृष्ण का हूँ मं पुजारी, अली का बन्दा हूँ
यगाना शाने-*खुदा देखकर रहा न गया
असं म्हणणारे यगाना खुदाच्या संकल्पनेची मात्र यथेच्छ थट्टा करतात.
बन्दे न होंगे जितने, खुदा है, *खुदाई में
किस किस खुदा के सामने *सज्दा कर कोई,
कैसे कैसे खुदा बना डाले
खेल बन्दे का है खुदा क्या है?
पढके दो कलमे अगर कोई मुसलमाँ हो जाय
फिर तो *हैवान भी दो रोज में इन्सान हो जाय
समझ में कुछ नहीं आता, पढे जाऊं तो क्या हासिल
नमाजों का है कुछ मतलब तो परदेसी जबाँ क्यों हो?
असे जनसामान्यांच्या भावनांना ठेच पोहचविणाऱ्या शब्दांनी यगानांनी लखनऊमध्ये अनेक शत्रू निर्माण केले. खरे तर ते गालिबचे प्रशंसक होते पण विरोधकांच्या गालिब प्रेमामुळे ते हळूहळू गालिबचे कट्टर टीकाकार बनले. अनेक शेर व रुबाइयात त्यांनी गालिबची खिल्ली उडवली आहे. त्या रचना वाङ्मयीनदृष्टय़ा उपेक्षणीय आहेत. पण लखनऊचे शायर दु:ख उदासीनतेची शायरी करत होते. यगानांनी अनेक भडक लेख लिहून त्या विरुद्ध आपल्या आगळय़ावेगळय़ा शैलीत मतं नोंदवली. अन् मग त्यांच्याच लेख व शायरीचा तेथे बोलबाला होऊ लागला. लखनऊच्या उस्ताद शायरांना त्यांची लोकप्रियता नि धर्मावरची उपहासात्मक टीका सहन झाली नाही. अन् वाङ्मयीन युद्ध सुरू झाले. त्याने हीन भाषिक स्तर गाठला. यगाना म्हणतात-
महफिल में है अब रंगे-यगाना गालिब
वह कौन यगाना? वही गालिब के चचा
मतल्यात फर्मावतात-
भोंडापन है *मजाके-गालिब में रचा
मिर्जा का *कलाम अपनी न नजरों में जचा
सांप्रदायिक अन् धार्मिक उन्मादाचा लखनऊमधील अतिरेक असह्य़ होऊन यगानाने आपल्या एका मित्रास धर्माबद्दल अनुदार व अपमानास्पद शब्द असलेले पत्र लिहिले अन् मग काय? संस्कृती, साहित्याच्या उच्च अभिरुचीचा अभिमान मिरवणाऱ्या त्या सुसभ्य शहरातील बुद्धिवंत म्हणवणाऱ्या वर्गाने मानवतेला, व्यक्तिस्वातंत्र्याला काळिमा फासणारं कृत्य केलं. सत्तर वर्षांच्या वयस्कर यगानाला घेरून डांबराने तोंड रंगवून, गळय़ात जोडय़ांचा हार घालून, त्यांना गाढवावर बसवण्याचा प्रयत्न केला. पण गाढव वैतागून पळून गेलं. पण धर्माध मंडळी अजूनच चेकाळली. दुसरं गाढव आणून ते रिक्षाला जुंपलं अन् त्यावर बसवून यगानाची लखनऊभर धिंड काढली. अन् हा सारा प्रकार पोलीस ठाण्यासमोर पोलिसांच्या देखरेखीखाली झाला.
१९५३ मधली ही निद्य घटना. आज बासष्ट वर्षांनी
ती मानसिकता कमी झालीय, असं म्हणू शकतो
का आपण?
यगानाला स्वत:बद्दल सार्थ अहंकार होता. तो त्यास शोभून दिसतो. कारण आपल्या विचार-मूल्यांसाठी लढणे मंजूर होतं, पण वाकणं त्यांना मंजूर नव्हतं.
*सरापा राज हूँ मैं, क्या बताऊँ कौन हूँ, क्या हूँ?
समझता हूँ मगर दुनिया को समझाना नहीं आता
कलामे यास से दुनिया में फिर इक आग लगी
यह कौन हजरते आतिश का *हमजबां निकला?
या उन्मादग्रस्त भक्तांबाबत यगाना म्हणतात-
खुदा ऐसे बन्दों से फिर क्यों न जाये
जो बठा हुआ मांगना जानता है
नि:ष्कर्मपणे नवस करणाऱ्या दैववाद्यांवर हा आघातच होता. यगानाने एका शेरात केलेली कोटी ऐका-
आग में जिसे जलना हो वो हिंदु हो जाय
*खाक में जिसे मिलना हो वो मुसलमाँ हो जाय
यगाना चंगेजीचे मूळ नाव मिर्जा वाजिद हुसेन होते. ते १८ ऑक्टोबर १८८४ ला पटना येथील मुगलपुऱ्यात जन्मले. १९०५ साली लखनऊला आले व तेथेच स्थायिक झाले. १९१४ साली त्यांचा काव्यसंग्रह ‘नश्तरे-यास’ प्रसिद्ध झाला. १९२७ मध्ये दुसरा संग्रह ‘आयाते वज्दानी’ प्रकाशित झाला. १९१५ मध्ये ‘चिरागे-सुखन’ आला. पहले ते स्वत:ला ‘खाक ए-पा-ए-आतिश’ लिहीत. नंतर आतिशपरस्त (म्हणजे अग्नीपूजक) म्हणवीत. याचा दुसरा अर्थ शायर आतिशचा पूजक आहे. यगानाचे उस्ताद शाद अजीमाबादी हे होते. यगानावर बाकर मेहदीचा लेख ‘यगाना आर्ट’ यगानाच्या बंडखोरीचं विश्लेषण करणारा आहे. पण यगानाचे वैविध्यपूर्ण शेर वाचल्यावर त्यांचं महत्त्व कळतं.
ख्वाह प्याला हो या *निवाला हो
बन पडे तो झपट ले, भीक न मांग
अब तुम हों कि हम हों दोनों पडे है ठंडे
अब दोस्ती क्या, और दुष्मनी क्या?
सब तेरे सिवा काफिर, आखिर इसका मतलब क्या?
सर फिरा दे इन्सान का, ऐसा खब्ते मजहब क्या?
चित भी अपनी है पट भी अपनी है
म कहाँ हार मानने वाला?
*खिज्रे-मंजिल अपना हूँ, अपनी राह चलता हूँ
मेरे हाल पर दुनिया क्या समझकर हंसती है
*तमाशागाहे-*हैरत में, कहाँ का तू? कहाँ का मं?
बस इतना था कि आईने से आईनां *मुकाबिल था
लखनऊच्या वातावरणात कट्टरपंथीयांच्या विरोधामुळे यगाना लाहोर, हैदराबाद, मुंबई असे फिरले. पण पुन्हा लखनऊलाच परतले. त्यांचे काही शेर ‘माईल स्टोन’ मानले जातात.
खुदी का नशा चढा आप में रहा न गया
खुदा बने थे यगाना मगर बना न गया
जमाने पर न सही दिल पे *इख्तियार रहे
दिखा वो जोर कि दुनिया में यादगार रहे
खुदा के सामने दामन पसारने वाले
वो हाथ थक गए क्या माल मारनेवाले
कफस को जानते है यास आशियाँ अपना
मकान अपना, जमीं अपनी, आस्माँ अपना
पदा न हो जमीं से नया आस्माँ कोई
दिल कांपता है आपकी रफ्तार देखकर
सृष्टी कर्त्यांवर पुढील शेरात विश्वासही दाखवला आहे.
होता है बंद एक दर, खुलते है *सद हजार दर
अपनी तरफ से शक न कर, नीयते *कारसाजी में
आ रही है ये सदा कान में वीरानों से
कल की है बात कि आबाद थे दीवानों से
यगाना स्वत:ला *‘गालिब शिकन’ म्हणत. यगाना आर्टमध्ये त्यांच्या रुबाइया अंतर्भूत आहे. उर्दूचे ज्येष्ठ शायर व व्यंगलेखक मुशाफ्फिक ख्वाजा मरहूमने कुल्लीयाते-यगाना (समग्र काव्य) संपादित केलंय. त्यात रुबाइया आहेत पण फारसी बाहुल्य व संदर्भसंलग्न असल्याने देत नाही. पण हे काही लक्षणीय शेर –
मुझे दिल की खता पर यास शरमाना नहीं आता
पराया जुर्म अपने नाम लिखवाना नहीं आता
*चरागे-जिस्त बुझा दिल से इक धुआं निकला
लगा के आग मेरे घर से मेहमां निकला
अरे वो जलनेवाले! काश जलना ही तुझे आता
यह जलना कोई जलना है कि रह जाये धुआं होकर
जो गम भी खायें तो पहले खिलायें दुश्मन को
अकेले खायेंगे ऐसे तो हम गँवार नहीं
यगानाचं लखनऊवर नितांत प्रेम होतं तेवढचं जीवनावर, जगावरही होतं म्हणून ते म्हणतात-
दुनिया सें यास जाने को जी चाहता नहीं
वल्लाह क्या *कशिश है इस उजडे *दयार में
१९५६ साली लखनऊ येथेच यगाना चंगेजीचं निधन झालं. पण शेवटपर्यंत त्यांच्या भाषाशैलीचा ताठा तसाच होता.
*मंजिल की फिक्र क्यों हो, जब तू हो और मैं हूँ
पीछे न फिरके देखूं काबा भी हो तो क्या है?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकश, बागी : बंडखोर, बंदा : भक्त, खुदा : ईश्वर, खुदाई : जग, संसार ईश्वरत्व,
सज्दा : नमाजच्या वेळी लवून प्रणाम करणे, कलमा : धर्ममंत्र मुस्लिमांचा, हैवान : वनपशू, मजाके-गालिब : गालिबची काव्य रसिकता, सरापा : अपादमस्तक, हमजबाँ : सहभाषिक, खाक : माती, निवाला : घास, खिज्र : पथप्रदर्शक, तमाशागाह : तमाशास्थळ हैरत : विस्मय, मुकाबिल : सन्मुख, वैरी, सदृश्य, इख्तियार : अधिकार, स्वामित्व, सद हजार : शंभर हजार, कारसाजी : ईश्वराची लीला, माया, गालिब
शिकन : गालिब-भंजक, चरागे-जिस्त : जीवन-दीप, कशिश : ओढ, आकर्षण, दयार : स्थान,
मंजिल : पडाव, गंतव्य

– डॉ. राम पंडित
dr.rampandit@gmail.com

मराठीतील सर्व सहेर होने तक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on consider values
First published on: 14-11-2015 at 01:14 IST