06 July 2020

News Flash

झलक उर्दू शायरीची

उर्दू व्यंगलेखक रशीद अहमद सिद्दिकीने, गजलला ‘उर्दू शायरी की आबरू’ असे संबोधले आहे

उर्दू ही एका समाजाची भाषा नसून ती आपल्यातीलच एका समूहाच्या अभिव्यक्तीचे सांस्कृतिक माध्यम आहे. तिच्यातील ग़़जल या काव्यविविधतेच्या प्रेमात आपण काव्यरसिक पडलो. या वर्षांत या सदरातले हे चोवीस लेख म्हणजे उर्दू शायरीची एक झलक म्हणता येईल.

प्रिय रसिक वाचक हो,
ग़़जलविषयक या अंतिम लेखात उर्दू साहित्याची प्रवृत्ती थोडक्यात मांडत आहे. शायरीचे दोन प्रमुख ‘स्कूल’ मानले जातात. एक देहलवी व दुसरी लखनवी. ‘दाखिला’ म्हणजे आंतरिक मनोव्यथांचे वर्णन करणारी देहलवी शायरी अन् ‘खारिजी’ म्हणजे बाह्य़ सौंदर्य व रंगेल शब्दबद्ध करणारी लखनवी शायरी मानली जात असे. मीर, गालिब, जौक, मोमीन, जफर हे देहलवीचे, तर इन्शा, नासिख इत्यादी लखनवी शायरीचे शायर म्हणता येतील. पण साऱ्यांनीच दोन्ही रंगात सर्जन केल्याचे दिसून येते.
उर्दू शायरीत तरक्कीपसंद तहरिक (पुरोगामी/प्रगतिशील चळवळ) स्वातंत्र्यपूर्व काळात अवतरली. या काळात उद्देशपूर्ण लिखाण झालं. राष्ट्रीय एकात्मतेची भावना, प्रेमापेक्षा समष्टीच्या दु:खाला प्राधान्य देणारे विचार या काळातील रचनांवर आरूढ होते. साठोत्तर उर्दू गद्य-पद्य ‘जदीद अदब’ म्हणून ओळखलं जातं. (आधुनिक साहित्य)
मी पुरोगामी शायरांपकी फैज, जाफरी, कैफी, फिराक, साहिर, मजरूह इत्यादींवर पूर्वी अन्यत्र लिहिले होते. त्यामुळे इथे जाँनिसार अख्तर, राही मासूम रजा, नासिर काजमी, फराज हे शायर घेतले. जदीद शायरी युगाचे निदा फाजली, बशर नवाज, कुमार पाशी, मोहम्मद अलवी, बाकर मेहदी, शहरयार यांच्या शायरीचा परिचय पेश केला.
बंडखोर शायरांत मला यगाना चंगेजी, सारा शगुफ्ता, किश्वर नाहीद, याकूब राहींचा अंतर्भाव करणे गरजेचे वाटले. या मंडळींची शायरी उर्दू शायरीच्या परंपरेला छेद देते. तिचा स्वर ‘लाऊड’ असला तरी कलात्मक स्तर अबाधित राखते. प्रतीकात्मक रूपात साकारत असल्याने सहसा स्लोगन बनत नाही.
उर्दूत कवयित्रींची संख्या वाढत असली तरी लक्षणीय कवयित्री तीस-पस्तीसच म्हणता येतील. अन्य मुशायऱ्यातील विरोधाभासाचे दादलेवा शेर पेश करणाऱ्या आहेत. इथे मी सारा, किश्वर नाहीद, परवीन शाकिर, जोहरा निगाह, फहमिदा रियाज, फातेमा हसन या तिन्ही उर्दू काव्ययुगाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कवयित्रींचा समावेश केला. त्यांची अभिव्यक्ती सांस्कृतिक बंधने असूनही किती निर्भीड व संवेदनशील व तरल भाषेत साकारते ते दिसून येते. मीनाकुमारीवरील लेख तिच्या आत्मकेंद्रित पण वास्तववादी कवितांवर आहे. उर्दू कवयित्रीत तिचं स्थान फार महत्त्वपूर्ण नाही पण काव्य भिडणारं आहे.
समकालीन उर्दू शायरांपकी मुनव्वर राना, याकूब राही, अब्दुल अहद साज, राजेश रेड्डी, फातेमा हसन यांची शायरी काबिले तारीफ आहे. ही मंडळी डोळय़ांदेखत घडणाऱ्या घटना, दुर्घटना व समस्यांवर त्वरित आधुनिक भाषेत ‘रिअ‍ॅक्ट’ होतात. आलंकारिक शैली-भाषेसाठी त्यांची रचना अडून बसत नाही. राजेंद्र मनचंदा बानीचे शेर अगदी कवितेचा आभास देतात. एका शेरात एक परिपूर्ण विचार, कल्पना, स्मरणचित्र, पोर्ट्रेट अथवा लॅण्डस्केपही त्यात सापडतात.
उर्दू व्यंगलेखक रशीद अहमद सिद्दिकीने, गजलला ‘उर्दू शायरी की आबरू’ असे संबोधले आहे. अन ते खरेच म्हणता येईल. अन्य काव्यप्रकार उर्दूत असून त्यात उत्तम काव्यसर्जन झाले असूनही, भारतीय स्तरावर त्याची दखल फारशी घेतली गेली नाही. अख्तर उल ईमान, काजी सलीम, मुनीबुर्रहमान, बलराज कोमल या शायरांनी दर्जेदार कविता लिहिल्या. पण त्यांना उर्दू वाङ्मयातच ओळख मिळाली.
ग़़जलचे वैशिष्टय़ म्हणजे तिच्या शेरातील सूत्रबद्धता, दोह्य़ाप्रमाणे दोन ओळीत एक परिपूर्ण कविता. दुसरे म्हणजे उर्दू छंदशास्त्रातील बहुसंख्य छंदातील चित्ताकर्षक संगीतात्मकता. तिसरे रदीफ व काफिये हे होय. काफियांतील स्वरसाम्यता व रदीफमधील आकर्षक पुनरुक्ती शेरांचे लयात्मकमूल्य द्विगुणित करतात. ग़़जलेत गीताची गीतात्मकता व कवितेची आशयघनता यांचा समतोल साधला जातो. म्हणूनच गालिब, मीर यांसारख्यांचा शेर प्रदीर्घ कवितेचे काम दोन ओळीत पार पाडतो. एवढंच नव्हे तर संपृक्ततेमुळे कंठस्थही होऊन श्रोते अथवा वाचकांच्या मन-बुद्धीचा ठाव घेतो.
उर्दूत मुशायऱ्याच्या गायल्या जाणाऱ्या व वाङ्मयीन दर्जा असलेल्या ़ग़़जला असे प्रकार पडले आहेत. विरोधाभास, चमत्कृतिजन्य शब्दमांडणी हे दादलेवा मुशायऱ्यातील ग़ज़्‍ालेचे वैशिष्टय़. मोहक तरलता ही गायल्या जाणाऱ्या ग़ज़्‍ालेची खासियत. अन् शाश्वत अर्थपूर्ण रसवत्ता हे वाङ्मयीन ग़ज़्‍ालेचे एक वैशिष्टय़. पण मुशायऱ्याचा शायरही कधी कधी वाङ्मयीन ़ग़़जल लिहितो अन् वाङ्मयीन ़ग़़जलाही अनेकदा गायल्या जातात व मुशायऱ्यात दाद घेतातही. अनेकदा मुशायऱ्यात गाजणाऱ्या ़ग़़जलांचे रहस्य शायरांच्या सुरेल आवाज व अभिनयपूर्ण सादरीकरणात दडले असते.
मुनव्वर राना, राजेश रेड्डी, राहत इंदौरी, सईद राही हे मुशायऱ्याचे शायर. तर बाकर, फैज, शहरयार, राही मासूम रजा हे वाङ्मयीन ़ग़़जलचे शायर. निदा फाजली, बशीर बद्र, शीन-काफ, निजाम इ. दोन्ही ठिकाणी ग्राह्य़ शायर होत. चोवीस लेखांत सर्व प्रवृत्तीची शायरी पेश करण्याच्या हेतूने असे विविध प्रतिनिधित्व करणाऱ्या शायरांची ओळख या सदरातून मी करून दिली. या वर्षांत ‘सहर होने तक’चे हे चोवीस लेख म्हणजे उर्दू शायरीची एक झलक म्हणता येईल. उर्दू शायरीला अमीर खुसरोपासूनची एक प्रदीर्घ परंपरा आहे. मराठी गद्य साहित्याएवढे उर्दू पद्य साहित्य विस्तृत भरेल असे म्हणता येईल. उर्दूत प्रारंभिक काळापासूनच शायरांची संख्या गद्य लिखाण करणाऱ्यांहून मोठी आहे.
उर्दू शायरीची ओळख ़ग़़जल या काव्य-विधेने होते. पण छंदोबद्ध कविता, गद्य कविता, गीतं, रुबाइया अशा अनेक काव्यविधांनी हे साहित्यविश्व समृद्ध आहे. मराठीत ़ग़़जल हा काव्यप्रकार तंत्रअपेक्षी असल्याने ़ग़़जलसर्जनाकडे जरा उपेक्षेने बघण्याचा कवी वर्गाचा कल दिसतो. खरं तर हा वर्ग बहुधा छंदात सर्जन करण्याची क्षमता नसलेला असतो. लयात्मक काव्यसर्जन करतो तेही बहुधा छंददोषयुक्त असते. काही सन्माननीय अपवाद असू शकतात. उर्दूत नज्मही (कविता) छंदात वा मुक्तछंदात असते. आजाद ़ग़़जल म्हणजे मुक्त ग़़जलचा पाया मजहर इमाम या शायराने घातला पण ती फारशी तग धरू शकली नाही. केवळ गद्य दुबरेध कविता रचणाऱ्यांना उर्दूत शायर म्हणून फारशी प्रतिष्ठा अजूनही लाभली नाही. ते काव्यात्मक गद्य ठरतं. (या न्यायाने मराठीतील सर्वाधिक दुबरेध गद्य काव्य रचणारे, कवी म्हणून अग्राह्य़ ठरतील.)
उर्दू-िहदीचे आद्य ़ग़़जलकार, कवी म्हणून अमीर खुसरोचा उल्लेख होतो. त्याची उपलब्ध होणारी एकमेव ़ग़़जलची लिपी फारसी व भाषा हिन्दी आहे. त्यामुळे दोन्ही भाषिक त्याला आपला आद्य ़ग़़जलकार मानतात. त्यामुळे हिन्दी ग़़जलचे प्राचीनत्वदेखील सिद्ध होते. (मराठी ग़़जलचेही प्राचीनत्व सिद्ध करण्यासाठी अमृतराय यांची ग़़जल निकषांवर सदोष असलेली रचना उद्धृत होतेच.) वृत्तपत्रात सदर लिहिताना लेखाचे स्वरूप संप्रेषणीय, संक्षिप्त परिचयात्मक असते. शब्दमर्यादांचे अवधान ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे मी यातील शायरांची अल्प ओळख, विशेषता ज्येष्ठ समीक्षकांची मते व जास्तीत जास्त काव्य पेश करण्याचा प्रयास केला. अत्यंत भावले तरी फारसी वा अरबीनिष्ठ शब्द ज्यात आहेत असे शेर नमूद करण्याचे टाळले. अन्यथा शब्दार्थानी अधिक जागा व्यापली असती व वाचकांचा काव्य-आस्वाद घेताना रसोभंगही झाला असता.
मी खरं तर उर्दू कथासमीक्षेचा अभ्यासक. शायरी ही माझी आवड, त्यातून गेल्या पंचेचाळीस वर्षांत जे उर्दू शायरांचे संग्रह अवलोकनात आले. त्याच्या अनुषंगाने हे काही परिचयात्मक लेख घडले. तरीही वाटतं अनेक महत्त्वाचे शायर राहून गेले. प्राचीन उस्ताद शायरांपकी सौदा, मोमीन जौक, वली, मीर तकी मीर, मीर दर्द आदी पुरोगामी चळवळीचे व तद्पूर्वीचे फानी, हसरत मोहानी, मजाज, इब्नेइंशा व बानी या माझ्या प्रिय शायरांवर लिहिणे राहून गेले. पण खंत नाही कारण यांच्यातील काहींवर सेतु माधवराव पगडी व डॉ. सुरेशच्चंद्र नाडकर्णी यांनी विस्ताराने परिचयात्मक लेख लिहिले आहेत.
हमअस्र म्हणजे समकालीन उर्दू कविता अन्य भारतीय भाषांतील कवितेएवढीच पुरोगामी विचारांची व प्रगल्भपणे वर्तमानातील विविध समस्या, प्रश्न, सुखदु:खावर भाष्य करत आहे. हे सारे कवी धार्मिक असो वा निधर्मी असोत अन्याय, दहशतवाद याविरोधी निश्चितच आहेत. अभिव्यक्तीसाठी ते राम, कृष्ण, गोकुळ, राधा, रावण अशा अगणित भारतीय मिथकांचा प्रतीकात्मक वापर करताहेत, यावरून एक जाणवतं उर्दू ही एका समाजाची भाषा नसून ती आपल्यातीलच एका समूहाच्या अभिव्यक्तीचे सांस्कृतिक माध्यम आहे. अन् तिच्यातील ग़़जल या काव्यविधेच्या प्रेमात आपण काव्यरसिक पडलो आहोत. कारण तिचा तरल स्वभाव, मधुर वाणी, चिरतारुण्य, सुडौल बांधा, छंदोबद्ध पदन्यास, समग्र विषय समावेशक वृत्ती..

(सदर समाप्त)
dr.rampandit@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 1:21 am

Web Title: urdu shayri and gazals
टॅग Chaturang,Marathi
Next Stories
1 मेरा कलम तो..
2 मैं सदियों पुरानी कथा हूँ कोई
3 विचारमूल्यांचा बंडखोर पाठीराखा
Just Now!
X